- मुलाखत : साहेबराव नरसाळे
गावोगावी, दुर्गम खेडोपाडीही अनेक तरुण-तरुणी निवडून आले.
त्यांच्या डोळ्यात विकासाची स्वप्नं आहेत, गाव बदलाची आसही आहे, मात्र त्या साऱ्याला कृतीची जोड कशी द्यायची,
हे सांगताहेत राज्याच्या आदर्श गाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार.
१. प्रथमच निवडून आलेल्या, पंचविशीतल्या तरुण उत्साही ग्रामपंचायत सदस्यांना काय सांगाल?
सर्वप्रथम त्यांना उत्तम काम करण्यासाठी शुभेच्छा. त्यांनी पुढील पाच वर्षांचा विचार करून, आपलं गाव डोळ्यासमोर ठेवून आताच कामाचं नियोजन करावं, जास्तीत-जास्त वेळ गावात द्यावा, लोकांशी बोलावं, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, गावातील समस्यांचा अभ्यास करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावाचं आपल्याकडे लक्ष आहे, हे लक्षात ठेवावं. छोट्या-छोट्या कृतींचेही अनुकरण होत असतं. तेव्हा निर्व्यसनी रहावं, गावात उत्तम संवाद असावा, माणसं जोडावीत.
२. शासकीय योजनांची ओळख, अभ्यास कसा करावा?
प्रथम सदस्यांनी आपल्या गावांसाठी कोणकोणत्या योजना राबविता येतील, याची माहिती करून घ्यावी. जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे विविध योजनांच्या माहिती पुस्तिका असतात, त्या मिळवाव्यात. त्या बारकाईने वाचाव्यात. गाव विकासाच्यासंदर्भात शासनाचे वेगवेगळे आदेश, ग्रामविकास विभागाचे निर्देश शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ते वाचावेत. गावात एखादी योजना राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा कसा तयार केला जातो, याची माहिती करून घ्यावी. प्रस्ताव तयार करताना कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात, याची माहिती करून घ्यावी. जिल्हा परिषद, राज्य सरकार, केंद्र सरकार, आमदार व खासदार यांचा स्थानिक विकास निधी, उद्योगांकडून मिळणारा सीएसआर फंड मिळविण्यासाठी वेळोवेळी निघालेले शासन आदेश वाचावेत. विषय समजून घ्यावेत.
३. ग्रामसभा, तिथं बोलणं, लोकांना विश्वासात घेणं, यासाठी काय सुचवता येईल?
जर तुम्ही सरपंच झाला, तर ग्रामसभेच्या अजेंड्यावरील विषय गावातील सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ते लोकांना समजले पाहिजेत. ग्रामसभेत मतमतांतरे असतीलच. त्यातील चांगल्या सूचना ऐकून, समजून घ्याव्यात. लोकांच्या योग्य प्रश्नांना उत्तरं दिलीच पाहिजेत. विरोध करणारे काय म्हणतात, हे समजून घ्यावे. अधिकाऱ्यांना सभेला बोलवावे. कामाचं महत्त्व, त्यावरील खर्च आणि गुणवत्तेची हमी लोकांना द्यावी, आपल्याला काय वाटतं, यापेक्षा गावची गरज काय, लोक काय म्हणतात, हे पाहून त्यानुसार कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा. प्रत्येक कामाचं ग्रामसभेत सविस्तर विवेचन करावं. या कामाचा गावाला होणारा फायदाही सांगावा. योजना आल्यानंतर ग्रामसभेपुढे जमा-खर्च मांडावा. हिशेब स्पष्ट सांगावा. त्यातून लोकांच्या अनेक शंका दूर होतात. गुणवत्तापूर्ण कामे करण्यावर भर द्यावा. सरकारकडून नवीन कामांसाठी पैसा येतो, दुरुस्तीसाठी येत नाही. त्यामुळे कामे दीर्घकाळ टिकणारी असावीत.
४. ग्रामपंचायतीकडे किती निधी येतो, तो परत जाऊ नये म्हणून काय काय करता येतं, करता येईल?
ग्रामपंचायतींचा सर्वात पहिला आणि हक्काचा निधी म्हणजे स्वनिधी. विविध करांच्या व ग्रामपंचायत हद्दीतील इतर उत्पन्नाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला हा निधी मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वनिधी वाढविण्यावर भर द्यावा. दुसरा हक्काचा निधी आहे वित्त आयोगाचा. हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावाला मिळतो. त्याच्या विनियोगाची पद्धत शासनाने ठरवून दिली आहे. वित्त आयोगाच्या पैशाला स्वनिधीची जोड देऊन गावातील कोणतंही काम पूर्ण होऊ शकते. त्याशिवाय राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी प्रस्ताव व कामाचा आराखडा महत्त्वाचा ठरतो. हा प्रस्ताव पाहूनच सरकारकडून निधी मिळतो. वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून लोकांना थेट लाभ मिळवून देता येतो. त्याशिवाय गावविकासासाठी स्थानिक विकास निधी, सीएसआर फंड, नियोजन मंडळाचा निधी अशा असंख्य योजना आहेत. त्याशिवाय ग्रामविकास विभागाकडे असणारा २५/१५ चा थेट निधी गावांना मिळतो. हा निधी विकास आराखड्यानुसार मिळतो. त्यासाठी सरपंचांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. हा निधी अखर्चित राहू नये, यासाठी कामांचे योग्य नियोजन करून ती मार्गी लावावीत. प्रत्येक निधी खर्च करण्याचा कालावधी ठरवून दिलेला असतो. तो निधी त्याच कालावधीत खर्च करण्याला प्राधान्य द्यावा. कामे वेळेत झाली, तर गावाचा तुमच्यावरील विश्वास वाढतो. हा विश्वासच सरपंच, सदस्यांची खरी कमाई असते.