ठळक मुद्देआसामच्या नागाव जिल्ह्यातल्या धिंग तालुक्यातल्या कंधुलिमरी गावची मुलगी हिमा दास. बिनधास्त आहे. वार्यासारखी पळते. वार्यासारखीच वागते. तिला भीती नावाची गोष्टच माहिती नाही. तिला एकच गोष्ट दिसते, फिनिशिंग लाइन.रेस कुठलीही असो, सगळ्यांच्या पुढे जायचं एवढंच तिच्या डोक्यात. एरव्ही हे भिरभिरं नुस्तं खिदळताना दिसेल; पण एकदा प्रॅक्टिसला आली की, ती आणि तिचा वेग यापलीकडे तिला काही कळत नाही. स्वभावच असा की, सांगाल त्याला भिडते. तिच्या मनात भीती नाही, संशय नाही. म
मेघना ढोके
रेस संपली. सुवर्णपदक जिंकलं. तिरंगा अभिमानानं फडकू लागला. राष्ट्रगीताची धून कानावर पडताच तिच्या डोळ्यातून आनंदाच्या सरी बरसायला लागल्या. देशभरात आनंदोत्सव सुरू झाला. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून तमाम बडय़ा बडय़ा सेलिब्रिटींर्पयत सगळेच शुभेच्छा संदेश ट्विट करू लागले..टीव्हीवर ब्रेकिंग न्यूजमध्ये तिचं नाव झळकायला लागलं.. सेलिब्रेशनचा भर थोडा निवला तसा तिनं तिचे कोच निपॉनदांना फोन केला. काहीसा घाबरत, चाचरतच. निपॉनदा इकडे गुवाहाटीत. ती तिकडे यशाच्या शिखरावर. खूप इमोशनल झाली होती; पण सर काय म्हणतील, रागवतील की काय अशी मनात धाकधुकही होती. कारण तिच्या बेस्ट टाइमपेक्षा ही रेस जिंकायला तिनं काही सेकंद जास्त घेतले होते. तिला कळत नव्हतं, आता सरांशी काय बोलणार? खरं तर तिचे सर अत्यंत सुखावले होते, त्यांच्या शिष्येनं ते करून दाखवलं होतं जे आजवर कुणाही भारतीय अॅथलिटला जमलेलं नव्हतं. आणि सुवर्णपदकावर नाव कोरणारी ही 18 वर्षाची मुलगी डोळ्यात पाणी आणून फोनवरच सरांना विचारत होती, ‘सर, मोयं इमान डांगोर काम की कोरीलू?’ (म्हणजे, सर मी असं काय मोठंसं केलंय?) निपॉनदांना विचारलं की, मग तुम्ही रागवलात की काय तिला? तर ते ही पटकन हसून म्हणाले, ‘अभी किधर? बाद में देखते है.’आसामी माणसाच्या साध्या, नम्र, कष्टप्रद आणि मार्दवशील जगण्याची ही गोष्ट अशी उलगडत जाते. तुफान वेगवान मुलीची गोष्ट सांगणारे तिचे प्रशिक्षक शांतपणे सगळं सांगतात तेव्हाही आपल्या शिष्येनं फार काही मोठंसं केलंय अशी गर्वाची एकही रेष त्या संवादात उतरत नाही. अभिमान शब्दांत झळकतो; पण तो शिरजोर न वाटता भारी विनयशील वाटत राहतो. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षाखालील गटांत 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतासाठी पहिलंवहिलं सुवर्णपदक पटकावणारी हिमा ही पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. या अंतिम फेरीत हिमाने 400 मीटर अंतर 51.46 सेकंदांमध्ये पार करत अव्वल क्र मांक पटकावला. हिमा दास जिंकली तसा तातडीनं निपॉन दासना गुवाहाटीत फोन लावला. निपॉनदा आणि निबाजित मालकार हे तिचे दोन स्थानिक प्रशिक्षक. गुवाहाटीतले. निपॉनदांचं अभिनंदन केलं, त्यांना म्हटलं, ‘तुमची साथ लाभली हिमाला म्हणून हा दिवस उजाडला !’तसे ते हसले; म्हणाले, मै टीचर हूं, कोच का कामही होता है, अच्छा-बोडा अॅथलिट को चुनके ट्रेन करना, वो ही मैने किया. कोन बडा काम किया?’स्वतर्विषयी बोलण्यापेक्षा निपॉनदांना हिमाविषयी सांगायचं होतं.ते म्हणत होते, ‘उसको बस फिनिशिंग लाइन दिखता है, और कुछ नहीं दिखता, वो बोलता है सर आप सिर्फ टायमिंग बोलो, मै वो टायमिंग लाके दिखाता.’
