प्रगती जाधव-पाटील
दहावीच्या सुटीत दुपारी जेवताना टीव्हीवर ‘सत्यमेव जयते’ मालिकेत त्याने जंगलातील आग विझवायला धावणा:या चिमणीची गोष्ट ऐकली! बाहेर एप्रिलचं ऊन आग ओकत होतंच. त्यानं विचार केला की आपणही कॉलेज सुरू होईर्पयत या चिमणीसारखं एकटय़ानं काम केलं तर.रोहित बनसोडे त्याचं नाव. त्याची बहीण रक्षिताही सोबत आली. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले खुर्द या गावातले रोहित आणि रक्षिता हे बहीण भाऊ. त्यांची आई ज्योती बनसोडे गृहिणी आहे, तर वडील शंकर बनसोडे हंगामी व्यावसायिक आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मिळेल ते काम करतात. स्वत:ची जमीन नाही. रोहितने दहावीची परीक्षा दिल्यानंतर त्याला सुटीमध्ये जिम लावायची होती. त्यासाठी तो जवळच असलेल्या एका जिममध्ये पोहोचला. तिथं असलेल्या प्रत्येक वस्तूला हात लावला. या गोष्टीचा जिम मालकाला प्रचंड राग आला, ‘आधी फी भर मग डंबेल्सला हात लाव,’ असं चिडून बोललेलं वाक्य रोहितच्या जिव्हारी लागलं. जिमशिवाय आपण बॉडी करून दाखवूच, असं म्हणत रोहितने व्यायामाला सुरुवात केली.काळेवाडी गावाला जाताना मध्येच गोंदवले गावची हद्द पूर्ण वनक्षेत्रत येते. रोहितने व्यायामासाठी गावाजवळील हे माळरान निवडलं. पन्नास किलोचे दगड उचलून, झाडांवर लोंबकळून तो व्यायाम करत होता. मात्र त्याचवेळी उघडे-बोडके माळरान, गावात दरवर्षी पडणारा दुष्काळ, महिलांची पाण्यासाठी चालणारी पायपीट तो बघत होता. आमीर खानने टीव्हीवर सांगितलेली चिमणीची गोष्ट त्याच्या मनात घर करून गेली. त्यातून प्रेरणा घेऊन त्याने या माळरानावर श्रमदान करण्याचं ठरवलं. वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू झालेल्या श्रमदानाचे हे व्रत गेली तीन वर्षे सतत सुरू आहे. रोज श्रमदानासाठीचे साहित्य कुदळ, खोरे, पाण्याची बाटली घेऊन तो जायचा. रक्षिताही सोबत जायची.वृक्षलागवड आणि संवर्धन या कामासाठी वनक्षेत्रशिवाय पर्याय नव्हता. या क्षेत्रत काम करण्यासाठी परवानगी घ्यायला रोहितने वनविभागाचे कार्यालय गाठले; पण तिथं त्याला भन्नाट अनुभव आला. काम तू एकटाच करणार ना, मग जा कर, असं म्हणत त्याला कामाची तोंडी परवानगी दिली.
गोंदवलेच्या माळरानावर रोहित आणि रक्षिता या भावंडांनी 70 सीसीटी बंधारे बांधले आहेत. सलग चाळीस दिवस काम करून त्यांनी 30 फूट लांब, 6 फूट उंच आणि 8 फूट रुंद असा पाझर तलावही तयार केला आहे. या माध्यमातून सुमारे एक कोटी लिटर वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवले गेल्याचा अंदाज आहे. जलसंवर्धनाबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी जून 2018 पासून त्यांनी देशी, पारंपरिक व दुष्काळी भागात कमी पावसावर जगतील अशी स्थानिक झाडे, वड, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ, कवट अशी झाडे लावली. या झाडांना डोक्यावरून पाणी घालून वाढविले; पण योग्य मार्गदर्शनाअभावी यातील काही झाडे जळून गेली. पण या भावंडांनी आपलं काम सुरूच ठेवलं आहे.
मोबाइल बनला गुरु जलसंधारणाचे काम करायचे म्हणजे चर खणायचं इतकंच रोहितला माहीत होतं. पण हे चर खणायचे कसे? त्याची मोजमापं काय? डोंगर उतारावरील कोणत्या भागात हे चर खणायचे याची कसलीच माहिती त्याला नव्हती. त्यामुळे त्याने वडिलांच्या मोबाइलचा आधार घेतला आणि यू-टय़ूबवर ही सर्व प्रक्रिया समजून घेतली.शाळेला सुटी लागली की सलग 45 दिवसांचे काम हे त्यांच्या दिनक्रमाचा भाग बनला आहे. आपल्या शाळा-महाविद्यालयांच्या वेळा, अभ्यास सांभाळून रोज पाच तास श्रमदानाचे काम रोहित आणि रक्षिता करतात.