- प्रज्ञा शिदोरे
मॅरेथॉन पळायला लागला माणूस तो कशानं?
खरंतर चालणं किंवा पळणं हे किती सहज सोप्पी गोष्ट.
आपण लहानपणापासून अगदी सहजपणे हे करत असतो.
पण लहानपणी जे खूप सहज वाटतं ते मोठं झाल्यावर करताना त्यातली गंमत कळते. लक्षात येतं की त्यामागे केवढं शास्त्र लपलं आहे.
माणूस किंवा त्याला मानवप्राणीच म्हणा ना!
तो जेव्हा गुहेत, टोळीमध्ये राहायचा, लहान सहान प्राण्यांची शिकार करायचा, कंदमुळं खायचा तेव्हा त्याला दोन गोष्टींची खूप गरज भासायची. मोठ्या प्राण्यांपासून बचाव आणि एखाद्या संकटाविषयी आपल्या टोळीला निरोप देणं. या दोन्हीही गोष्टी त्याला स्वत:च्या बचावासाठी अत्यावश्यक होत्या.
त्यातूनच मग मॅरेथॉनसारखा खेळ जन्माला आला.
या मॅरेथॉनची गंमत माहिती आहे का?
हा माणूस ग्रीक साम्राज्यामध्ये एक ‘निरोप्या’ होता. त्याच्याकडे एकीकडून दुसरीकडे निरोप पोहोचवणं एवढंच काम. त्यासाठी त्याला मैलोन्मैल धावायला लागायचं.
फिलीडेल्फिस त्याचं नाव.
एकदा त्याला मॅरेथॉनच्या लढाईमधला निरोप पाठवण्यासाठी अॅथेन्सला पाठवण्यात आलं. पर्शियन लोकं लढाईमध्ये पराभूत झाले हा निरोप अॅथेन्सला येऊन सांगितलं. असं सांगितलं जातं, की हा माणूस जवळजवळ ४२ किलोमीटर अंतर न थांबता धावला आणि अॅथेन्सच्या सभेत येऊन ‘आपण जिंकलो’ एवढंच तो म्हणाला.
आता ही कथा खरी की खोटी यावर आजही अनेक ग्रीक इतिहासकारांमध्ये वाद सुरू आहेत. पण आपल्याला या वादाबद्दल काय करायचंय? आपल्याला मतलब आहे पळण्याशी! आदिमानव आपला जीव वाचवण्यासाठी पळत असे. आपण आजसुद्धा जेव्हा पळत असतो तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठीच पळतो असंच कधीकधी वाटतं.
अमेरिकेत राहत असलेल्या साराला तरी असंच वाटत होतं. तिनं लिहिलेल्या लेखातून हे स्पष्ट होतं. रनर्स वर्ल्ड हे एक जगभरातल्या ‘पळणाऱ्या’ लोकांचं आवडतं मासिक. या मासिकाने त्यांच्या गेल्या २० वर्षांतल्या सर्वोत्तम लेखांच्या यादीमध्ये साराच्या लेखाची निवड केली आहे.
तर गोष्ट अशी आहे, की सारा न्यू यॉर्कमध्ये राहणारी तरुणी. तिच्या नवऱ्याच्या कामानिमित्त ती कॅलिफोर्निया या देशाच्या दुसऱ्या टोकाला शिफ्ट झाली. या सगळ्यामुळे तिचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. तिचं आयुष्य ‘मार्गी’ लावण्यासाठी तिने पळणं सुरू केलं. आणि हळूहळू तिला जगण्याची मजा येऊ लागली. तिला तिच्या पळण्यामुळे एक खूप चांगली मैत्रीण मिळाली. ही तिची मैत्रीण, क्लेर हीसुद्धा तिच्या आयुष्यात बऱ्याच समस्यांचा सामना करत होती. या दोघींनी एकमेकींना आणि या दोघींना त्यांच्या रोजच्या पळण्याच्या व्यायामाने साथ दिली, असं सारा सांगते. या दोघी मैत्रिणी मॅरेथॉनच्या अनेक स्पर्धा एकत्र धावायला लागल्या. या धावण्यानं त्यांना कशी मदत केली, धावण्यातून कमावलेली मैत्री आणि स्वास्थ्य कसं वाढलं हे ‘समवन टू रन विथ’ या लेखामध्ये नक्की वाचा.
http://rw.runnersworld.com/selects/friendship.html
बॉर्न टू रन
मग आपण पळत का नाही?
आता प्रश्न येतो की पळायचं कसं? पळणं हा जरी सर्वात सोप्पा व्यायाम असं म्हटलं तरीही पळण्यासाठी खूप ताकद आणि खूप प्रॅक्टिस लागते. ती कशी करायची? त्यासाठी कोणते व्यायाम करायचे? आणि आपलं शरीर कसं कमवायचं याबद्दल सगळी माहिती मिळवण्यासाठी सध्या यूट्यूबवर अनेक व्हिडीओ आहेत. त्यातला एक म्हणजे ‘दि सायन्स आॅफ मॅरेथॉन’ म्हणजे मॅरेथॉनचं शास्त्र. यामध्ये उत्तम धावपटू होण्यासाठी काय काय करावं लागतं याची इत्थंभूत माहिती दिली गेली आहे आणि तीसुद्धा अगदी साध्या व सोप्या पद्धतीने!
मग, वाट कसली बघताय? चला घाला आपले बूट आणि पळा..
पहा- बॉर्न टू रन हा व्हिडीओ..
https://www.youtube.com/watch?v=b-iGZPtWXzE