आसामच्या नागांव जिल्ह्यातल्या धिंग तालुक्यातल्या कंधुलिमरी गावची ही मुलगी. हिमा दास.घरात सहा भावंडं. ही धाकटी. टॉमबॉय. एकदम बेधडक. पायात वेग असा की गावातली पोरं हिला फुटबॉल खेळायला त्यांच्यात घ्यायला घाबरत. तिथं भांडून खेळावं लागे. कारण तेच, हिचा वेग. हिच्या पायाला चिकटलेला चेंडू पोरांच्या हाताला लागत नसे. तिचा चुलतभाऊ फुटबॉल खेळायचा. दोघांची मोठी गट्टी. शाळेत रनिंग रेस व्हायच्या, त्यात हिनं भाग घ्यावा म्हणून त्याचा लकडा लागायचा. पण हिला पळण्यापेक्षा फुटबॉलमध्ये जास्त रस. फुटबॉल खेळायचा आणि इंडिया खेळायचं. तिला इंडिया जर्सीचं मोठं अप्रूप. ती बरोबरीच्या पोरांना कायम सांगायची, इंडियाचा टी-शर्ट मिळायला पाहिजे, असं काहीतरी करायचंय. पण क्रिकेटवेडय़ा भारतात या मुलीचं फुटबॉलर व्हायचं स्वपA कधी पूर्ण झालं असतं..? नशिबानं शाळेतल्या पीटी शिक्षकानंही सांगितलं की, तू भारी पळतेस. रेस खेळ. म्हणून ती खेळली. जेमतेम दीड वर्षापूर्वी हिमा पहिल्यांदा गुवाहाटीत आली. तिचं घर ते गुवाहाटी हे 134 किलोमीटरचं अंतर. आसामच्या हिरव्यागार पठारांतलं हे अंतर नकाशावर जेमतेम साडेतीन तासांचं; पण गुवाहाटी गाठणं हे कुणाही आसामी माणसासाठी एवढं सोपं नाही. 2016 मध्ये हिमा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गुवाहाटीत आली होती, तिथं निपॉनदांनी तिला पहिल्यांदा पाहिली. पण फार असामान्य असं काही त्याक्षणी तरी त्यांना तिच्यात जाणवलं नाही. लुकडीसुकडीशी पोर, बडबडी, ठसक्यात बोलणारी, बरी खेळली इतकंच.त्यानंतर कोईंबतूरमध्ये झालेल्या ज्युनिअर नॅशनल कॅम्पसाठी हिमाची निवड झाली. पहिल्यांदाच तिनं आसामच्या बाहेर पाऊल टाकलं. ट्रेनिंग नावाची गोष्ट शून्य. पायांत जेमतेम बूट. तंत्रबिंत्र या गोष्टीशी संबंधच नाही. एकदम रॉ. तिचा दुसरा प्रशिक्षक, निबाजित सांगतो, ‘त्या कॅम्पमध्ये ही पोरगी सगळ्यांशी गप्पा मारायची. सगळे तिचे दोस्त. आसामी पोरगी वेगात पळतेय हे पाहून तिथं बाकी लोक चकीत झाले. त्यावेळी ती 200 मीटर फायनल खेळली. तेव्हा निपॉनदा आणि मी स्टेट टॅलण्ट सर्चवरच होतो; पण तरीही ही पोरगी फार उत्तम खेळेल असं काही त्याही वेळी वाटलं नाही. डिसेंबर 2016ची ही गोष्ट. पुढे 14-15 जानेवारीला गुवाहाटीतच ऑल आसाम स्टेट लेव्हल अॅथलिट कॅम्प होता. त्यासाठी हिमा आली होती. 20 दिवस तो कॅम्प चालला. त्यावेळी तिचं सातत्य पाहून निपॉनदांनी ठरवलं की, आता या मुलीवर मेहनत करायची. हिच्यात ती धमक आहे.’पण हिमाला गुवाहाटीत ठेवणार कुठं हा प्रश्नच होता. त्याचा विचार नंतर करू म्हणत या प्रशिक्षकांनी तिला समजावलं की, तू ट्रेनिंग घेतलंस, तुझं तंत्र सुधारलं तर तू खूप पुढे जाशील !त्याहीवेळी तिनं त्यांना एकच विचारलं, इंडिया खेळता येईल का?हे म्हणाले, तेही जमेल; पण तू आधी गुवाहाटीत रहायला ये. घरी जा, पालकांना सांग, आणि ये!हिमाचे आईबाबा रोंजीत आणि जोमाली दास, ते काही तिला एकटीला गुवाहाटीत पाठवायला तयार नव्हते. गुवाहाटी हे प्रचंड गर्दीचं दमट शहर. आसामी माणसासाठी महागडंच. तिथं पोरीला ठेवणार कसं हा प्रश्नच होता. वडील नाहीच म्हणाले. निपॉनदा आणि निबाजित त्यांना भेटायला गेले तर त्यांनी एकच प्रश्न विचारला. निबाजित सांगतो, ‘वो बोले, बाकी रनिंग तो वो कर लेगा, पर उसका खाने का क्या? रहेगा किधर? दो टाइम भात और सर पे छप्पर कौन देगा?’