तैपेई चायना.ज्युनिअर एशियन अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा.अत्यंत प्रतिष्ठेची आणि क्षमतेचा कस लावणारी अतिशय अवघड आंतरराष्टÑीय स्पर्धा. सगळे तोडीस तोड खेळाडू. कोणीच कमी नाही.स्पर्धा संपली. खेळाडूंपासून तर तिथे हजर असलेल्या प्रेक्षकांपर्यंत कोणालाच कळलं नाही कोण जिंकलं ते, इतकी टफ स्पर्धा होती.ब्रांझ पदकासाठी तर कमालीची चुरस.तिथल्या भल्यामोठ्या स्क्रीनवर, आॅफिशिअल स्कोअर बोर्डवरही क्षणाक्षणाला देशाचं नाव बदलत होतं. कधी भारताचं नाव येत होतं, तर कोरियाचं..फोटोफिनिशमध्येही कळत नव्हतं. तब्बल १५ मिनिटं हा गोंधळ चालला.शेवटी एकदाचं स्क्रीनवर नाव झळकलं.. इंडिया!आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला..तिचं नाव संजीवनी जाधव..असाच आणखी एक अनुभव.एशियन ट्रॅक अॅण्ड फिल्डची स्पर्धा सुरू होती. शेवटचा लॅप. एकाचवेळी तब्बल नऊ-दहा मुली सोबतच धावत होत्या. पहिल्या तिघांत कोण येणार काहीच कळत नव्हतं. संजीवनीची सिनिअर गटातली ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा. केवळ अनुभव म्हणून या स्पर्धेत तिनं भाग घेतला होता, तरी इथेही तिनं ब्रॉँझ पदक पटकावलं. राष्ट्रीय स्पर्धांत जी नेहेमी पहिला क्रमांक मिळवायची ती तामिळनाडूची एल सूर्या चौथ्या क्रमांकावर होती!..पण संजीवनी अॅथलेटिक्समध्ये कशी आली आणि झपाट्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी पोहोचली याचीही एक रंजक कहाणी आहे.संजीवनी आधी चक्क कुस्ती खेळायची. कुस्ती खेळायची म्हणजे नुसती नावापुरती आणि आवड म्हणून नव्हे. ज्युनिअरच्या राष्टÑीय स्पर्धा तिनं गाजवल्या आहेत आणि आठवीत असताना कुस्तीच्या नॅशनलमध्ये तिनं सिल्व्हर मेडलही पटकावलं आहे. संजीवनी आत्ता २२ वर्षांची आहे. स्पोर्ट्स सायकॉलॉजीमध्ये एम.ए. करते आहे. तिचं मूळ गाव नाशिक जिल्ह्यातलं वडाळीभोई. दहावीपर्यंतच शिक्षण तिचं इथे गावातच झालं. वडील हायस्कूल शिक्षक. ते चांगले कुस्तीपटूही होते. त्यांच्यामुळेच संजीवनी कुस्तीकडे आकर्षित झाली. तेच तिला कुस्तीचे डावपेच शिकवायचे. घरी आणि मळ्यात.पण कुस्तीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नसल्यानं संजीवनी नंतर अॅथलेटिक्सकडे वळली आणि खास त्यासाठी नाशिकला आली.संजीवनी सांगते, ‘कविता राऊतच नाव तर मी लहानपणापासून ऐकत होते; पण ट्रेनिंग म्हणजे काय असतं, ते मला इथं आल्यावर कळलं. तोपर्यंत सारंच अडूमधुडूम आणि गावठी!’नाशिकला संजीवनीचं ट्रेनिंग सुरू झालं आणि मग तिनं एकामागोमाग धडाकाच लावला..पहिल्याच वर्षी म्हणजे अकरावीला असताना इटावा येथे झालेल्या तीन हजार मीटर राष्ट्रीय स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवलं.पुढच्याच वर्षी २०१४मध्ये बारावीत असताना मलेशिया येथे झालेल्या एशियन स्कूल इंटरनॅशनल स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावलं.तिची पदकांची भूक थांबतच नव्हती.२०१५मध्ये ब्राझील येथे झालेल्या वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशिप स्पर्धेत सिल्व्हर, त्याच वर्षी कोरिया येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत सहाव्या क्रमांकापर्यंत झेप, २०१६ला तायपे चायना येथे झालेल्या ज्युनिअर एशियन स्पर्धेत ब्रॉँझ.. गेलं वर्षं तर तिचंच होतं. २०१७ मध्ये ओरिसात झालेल्या एशियन ट्रॅक अॅण्ड फिल्ड स्पर्धेत ब्रॉँझ, तायपे चायना येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत सिल्व्हर, तुर्कमेनिस्तान येथे झालेल्या एशियन इनडोअर गेम्समध्ये सिल्व्हर..राज्य आणि राष्ट्रीय पदकांची लयलूट केली. आॅल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीच्या पाच आणि दहा किलोमीटरच्या राष्टÑीय स्पर्धांत तर लागोपाठ चार वर्षं तिनं गोल्ड मेडल पटकावलं. पण ही कामगिरी एवढ्यापर्यंतच सीमित नव्हती. या प्रत्येक स्पर्धेत स्वत:चंच रेकॉर्ड तिनं तोडलं आणि नवं राष्ट्रीय कीर्तिमान स्थापन केलं!