- श्रुती मधुदीपकाळाकुट्ट अंधार.. समोर फिरत असलेली चलतचित्रं.. किती दिवसांनी असा एकांत मिळाला होता दोघांना... एकमेकांचे हात इतक्या घट्टपणे धरता आले होते की जणू अंधारच हवाहवासा वाटू लागला होता. तिने त्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं आणि डोळे मिटले. आता तर समोर स्क्रीनवर चाललेल्या घटनांमुळे येणाऱ्या प्रकाशालाही तिने नाहीसं करून टाकलं. डोळे बंद केल्यावर ‘तो’ किती तीव्रतेने तिचा वाटतो, त्याला किती तीव्रतेने तिला स्पर्श करता येतोय असं तिला वाटलं. प्रचंड प्रचंड जवळ यावं असं वाटलं तिला. सगळी अंतरंच संपून जावीत असं वाटलं. अर्थात त्यालाही ते वाटलं होतंच; पण तरी तो समोरच्या स्क्र ीनवर चाललेल्या घटनांकडे बघत होता. मधूनच त्याचा हात तिच्या केसांवरून फिरत होता. मधूनच अंधारातून वाट काढत तिच्या डोळ्यांमध्ये डुबायचा प्रयत्न करत होता. एकमेकांच्या डोळ्यांत पाहताना एकदम तिला काय झालं कोण जाणे, तिने त्या दोघांच्यातलं अंतर संपवून टाकलं. तिने आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. किती प्रचंड सुंदर वाटलं तिला. तिच्या रंध्रा-रंध्रातून काहीतरी मोकळं होत होतं. त्यानेही तिला दुजोरा दिला. काही क्षण त्यांनी अंधाराचे आभारच मानले. आणि क्षणात एकमेकांपासून विलग होताना त्यांच्या डोळ्यांत एकमेकांविषयी अनोळखीचे भाव उमटले.तिला आज हा प्रसंग आठवला जवळ जवळ आठ महिन्यांनी. आपण त्यावेळी स्वत:ला रोखलं का नाही, असं वाटलं तिला. खरं तर त्याचं काही प्रेम नव्हतं का तिच्यावर ! त्यालाही ती खूप आतून आवडायची. तिचं इतकं बोलकं असणं, इमोशनल असणं आणि तरीही बॅलन्स्ड विचार करू शकणं आवडायचं त्याला खूप खूप. पण.. इतके सारे ‘पण’! हा विषय डोक्यातून काढून टाकावा म्हणून ती तिच्या पुस्तकाच्या कपाटाजवळ गेली. इतक्या प्रचंड गोंधळात एकमेव पुस्तकंच तर होती तिची म्हणावी अशी. घरात दुसरं कुणी भावंडं नाही. एकुलती एक मुलगी ही. आई-बाबा नोकरी करणारे. लहानपणी आजीने सांभाळलं आणि मग आजी वारल्यावर तर ती एकटीच दिवस दिवसभर घरी राहू लागली. शाळा-कॉलेज, मित्र-मैत्रिणीसोडून तिचं हक्काचं घर म्हणावं तर ते तिची पुस्तकं होती. पुस्तकांवर तिनं खूप खूप प्रेम केलं आणि पुस्तकांनी तिला भरभरून दिलंही. तिला एकदम आपण पुस्तकांचा कप्पा आवरावा असं वाटलं. म्हणून ती एक एक पुस्तक काढू लागली. आणि तिला एकदम त्यानं तिला गिफ्ट केलेली डायरी दिसली. तिनं डायरीचं पहिलं पान उघडलं आणि तिचे डोळे एकेका शब्दावरून हळूहळू फिरत राहिले..‘किती दिवसापासून हुरहुर लागून राहिली होती. कधीतरी जाऊन त्याला आपल्या मनातलं सांगून टाकावं असं वाटतं होतं. माझ्यासमोरच्या बेंचवर बसलेला तो, त्याच्या मित्रांशी बोलताना,वर्गात धडाधड उत्तरं देणारा, कधी खूप कॉँफीडण्ट- कधी बावरणारा, त्याची ही सगळीचं रुपं किती आवडतात मला. मला कळत नव्हतं पण मी कसं व्यक्त व्हावं! तो दूर जाण्याची भीती वाटत होती मला. म्हणून सांगून टाकलं मी आज. मी त्याला बाजूला बोलवून घेतलं.मी : मला तुझ्याशी बोलायचं होतं जरा.