या दोघांनी त्यांना सांगितलं की, ते आम्ही पाहतो. तसं त्यांनी केलंही. हे दोघेही आसामच्या क्रीडा आणि युवा संचालनालयात ‘नोकरी’ करतात. हिमाची सोय करायची म्हणून त्यांनी पदरमोड केली आणि सारुसजाय या अकॅडमीच्या जवळच एक खोली भाडय़ानं घेतली. तिच्या जेवणाखाणाची सोय निपॉनदाच्या घरीच केली. त्यात त्यांना डॉ.प्रतुल शर्मा यांनी साथ दिली. ते फिटनेस सांभाळायचं काम करत. डॉ. शर्माच्या घरी अनेकदा या मुलीच्या दोन्हीवेळच्या जेवणाची सोय झाली. ट्रेनिंग सुरू झालं. चार महिने जोरदार प्रशिक्षण झालं.निपॉनदा सांगतात, ‘उसमें टॅलण्ट तो है, पर उसको बाहरसे मोटिव्हेट नहीं करना पडता. ही पोरगीच बिनधास्त आहे, वार्यासारखी पळते. वार्यासारखीच वागते. तिला भीती नावाची गोष्टच माहिती नाही. तिला एकच गोष्ट दिसते, फिनिशिंग लाइन. रेस कुठलीही असो, सगळ्यांच्या पुढे जायचं एवढंच तिच्या डोक्यात. एरव्ही हे भिरभिरं नुस्तं खिदळताना दिसेल; पण एकदा प्रॅक्टिसला आली की, ती आणि तिचा वेग यापलीकडे तिला काही कळत नाही. डांटो तो कहती है, सर सिर्फ टायमिंग क्या लाना है, बोलो, मै देती हूं.!’त्या फिनिशिंग लाइनच्या दिशेनं ती धावत सुटली, परवाच्या रेसला तर तिच्या गावात लाइट नव्हते. रेसच्या वेळी नशिबानं वीज आली; पण मेडल सेरेमनीच्या वेळी पुन्हा गेली. गावात कुणालाही तो क्षण पाहता आला नाही. दुसर्या दिवशी मीडियावाले, राजकारणी, इतर गावचे लोक जमायला लागले तर घरातल्यांना टेन्शन की, यांना आता खायला काय घालायचं? सारं गाव मग सा (आसामी चहा) नी भात-कालवण रांधायला जुंपलं. तोवर आसामला तरी कुठं माहिती होतं की, आपल्या पोटात असा हिरा आहे. देशाला माहिती असण्याचा प्रश्नच नाही, आसाम जिथं कुणाला दिसत नाही तिथं ही आसामी पोर कुठं दिसणार होती?
हिमाची रेस अशी मैदानाबाहेरही जोरातच होती. पण विशेष म्हणजे केवळ दीड वर्षाच्या प्रशिक्षणानं ही मुलगी एकेक रेस जिंकत पुढे निघाली. 100, 200, 400 मीटर स्पर्धेत तिनं गेल्या दीड वर्षात अनेक मेडल्स जिंकली. गुवाहाटीत येऊन तीनच महिने होत नाही तो तिची खेलो इंडियासाठी निवड झाली. गुजरातच्या गांधीनगरमध्ये त्या कॅम्पला ती रवाना झाली. फेब्रुवारी 2017ची गोष्ट. 100 मीटर स्पर्धेत तिनं नॅशनल ब्रॉन्झ मेडल आणलं. त्या कॅम्पला जाईर्पयत हिमाने सिन्थेटिक रेसिंग ट्रॅक कधी पाहिलाच नव्हता. त्या ट्रॅकला स्पर्श करून पाहत तिनं तिकडून निबाजितला फोन केला. म्हणाली, आता जे काही करायचं ते या ट्रॅकवरच करून दाखवीन ! त्यानंतर गुजरातमध्येच झालेल्या स्पर्धेत तिनं 100 आणि 200 मीटर रेसमध्ये सिल्व्हर आणि ब्रॉन्झ मेडल आणलं. तिकडून ती परतल्यावर निपॉनदास आणि निबाजित स्पोर्ट अकादमीच्या संचालकांना भेटले. त्यांना या मुलीला होस्टेलवर राहू देण्याची विनंती केली. अकादमीत फुटबॉल आणि बॉक्सिंग खेळणार्या मुलींची रहायची सोय होती. पण अॅथलिट त्यातही धावपटू मुलीची सोय नव्हती. कारण आसाममधून कुणी धावपटू मुलगी इथवर येईल असं कुणाला वाटलंच नव्हतं. मात्र हिमाचं कौशल्य पाहून संचालकांनी तिला होस्टेलवर राहण्याची परवानगी दिली. राहण्याचा आणि दोनवेळच्या भाताचा तरी प्रश्न सुटला. जेमतेम महिनाभर होस्टेलवर राहून