शाळेतल्या पुस्तकातलं नदीत उभं राहून मासा खाणारं पाणमांजराचं चित्र आठवतंय का? याच पाणमांजरावर म्हणजे ऑटरवर गोव्यातल्या एका मुलानं अभ्यास करायचा ठरवलं. अतुल बोरकर त्याचं नाव. पुस्तकात एखादा फोटो पाहण्यापलीकडे आपल्याला या प्राण्याची काहीच माहिती नसते. एकतर ऑटर संख्येने अगदी कमी उरलेत आणि नद्यांच्या आजूबाजूची परिसंस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे ते दिसणंही अगदीच दुरापास्त झालं आहे.
त्याचं झालं असं, अतुलचं सगळं बालपण एका लहान गावामध्येच गेलं. बाहेर हुंदडणं, निसर्गात फिरणं हेच त्याचे छंद झाले. मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यावर त्यानं वन्यजीवांच्या क्षेत्रातच काहीतरी काम करायचं ठरवलं. सुरुवातीच्या काळामध्ये त्यानं एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीही केली; पण नंतर मग वन्यजीव क्षेत्रात काम करायचा निर्णय घेतला. इंजिनिअर होऊनही असं काम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्याच्या पालकांना काळजी वाटणं साहजिकच होतं. पण साधारण वर्षभर समजावल्यावर त्याला घरच्यांनी परवानगी दिली.आपल्याकडे पाणमांजरांवरती फारसा अभ्यास झाला नसल्याचं लक्षात येताच त्यानं हाच विषय अभ्यासासाठी निवडला. पाणमांजर हा पाणी आणि जमीन असा दोन्ही ठिकाणी राहात असल्यामुळे त्यांची संख्या किती, त्यांचं वर्तन, सवयी, आहार याबाबत फारशी माहिती मिळवणं कठिण असतं; पण अतुलनं हेच आव्हान स्वीकारलं. त्यानं वाइल्ड ऑटर्स नावाची संस्था आणि संकेतस्थळाची स्थापना केली आणि काम सुरु केलं. पाणमांजरांची संख्या कमी होत असल्याचं लक्षात आल्यावर त्यानं नदीच्या आसपासच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचा समावेश असेल असं एक पाणमांजरं वाचवण्याचं मॉडेलच तयार केलं.
तो सांगतो भारतामध्ये पाणमांजराच्या तीन प्रजाती आढळतात, एक स्मूथ कोटेड ऑटर, दुसरे एशियन स्मॉल क्लॉड ऑटर आणि तिसरे युरेशियन ऑटर. यातलं स्मूथ कोटेड ऑटर मोठ्या नद्यांमध्ये आणि खारफुटीच्या जंगलामध्ये राहातं. एशियन स्मॉल क्लॉड ऑटर जंगलांमधील उथळ ओढ्यांजवळ आढळतं तर युरेशियन ऑटर हे वेगवान प्रवाहांच्या जलप्रवाहांजवळ दिसतात. यातलं स्मूथ कोटेड आणि युरेशियन ऑटर हे प्रामुख्याने मासे खातात, तर एशियन स्मॉल क्लॉड ऑटर खेकडे, कोळंबी, झिंगे खाऊन जगतात. पण नदीच्या पात्रावर होत असलेलं आक्रमण आणि नदीपात्राच्या जवळ होत असलेली बांधकामं यामुळे या पाणमांजरांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर गाड्यांच्या चाकाखाली येऊन मेलेली पाणमांजरंही दिसून येतात. तसेच नद्यांमधले मासे कमी झाल्यामुळेही त्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसते.
अतुलने त्याच्या काही मित्र-मैत्रिणींबरोबर गोव्यामध्ये चोडण बेटावर एका केंद्राची स्थापना केली आहे. ज्या पर्यटकांना पाणमांजरं आणि निसर्गाबद्दल माहिती मिळवायची आहे असे पर्यटक त्याच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. विविध प्रकारच्या कार्यशाळाही आयोजित केल्या जातात.
ऑटर अभ्यास प्रकल्पाच्या अंतर्गत गोव्यातील मॅन्ग्रोव्ह जंगले आणि नदीपात्रातील पाणमांजरांचा अभ्यास त्याच्या समूहाने पूर्ण केला आहे. यातून विविध भागांमध्ये ऑटरची किती संख्या आहे, त्यांचे वर्तन, हालचाल करण्याच्या जागा, सवयी, आहार याबद्दल त्यांनी निरीक्षणे नोंदविली आहेत. अतुल म्हणतो, हे फक्त पाणमांजरं वाचवण्याचं काम नाही तर त्याच्यासंबंधित नदीजवळ राहणाºया सर्व लोकांशी संबंधित असणारा मुद्दा आहे. यावर जितका जास्त अभ्यास होईल तितकं चांगलं.