तो : हं..मी : म्हणजे.. हं...तो प्रश्नार्थक नजरेने पाहात राहिला. गोंधळलाच होता तो. मला एकेक्षणी हसूच आलं. मग मी म्हटलं..मी : मला आवडतोस तू. माहीत नाही का, पण तुझं वागणं-बोलणं आवडू लागलंय मला. आत्ताच मी तुला सांगायला हवं मी हे, असं वाटलं. म्हणून बोलतेय.आणि मी निघून आले. खरं तर मला त्याला काय वाटतं माझ्याविषयी हे जाणून घ्यायचं होतं; पण एकतर मी स्वत:च इनिशिएटिव्ह घेऊन बोलले होते आणि आता पुन्हा मीच थांबायचं ऐकायला, माझ्या जिवावरच आलं होतं. मला समजत होतं खरं तर की त्यालाही मी आवडतेय. आमची नजरानजर झाली की मला समजायचं त्याला माझ्याविषयी काय वाटतंय ते. मग मला खूप आनंद व्हायचा. समजायचंच नाही काय करू ते.दुसºया दिवशी त्यानं माझ्याकडे नजर टाकली आणि तो गोड हसला, जणू त्याला मी आवडत असावी. आणि मग लेक्चर बंक करून आम्ही दोघंही वडाच्या पाराशेजारी बसलो. काही बोलत नव्हतो आम्ही; पण बहुतेक खूप काहीतरी बोलत होतो.मग मी अचानक म्हटलं त्याला, ‘तुला आवडते ना मी?’त्यानं चोरून माझ्याकडे पाहिलं. तो असं का वागतोय काय माहीत. पण मला त्याचं हे वागणंदेखील आवडतं. खरंखुरं वाटतं.- डायरीतलं हे पहिलं पान वाचून तिच्या लक्षात आलं की आपण अधिकच त्याच्यात गुंतत चाललोय. जवळजवळ दोन महिने झालेत तो निघून गेला.. मी का पुन्हा पुन्हा त्यात अडकते. का स्वत:लाच कैद करून घेते बंदिवासात, हे तिला कळत नव्हतं. मग रागात अचानक तिने तिची डायरी गादीवर आदळली. अन तिच्यासमोर डायरीतलं शेवटचं पान आलं..‘ फक्त जात वेगळीये. घरातले लोक ऐकणार नाहीत. आई-बाबा आपल्याला सामावून घेणार नाहीत या भीतीपोटी हा मला सोडून जाऊ शकतो? माझ्याशी काहीही न डिस्कस करता? हे काय कारण झालं? कधी मोठी भांडणं झाली नव्हती. काहीही मोठा प्रॉब्लेम नव्हता. हो, पण अडचण ही होती की, घरी गेला की, तो एकही मेसेज करायचा नाही मला. अगदीच कधीतरी न रहावून लपून छपून करायचा. कॉलेजसाठी बाहेर पडला की मग मला फोन करायचा; पण मग घरच्यांनी कुणी सोबत पाहिलं तर त्याला भीती वाटायची. म्हणून आम्ही लांब भेटायचो. काही काळ हे चालू शकतं; पण त्या सगळ्याचा इतका मोठा परिणाम होईल असं नव्हतं वाटलं मला. का तर घरचे रागवतील. आपलं नातं संपुष्टात आणतील. पण मग हे माहीत होतं इतक्या खात्रीने तर आधी का नाही सांगितलं? हे सगळं कसं समजून घ्यावं मी? सगळीकडे मीच इनिशिएटिव्ह घेत होते, का घेत होते मी? मला कळत नव्हतं का? घरच्यांविषयीची ही भीती, काळजी मला समजत नव्हती असं नाही; पण म्हणून एकत्र राहण्याच्या स्पेसवरच गदा यावी असं काय होतं? कधीतरी पुढं येऊन बोलणं तरी गरजेच होतं; पण जी व्यक्ती माझ्याशीच नीट बोलू शकली नाही तिला मी काय बोलणार.. ’आणि मग पुढे गिरगोट्या काढून तिने डायरीचं ते पान संपवलं होतं. ती त्या गिरगोट्ट्यांकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली. तिला डायरी बंद करायची होती; पण..खूप सारे ‘पण’आड येत होते.
डायरीतल्या गिरगोट्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 8:16 PM