भागवत हिरेकर
हा ‘रनर’ क्रिकेटच्या मैदानावरचा नाही. तो जगण्याच्या मैदानावर उतरलाय. तेही तंत्रज्ञानाचा हात धरून ! तंत्रज्ञान आपलं जगणंच बदलून टाकेल, अशी इतके दिवस फक्त चर्चा होती. कुठं ऑफिस नाही, मोठाली सामग्री नाही असं असेल तरीही एखादी आयडिया उद्योगावर राज्य करेल असं म्हणता म्हणता ते सारं प्रत्यक्षात आलं. घरबसल्या मोबाइलवर एक अॅप डाउनलोड करायचं, आपल्याल्या हव्या त्या हॉटेलमधून हवा तो पदार्थ मागवायचा, पैसे द्यायचे, झालं काम ! म्हणजे हॉटेल एकाचं, मागवणारा दुसरा, आणून देणारा तिसरा. या गोष्टीतला हा जो ‘तिसरा’ आहे त्याला कामावर ठेवतात फूड डिलिव्हरी देणार्या कंपन्या. ज्या केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीनं अस्तित्वात आल्या. झोमॅटो, स्विगी, उबेर, ओला यांसारख्या कंपन्या ही सेवा पुरवू लागल्या. मुंबई-पुण्यासारख्या शहरात तर या सेवा होत्याच, आता नाशिक-औरंगाबादसारख्या तुलनेनं लहान; पण झपाटय़ानं मोठय़ा होणार्या शहरात या कंपन्या उतरल्या आहेत. त्यांच्यासाठी काम करताहेत स्थानिक तरुण मुलं. एकीकडे घरबसल्या हवा तो पदार्थ मागवण्याची चैन परवडणारे, दुसरीकडे पोटासाठी हे नवीन काम करणारे असं एक नवीन जग आता आकाराला आलं आहे. त्याचेच हे दोन चेहरे. दुष्काळ आणि स्थलांतरानं पोळलेलं औरंगाबाद शहर आणि बदलत्या जीवनशैलीवर स्वार झालेलं नाशिक. तिथं भेटलेल्या रनर्सशी बोलून केलेला एक लाइव्ह रिपार्ट...***
एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे सुकाळ
इतर महानगरांपाठोपाठ आता औरंगाबादही वेगानं बदलतं आहे. इथला मध्यमवर्गीय स्वभावही नव्या जगाचा हात धरतोय. म्हणून तर आता औरंगाबादमध्येही रस्त्यारस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये पाठीवर बॅग घेतलेले डिलिव्हरी बॉय ऊर्फ रनर्स भेटतात. ते सतत ऑन द वे असतात. त्यांना भेटत गेलं तर इथं भेटतं दोन विरुद्ध टोकांवरचं जगणं.दुष्काळानं घेरलेल्या मराठवाडय़ातील औरंगाबाद हे महत्त्वाचं शहर. औद्योगिकीकरण झालं तरी या शहराला एक ग्रामीण टच आहे. मात्र गेल्या काही वर्षात मुंबई, पुण्यापाठोपाठ राज्यांतून, देशांतूनच नाही तर परदेशातूनही शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये येणार्या तरुण-तरुणींची संख्या वाढली. शिक्षणासाठी या शहरात आलेली तरुण लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. दुसरीकडे सेवाक्षेत्रात असलेला वर्ग इन्कम थोडाबहुत वाढल्यानं का होईना स्थिरावला आहे. त्यामुळे जगण्याचे प्राधान्यक्रम बदलू लागले. सुखसोयी, मुंबई-पुण्याकडची लाइफस्टाइल इथंही आली. त्यात तंत्रज्ञान तर सर्वदूर पोहचलंय. सगळं घरच्या घरी मागवा. वस्तूंपासून जेवणार्पयत, ऑनलाइन ऑर्डर करा हे कल्चर इथंही स्थिरावलं. शहरात ऑन डिमाण्ड गोष्टी घरपोच येऊ लागल्या.हे चित्र एकीकडे. दुसरीकडे दुष्काळानं घेरलं. यंदा तर जास्तच घेरलंय. कमी पाऊस, दुष्काळ या संकटाचा सामना करणारी ग्रामीण भागातली मुलं शहरांची वाट धरू लागली. जी शिकायला आली होती, त्यांना घरून पैसे येणं कमी किंवा बंदच होऊ लागलं. शेतीतून घरचा उदरनिर्वाह होणं मुश्कील, पोरांना वर पैसे कुठून पाठवणार अशी गत. शिकायचं, शहरात राहायचं तर या मुलांना काहीतरी कामकाज करणं गरजेचं झालं. पण नोकर्या आहेत कुठं, अनेकजण इण्टरव्ह्यू देत फिरतात. पण नोकर्या नाहीत, रोजगार घटला. काम मिळणंही कठीण होऊन बसलं. फुलटाइम काम मिळेना तर पार्टटाइम कोण देणार? मग त्यातल्या त्यात हे रनर्सचं काम अनेकांच्या पथ्यावर पडलं.