- संजय पाठकआपल्या घराच्या आसपास, चौकात चक्कर मारली तरी सध्या अनेक प्रकारचे व्यवसाय गाड्यांवर सुरू असलेले दिसतील. हातगाडीवर भाजी मिळायचीच, आता छोट्या टेम्पोवजा गाड्यांत कबाब, मिसळपाव, पिझ्झा असे खाद्यपदार्थ मिळतात. इतकेच नव्हे तर कपड्यांना रफू करण्यापासून शिवण्यापर्यंतची कामं होतात. पण सलून पाहिलंय का तुम्ही फिरतं? आणि तेही चक्क एका ट्रकवर?कल्पना करवत नसली तरी नाशिकच्या एका नाभिक व्यावसायिकाने अशाप्रकारच्या मोबाइल सलूनचा प्रयोग केला आहे. इतकेच नव्हे तर या चाकांवरच्या दुकानातील इंटेरिअर बघून थक्क व्हायला होतं. शिवाय ग्राहकांना थर्मासमधून चहा-कॉपीची सहर्ष सेवाही दिली जाते.सामान्यत: रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविणाऱ्यांची कमी नाही. समाजाला काय हवं याचा अभ्यास करून केलेले असे व्यवसाय यशस्वीही होतात. नाशिकच्या संतोष शिंदेंनी हेच अचूक साधलं. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील निमगाव हे त्यांचं मूळ गावं. शिक्षण फार घेऊ शकले नाहीत. जेमतेम नववीपर्यंत शिक्षण झालं. निफाड तालुक्यातील नातेवाइकांकडे शिक्षण घेतानाच त्यांनी केशकर्तनाचं व्यावहारिक शिक्षण घेतलं. पारंपरिक पद्धतीनं झिरपलेलं हे ज्ञान असल्यानं त्याला तशी कधीही अडचण आली नाही. अनेक दुकानांमध्ये कारागीर म्हणून काम केलं. त्यानंतर नाशिकमध्ये अशाप्रकारचे काम करताना स्वत:चं दुकान सुरू करण्याचं ठरविलं. दिवसभर दुसºयाच्या दुकानात काम करून त्यात मिळणारी कमाई तशी जेमतेमच होती. त्यातून अनेक वर्षे दुसरीकडे काम करताना आपलंही स्वमालकीचे दुकान असण्याचं डोळ्यात स्वप्न होतं. त्यातच मुलाबाळांची शिक्षणं, पत्नीचं आजारपण यासर्वांवर मात करताना स्वमालकीच्या जागेत व्यवसाय करणं अशक्यप्रायच होतं. शेवटी संसाराचा गाडा हाकणं अपरिहार्य असल्याने कसाबसा व्यवसाय करत होते.शिंदे यांनी नाशिकरोड भागात अनेक इमारत मालकांना भेटून दुकान खरेदीची तयारी दर्शवली; मात्र चांगल्या दुकानासाठी १२ ते १५ लाख रुपये देणं परवडणारं नव्हतं. कर्जाचं ओझं आयुष्यभरासाठी घ्यायचं म्हटलं तरी पैसे साठत नव्हते. अखेरीस त्यांनी स्वमालकीचे दुकान खरेदी करण्याचा नाद सोडला. पण त्याचवेळी त्यांच्या डोक्यात वेगळीच कल्पना चमकली. एखाद्या मालमोटारीवर दुकान थाटायचं. नवीन मोटार काही परवडणार नसली तरी सेकंड हॅण्ड म्हणजे जुनीच मोटार विकत घ्यायचं ठरवलं. आपल्या सासरच्या मंडळींना आणि शालकांना हा बेत त्यांनी सांगितला. सर्वांनाच हा बेत रुचला नाही. तरीही संतोष यांनी मात्र निर्धारच केला होता. गाड्या खरेदी-विक्री करणाºया अनेक व्यावसायिकांशी त्यांनी संपर्क साधला. गेल्यावर्षी सिन्नरमध्येच एका गाड्या खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करणाºयाकडे एक आयशर कंपनीचा ट्रक असल्याचं कळल्यानंतर ते धावतच तिथं गेले आणि त्यांना ट्रकही आवडला. ट्रकची किंमत साडेतीन लाख सांगितल्यानंतर हे स्वप्न भंगेल अशी त्यांना भीती होती. मात्र तडजोडीअंती सुमारे सव्वादोन लाख रुपयांना त्यांनी ट्रक विकत घेतला. हा ट्रक सुस्थितीत असला तरी त्याची रंगरंगोटी, त्यावर दुकान तयार करण्यावर त्यांना खर्च अपेक्षित होता. मित्र आणि परिचितांकडून उधार उसनवारी करीत आणि घरातील मंडळींच्या मदतीने बघता बघता साडेतीन लाख रुपये खर्च केले आणि अत्यंत आकर्षक रचनेचे सलून त्यावर तयार केलं. चार खुर्च्या असल्यानं एकावेळी चार ग्राहकांना सेवा देता येते. त्यातच इंटेरिअरवर बराच खर्च केल्याने त्याचा आधुनिक वेगळेपणा नजरेतच भरतो. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी आपलं फिरतं सलून सुरू केलं. नाशिकरोड येथील उड्डाणपूल हा गजबजलेला भाग. तेथेच त्यांनी आॅक्टोबर महिन्यापासून व्यवसाय सुरू केला. एका ट्रकवर असलेलं हे सलून आॅन व्हील्स आकर्षणाचा विषय ठरलं आणि तेथे गर्दीही होऊ लागली.
खरे तर अशाप्रकारचे फिरतं सलून तयार केल्यानंतर ते शहराच्या विविध भागात आणि चौकात नेऊन तेथे सोयीने व्यवसाय करणं सहज शक्य आहे. परंतु याबाबत संतोष शिंदे यांची भूमिका वेगळी आहे. शहराच्या विविध भागात आणि चौकाचौकात अन्य सलून आहेत. ते आपलेच समाज बांधव आहेत. त्यांची रोजीरोटी त्यांच्या सलूनवरच आहे. अशा वेळी वेगवेगळ्या चौकात आपलं फिरतं सलून नेऊन ग्राहक आकर्षित करून त्या सलून व्यावसायिकांच्या व्यवसायावर संकट कशाला आणायचं? त्यामुळेच तूर्तास उड्डाणपुलाखाली हा व्यवसाय सुरळीत आहे. अत्यंत किफायतशीर, स्वमालकीचं हे फिरतं दुकान अडचणीचे ठरल्यास अन्यत्रदेखील ठेवता येते, त्यामुळेदेखील ते फायदेशीर ठरते असं त्यांचं म्हणणे आहे. या दुकानात येणारे ६० टक्के ग्राहक आपले पारंपरिक ग्राहक असून, कोठेही आपण व्यवसाय थाटला तरी ते येतातच, अशावेळी हा नवा प्रयोग तर त्याला आणखीनच पूरक ठरला आहे.सध्या त्यांचा हा प्रयोग त्यांच्या जगण्याचा आधार ठरला आहे.(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत. sanjukpathak@gmail.com )