वर्कआउट करता करताच संजीवनी माझ्याशी बोलत असते.. ‘आॅलिम्पिकमध्ये नुसता सहभाग नाही, तिथे पदक मिळविण्याची माझी ईर्ष्या आहे. त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. बघूया काय होतंय ते. कारण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात!’त्याचा अनुभवन संजीवनीनंही घेतलाय. कारण दुखापती. २०१४ हे वर्ष संजीवनीसाठी तसंच होतं. दुखापतींनी ती त्रस्त झाली होती, तरीही मॅच विनिंग परफॉर्मन्स मात्र तिनं सोडला नाही.इथवरचा प्रवासही सोपा नव्हता.संजीवनी सांगते, ‘सुरुवातीचा काळ तर अत्यंत अवघड होता. मुलींनी काय कुस्ती खेळायचं असतं का, इथपासून तर एकट्या मुलीला कशाला शहरात पाठवता, इथपर्यंत लोक काहीबाही वडिलांना ऐकवायचे. टोचून बोलायचे. पण वडील खंबीर होते. त्यांनी कोणाकडेच लक्ष दिलं नाही. मीही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहिले. त्याचं फळ मिळतंय; पण स्वत:ला फोकस्ड ठेवणं फार फार कठीण आहे..संजीवनीची मैदानातली झेप पाहून बारावीपासूनच अनेक कंपन्यांकडून तिला जॉबसाठी आॅफर येत होत्या; पण ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय नोकरी करायची नाही असा तिचा निश्चय होता. रेल्वेच्या जॉबसाठी तिनं नुकताच अर्ज केलाय.तो जॉब जर तिनं स्वीकारला, तर नोकरी आणि ग्राउण्ड अशी तारेवरची दुहेरी सर्कस तिच्यासाठीही सुरू होईल..
जोरबैठका, उठाबशा आणि डिप्स!संजीवनी अगोदर कुस्ती खेळायची, त्यामुळे व्यायामही तसाच ‘गावठी’. उठाबशा काढायच्या. जोरबैठका, डिप्स मारायचे आणि डावपेचही तसेच जत्रेतल्या कुस्तीसारखे. आंतरराष्टÑीय स्पर्धेत कुस्ती होते ती मॅटवर आणि पॉइंटवर. तंत्रशुद्धपणे शिकवायला कुणीच नव्हतं.मग वडील म्हणाले, त्यापेक्षा तू रनिंग का करीत नाहीस? संजीवनीलाही ते पटलं आणि दहावीपासून तिनं रनिंगवर फोकस वाढवला. तोपर्यंत ती कुस्ती आणि नंतर रनिंग असं दोन्हीही एकाचवेळी करीत होती. वडीलच तिचा सराव घ्यायचे. वडील मोटरसायकलवर आणि ती त्यांच्यामागे पळत. रोज दहा ते बारा किलोमीटर!त्यावेळी काही अनुभवी लोकांनी तिला सांगितलं, तू नाशिकला जा. विजेंद्रसिंग यांच्याकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण घे. दहावी झाल्या झाल्या संजीवनी नाशिकला आली आणि इथल्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तिनं अॅडमिशन घेतली. तिथल्याच होस्टेलमध्ये प्रवेशही घेतला.आधी चीन, मग टोकिओ!काही दिवसांपूर्वीच गोव्याला झालेल्या नॅशनल क्रॉस कंट्री स्पर्धेत संजीवनीनंं आॅलिम्पियन ललिता बाबरलाही मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावला! येत्या काही दिवसांत, दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. चीनमध्ये होणारी एशियन क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप अणि भूतान येथे होणारी साऊथ एशियन क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप. या दोन्ही स्पर्धांत संजीवनी धावणार आहे.. पण संजीवनीची झेप आणखी पुढची आहे. पुढच्या वर्षी २०१९मध्ये होणारी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि त्याच्या पुढच्या वर्षी २०२०चं टोकिओ आॅलिम्पिक! त्यात तिला धावायचंय.पतियाळा येथे कॉमनवेल्थ स्पर्धेसाठीचं सिलेक्शन सुरू आहे. त्यामुळे आज, आत्ता ती पतियाळात आहे. पण सध्या तिचं लक्ष आहे चीनकडे. येत्या काही दिवसांत; १५ मार्चला चीनमध्ये एशियन क्रॉस कंट्री स्पर्धा सुरू होणार आहेत. त्यात तिला आपली सर्वोत्तम कामगिरी करायचीय.
विशेषांक लेखन - समीर मराठे
(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)