कॉलेज शिकत फूड डिलिवरी कंपनीसाठी काम करणारा गणेश म्हणाला, खरं सांगू, इथं लोकांना आमच्याविषयी काहीही वाटत नाही. ऑर्डरचं ठिकाण. घरार्पयतचं अंतर. ट्राफिक. खराब रस्ते. या कशाचाही विचार कुणी करत नाही. त्यांना फक्त त्यांची ऑर्डर वेळेवर हवी असते. पण घाई करून जीव किती धोक्यात घालणार? नाही म्हणायला काही लोक असतात, जे आमच्या अडचणी समजून घेतात. नीट बोलतात. शिक्षणाचा खर्च वाढला. त्यात कामाचा मोबदला पुरेसा नाही. पण अॅडजस्ट करावं लागतं. पेट्रोल महाग झालं. त्यामुळे मोबदला कमीच येतो. मग ओव्हरटाइम करावा लागतो. महिन्याला हातात नऊ दहा हजार रुपये पगार येतो, मात्र वणवण होतेच !’औरंगाबादमध्ये जवळपास हजार ते बाराशे जण फूड डिलिवरी सव्र्हिस क्षेत्रात काम करत आहेत. यात घराची जबाबदारी असणारे आहेत तसे शिकायला शहरात आलेले विद्यार्थीही आहेत. अनेकजण दिवसभर कॉलेज करून सध्याकाळी पार्टटाइम काम करतात. एकीकडे प्रचंड पैसा हाती आलेला वर्ग, तर दुसरीकडे पै पै जमविण्यासाठी झुंजणारा वर्ग. एक वर्ग जेवण घरपोच मागवतोय, दुसरा दोन वेळा पोट भरायचं काम म्हणून त्या कामाकडे पाहतोय. एक दुष्काळाचा चेहरा आहे, एक सुकाळाचा. तंत्रज्ञान आणि सेवाक्षेत्रानं दोघांना जोडलंय. त्यातून रोजगार निर्माण झाला याचा आनंद आहे, दुसरीकडे उत्पन्नातली दरी उघड दिसतेय हे पाहणं त्रासदायक ठरतंय.कैलास हंडे. बी.ए.च्या दुसर्या वर्गात शिकतोय. शिक्षणासाठी आंतरवाडीतून औरंगाबादला आला. परिस्थिती बेताचीच म्हणून बहिणीच्या आसर्यानं शिकतोय. कैलास म्हणाला, घरी दोन एकर शेती. वडील नाहीत. आईच शेती बघते. वडिलांच्या आजारपणासाठी उधार्या झाल्या. शिक्षणातून वाट सापडेल म्हणून दोन वर्षापूर्वी औरंगाबादला आलो. पण कुठं काम मिळेना. त्यात फूड डिलिवरीचा जॉब मिळाल्याने धीर आला. इथे आठवडय़ालाच पैसे मिळतात. यातून मिळणार्या पैशातूनच आता शिक्षण आणि घरी मदत करतोय. हे काम चांगलं आहे. पुढे यातच काम करणार का? असं विचारल्यावर कैलास म्हणतो, भागत नाही. पण जोर्पयत चांगला जॉब मिळत नाही. तोर्पयत हेच काम करावं लागणार आहे.जालन्याचा मनीष वाधवा अशाच एका फूड डिलिवरी देणार्या कंपनीसाठी काम करतोय. ज्या दिवशी भेटला, तो त्याचा पहिलाच दिवस होता. ऑर्डरच्या प्रतीक्षेत असलेल्या मनीषने त्याची पडद्याआडची ष्टोरी ऐकवली. मनीष म्हणाला, जालन्यात पूर्वी वडिलाचं दुकान होतं. दुकान असलेली इमारतच जुनी झाली म्हणून पाडण्यात आली. त्यानंतर वडिलांना नव्यानं दुकान सुरू करणं शक्य नव्हतं. मग वडिलांनी जालन्यातच एका खासगी कंपनी नोकरी धरली. घरची परिस्थिती जेमतेम. बी.कॉ.मच शिक्षण पूर्ण केलं. पण, वकिली करण्याची इच्छा मनात कायम होती. जालन्यात एलएल.बी.ला अॅडमिशन घेतलं. नंतर जालन्यापेक्षा औरंगाबादमध्ये वकिलीच चांगलं शिक्षण मिळतं असं कळलं. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कॉलेज सोडलं. आता औरंगाबादमध्ये राहतोय. जॉबच्या शोधात होतो. खूप शोध घेऊनही काम मिळत नव्हतं. त्यात हा जॉब मिळाला. विशेष म्हणजे हा जॉब आपल्या सोयीनुसार करता येतो. औरंगाबादमध्ये वकिलीच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भरपूर आहे. यातून मिळणारे पैसे शिक्षणासाठी जमा करणार आहे. त्यातून कायद्याच शिक्षण पूर्ण करून वकिली करायची आहे, असं मनीष सांगत होता.दुष्काळ आणि परिस्थितीनं स्थलांतर वाटय़ाला आलेला प्रवीण वाहुळे. गावाकडे काम मिळत नाही म्हणून पूर्ण कुटुंबच औरंगाबादमध्ये स्थलांतरित झाले. घरात आई, वडील आणि छोटा भाऊ. वडिलांबरोबर आपलाही आधार वाटावा म्हणून प्रवीणने काम करायला सुरुवात केली. तो सध्या बी.ए. करतोय. तो सांगतोय, काम हाताला आहे, तर शिक्षणही सुरू राहील.खंत आणि आनंद, काम आणि पैसा, शिक्षण आणि सोय अशा टोकांवर ही कहाणी आकार घेते आहे.(भागवत लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत उपसंपादक आहे.)