अजय परचुरे
एखादी सिरिअल गाजत असते, लोकांना पात्रं आवडत असतात. रोज प्राइमटाइमला ठरल्यावेळी लोकांच्या घरात ही पात्रं जातात. लोक त्यांच्यावर प्रेम करतात, कधी चिडतात, कधी रागराग करतात; पण ही पात्रं अनेकांच्या जगण्याचा भाग तेवढय़ापुरती का होईना झालेली असतात.मराठी सिरिअल्सही त्याला अपवाद नाहीत. त्या मालिकांमधली पात्रं लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होतात.आणि त्यांनी अचानक ती मालिका सोडली की मोठी बातमी होते.मात्र असं घडतं.माझ्या नवर्याची गोष्ट नावाच्या सिरिअलमध्ये शनाया हे पात्र साकारणारी रसिका सुनील अचानक ती सिरिअल सोडून अमेरिकेला शिकायला गेल्याच्या बातम्या झळकल्या.तेच सखी गोखलेचंही. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत तिची भूमिका गाजली. नाटक ती करत होतीच.आणि मग कळलं की ती थेट लंडनलाच शिकायला गेली.फिल्ममेकिंग शिकायला या दोघीही गेल्या खर्या; पण आपलं उत्तम चाललेलं करिअर, भरपूर प्रसिद्धी मिळण्याचे आणि लाइमलाइटचे दिवस सोडून असं थेट शिकायला जावं असं का वाटलं असेल त्यांना?सिनेमाचं तांत्रिक अंग समजून घेणं आणि आपणही एक उत्तम सिनेमा दिग्दर्शित करू शकतो, त्यासाठी प्रशिक्षण हवं असं म्हणत आपलं ऐनभरात असलेलं करिअर सोडून त्या गेल्या, त्यामागचा नेमका विचार काय असेल? हेच प्रश्न या दोघींसमोर ठेवले आणि विचारलं की प्रचंड ग्लॅमरस करिअर हातात असताना एकदम ‘शिकायचं’ असं मनात कसं आलं तुमच्या?कारण शिक्षण सोडून ग्लॅमरस दुनियेत पळणारे आपल्याकडे कमी नाहीत, मग ही शिकण्याच्या दिशेनं जाणारी तुमची पाऊलं, त्यामागचा विचार काय? धास्ती वाटली आपलं ग्लॅमरस करिअर सोडून पुन्हा शांतपणे शिकणं हा पर्याय स्वीकारताना?त्यांच्याशी या गप्पा.***
सखी गोखले सांगते, शिक्षणाचा फायदाच होईल!
सखी गोखले. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या यशाने सखीचं नाव घराघरांत पोहोचलं. त्यानंतर तिचं रंगभूमीवर आलेल्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातील तिची भूमिकाही गाजत होती. मात्र अचानक एक दिवस जाहीर करण्यात आलं की सखी लंडनमध्ये फिल्ममेकिंगच्या उच्चशिक्षणासाठी जात आहे. -हा निर्णय कसा केलास?असं विचारल्यावर सध्या लंडनला असलेली सखी फोनवर सांगते,‘ मी लंडनला शिकायला जातेय हे ऐकल्यावर मला चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांनी वेडय़ात काढलं. अगं तुझं छान करिअर ऐनभरात आलंय, तुझ्या कामाला पसंती मिळतेय मग कशाला जातेस तू लंडनला, असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम होते. मुळातच मला या क्षेत्रात येण्यापूर्वी फिल्ममेकिंगचं पूर्ण शिक्षण घ्यायचं होतं. अभिनेत्री, त्यांचं काम म्हणजे फक्त गाणी गात झाडामागे पळणं किंवा दोन फाइट सीनमध्ये एक रोमॅण्टिक सीन देण्यापुरतं सिनेमात असणं असं माझं मुळातच मत नाहीये. आजच्या तरुण पिढीतील मुली या सक्षम आहेत. अभिनयासह सिनेमात एडिटिंग, कॅमेरा, दिग्दर्शन हे कळण्यासाठी तांत्रिक बाबींची शास्त्रशुद्ध माहिती असणं फार गरजेचं आहे. मला पुढे जाऊन दिग्दर्शनही करायचं आहे. त्यामुळे लंडनमधील फिल्ममेकिंगचा कोर्स करण्याचं मी फार आधीच ठरवलं होतं. त्यासाठी मला आईनेही पाठिंबा दिला होता.’धास्ती नाही वाटली, करिअर आकार घेत असताना हा निर्णय घेण्याची, असं विचारल्यावर सखी सांगते, ‘मुळात मी माझं ऐनभरातलं करिअर सोडून जातेय याचा मला तोटा होईल असा विचार करण्यापेक्षा मी जे शिकून येईन, आल्यावर जे सुंदर काम करीन याचा कोणीही विचार केला नाही. मला वाटतं, शिकून मी अधिक चांगलं काम करू शकेन.’ ***
रसिका सुनील सांगते, सिनेमा कशाशी खातात, हे तर शिकायला हवं!
