ठोकरांना थॅँक्यू म्हणाच!
‘अपयश येणंही कधीकधी चांगलं असतं, ठोकरा बसणंही अनेकदा बरंच असतं, अनेकदा तर एखादी गोष्ट न जमणं हीच तेव्हा आपल्यासंदर्भात घडलेली चांगली गोष्ट असते असं मला वाटतं!’ तरुण होतो मी. आॅडिशन द्यायला जायचो. बसने फिरायचो. न्यूयॉर्कमध्ये धक्के खायचो. एखादी संधी, एखादा तरी सीन आपल्याला करायला मिळावा म्हणून तडफडायचो. आणि ते करून झालं की मग त्या टीममधून कुणीतरी येऊन सांगायचं.. ‘ओके, थॅँक्स!’ म्हणजे काय तर गेम ओव्हर! संपलं, काही काम मिळणार नाही, निघा आता. त्या अवस्थेला आम्ही ‘बीइंग ओके थॅँक्स्ड’ असं म्हणायचो. नंतर नंतर तर हेच वाक्य माझं कवच बनलं. नाही जमलं काही तर फार हळवं न होता, मी नव्या उमेदीनं पुढचं काम शोधायचो. काम नाही मिळालं तरी उमेद जागी राहायची!
ऐकायला शिका
तुम्ही बोलायला लागले आणि ऐकणं कमी केलं की तुमचं शिक्षण संपलंच. आणि शिकणं थांबता कामा नये. सतत शिका, तुमच्या कामापलीकडच्याही गोष्टी शिका. काही नाही तर इतरांची आॅनलाइन उपलब्ध असणारी लेक्चर्स ऐका. टेड टॉक ऐका. मी नुकताच एका फिलॉसॉफी कोर्सला हार्वर्डला प्रवेश घेतला आहे. ऐकणं महत्त्वाचं, ऐकून घेणं जास्त महत्त्वाचं. ज्या लोकांशी तुमचं पटत नाही, त्यांचंही ऐकून घ्यायला शिका.
प्रत्येक प्रश्नाला हायटेक सोल्यूशन नसतं!
जमाना हायटेक असला तरी प्रत्येक प्रश्नाचं हायटेक सोल्यूशन नसतं. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान पोहचलेलं नाही त्यांचेही प्रश्न आहेत. आणि ते माणसांना सोबत घेऊनच सोडवावे लागणार आहेत, हे विसरू नका.
पणाला काय लावताय?
प्रश्न कोण किती लकी आणि कुणाला किती प्रॉब्लेम हा नसतोच. आपल्या ज्या काही समस्या असतील त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहा आणि भिडा त्यांना. बाकी जे होईल ते होईल!