रसिका सुनील.तिनं मालिका सोडली, आता ती अमेरिकेला शिकायला जाणार असं कळल्यावर लोकांना धक्का बसला. मात्र तू या निर्णयाकडे कसं पाहतेस,असं रसिकाला विचारल्यावर ती सांगते. ‘आज अभिनेत्रीच कशाला आजच्या पिढीतील सगळे कलाकार प्रोफेशनल झाले आहेत. आपण कसे दिसतो, आपला फिटनेस कसा ठेवावा इथपासून नेमका आपला सिनेमा दिग्दर्शित कसा होतोय, एडिटिंग कसं होतंय याचीही अनेकजण माहिती ठेवतात, तांत्रिक बाजू समजून घेतात.माझी सिरिअल, त्यातली माझं शनायाची भूमिका लोकप्रिय होती. तेस सारं छानच होतं. मात्र असं असताना ही माझं फिल्ममेकिंग शिकण्याचं स्वप्न माझ्यासमोर होतंच. ते प्रत्यक्षात उतरवण्याची संधी समोर आली तेव्हा मी सर्व युनिटला एकत्र करून ही गोष्ट सांगितली. मला ते शिकणं का महत्त्वाचं वाटतं ते सांगितलं. दिग्दर्शक आणि इतर कलाकारांनीही माझं म्हणणं समजून घेतलं, आणि मला कामातून सलाम ठोकत मला सिरिअलमधून मुक्त केलं. मला माझा सिनेमा बनवायचाय. पण तो बनवण्यासाठी मुळात सिनेमा कशाशी खातात या म्हणीप्रमाणे मला सिनेमानिर्मितीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून मी ठरवलं ते शिकायचं. आता इथला अभ्यासक्रम संपल्यावरही मी हॉलिवूडमध्ये काही सिनेमांमध्ये असिस्ट करणार आहे. तोर्पयत मी भारताची वाट धरणार नाही!’ ***
मनवा नाईक
मनवा नाईकनेही काही वर्षापूर्वी आपलं ऐनभरातलं करिअर बाजूला ठेवलं होतं. तिने न्यू यॉर्क फिल्म अकॅडमीमधून फिल्ममेकिंगचे रितसर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेतल्यानंतर ती भारतात परतली. नाटक, सिनेमा यामध्ये प्रॉडक्शनचं काम केल्यानंतर तिने पोरबाजार हा मराठी सिनेमा दिग्दर्शित केला. मराठी सिनेमा बदलतोय त्याप्रमाणे मराठी सिनेमातील तरुण अभिनेत्रींची पिढीही बदलतेय. फॅशन, स्टाइल यापलीकडे जाऊन फिल्ममेकिंगचा विचार करत आहेत. मराठी सिनेमा मुळातच तगडं कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने देशभरात जाणला जातो. मात्र तरीही मराठी सिनेसृष्टीत महिला दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांची खूपच थोडी उदाहरणं आहेत. बहुतांश महिलांचे योगदान हे कलाकार (अभिनय, गायन) म्हणूनच राहिले आहे. खूप कमी महिला आहेत, ज्यांनी यशस्वी संगीतकार, दिग्दर्शक, निर्माती म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. सुमित्रा भावे, श्रावणी देवधर, सई परांजपे, स्वप्ना वाघमारे-जोशी, क्रांती रेडकर, प्रतिमा जोशी या यशस्वी दिग्दर्शिका म्हणून रसिकांसमोर आल्या. मात्र आता पुढची पिढी सिनेमानिर्मिती, अभिनय यासह तांत्रिक गोष्टीचंही प्रशिक्षण घ्यायचा विचार करतेय ही आनंदाची गोष्ट आहे.
(लेखक लोकमत ऑनलाइनमध्ये एण्टरटेन्मेंट प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. )