ती पुन्हा स्पर्धासाठी बाहेर पडली. हैदराबादला झालेल्या यूथ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिनं 100 मीटर स्पर्धेत ब्रॉन्झ तर 200 मीटर स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकल. त्यामुळे तिची एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाली. सोनीपतच्या कॅम्पसाठी ती रवाना झाली. तिकडून थेट बॅँकॉकला गेली. मे 2017 मध्ये झालेल्या या स्पर्धेत तिनं रौप्यपदक आणलं. आणि त्या टायमिंगच्या बळावर नैरोबीत होणार्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाली. त्यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये ते इस्ट झोनकडून खेळली आणि 200 व 400 मीटर स्पर्धेत तिनं सुवर्णपदकं कमावली. यावेळी पहिल्यांदा ती 400 मीटर धावली होती. हा प्रवास तपशिलात सांगायचं कारण, केवळ दीड वर्षातला हा तिचा वेग खरंच आश्चर्यकारक आहे. कुणाही अॅथलिटने, त्यातही रनरने इतकं सतत धावणं हे काही सोपं काम नाही.निबाजित सांगतो, ‘या मुलीचा स्वभावच असा की, तुम्ही सांगाल त्याला ती भिडते. तिच्या मनात भीती नाही, संशय नाही. मला जमेल का ही भावनाच नाही. शिकायची तयारी अशी की, जबरदस्त सराव करते. सहज म्हणते, मेडलच्या मागे मी धावत नसते, मी टायमिंगच्या पाठी धावते, ते जमलं तर मेडल माझ्या मागे धावतील !’निबाजित तसा तरुण, हिमापेक्षा काही वर्षेच मोठा. ही दोघं आणि त्यांचे अजून काही अॅथलिट दोस्त. या सगळ्यांचा आता एक ग्रुप झालाय. परस्परांना मॅचपूर्वी चिअरअप करत ते दोनच शब्द आसामीत सांगतात, ‘फाली दिया!’ ( म्हणजे, फाड डालो!’)परवा मेडल जिंकल्यावरही हिमानं दोनच शब्दांत निबाजितला मेसेज केला, फाली दिलू. (फाड डाला.!)आता तिकडून आल्यावर हिमा टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीला लागेल. भारत सरकारच्या टीओपीएस अर्थात टार्गेट ऑलिम्पिक पोडिअम स्किम या योजनेंतर्गत तिला 50 हजार रुपये विद्यावेतन मिळतं आहे. तिची ऑलिम्पिकची तयारी सुरू झाली आहे. त्याही स्पर्धेत तिला फक्त फिनिशिंग लाइन दिसो. या शुभेच्छांसह आपणही म्हणू. ..फाली दिया !
***
हिमा दासचे कोचनिपॉन दास आणि निबाजित मालकार म्हणतात,
प्लेअर के बिना कोच भी तो नहीं बनते.!
हिमा दासचे हे दोन प्रशिक्षक. निपॉन दास आणि निबाजित मालकार.निपॉन दास ज्येष्ट प्रशिक्षक. निबाजित हा तरुण मुलगा. जेमतेम 5 वर्षे झाली तो प्रशिक्षक म्हणून कॉण्ट्रॅक्ट बेसिसवर क्रीडा संचालनालयात नोकरीला लागलाय. हिमाच्या जिद्दीची जशी एक गोष्ट आहे, तशीच या दोघांचीही एक गोष्ट आहे. खेळण्याची, स्वप्नांची आणि पूर्णच न होऊ शकलेल्या विरलेल्या महत्त्वाकांक्षांचीही.निपॉन दास 1992 पासून क्रीडा संचालनालयात नोकरी करतात. प्रशिक्षक म्हणून. ते पूर्वी कबड्डी खेळत. जिम्नॅस्टिकही उत्तम खेळत. आसामच्या वतीने ते जिम्नॅस्टिकही खेळले. एकीकडे शिक्षण सुरू होतं. बी.एस्सी. झाले. पण खेळात काही करिअर पुढे सरकेना. सुविधा नव्हत्याच, प्रशिक्षणही नव्हतं. मग त्यांनी ठरवलं आपण शारीरिक शिक्षण विषयाची पदवी घेऊ. तोही कोर्स कोलकात्यात जाऊन केला. तिकडून आल्यावर कबड्डी कोचिंग सुरू केलं. अॅथलेटिक्स कोचिंग या विषयात मास्टर डिग्री मिळवली. नोकरी सुरूच होती. प्रशिक्षकपद होतंच. पण खेळाविषयीची कळकळ काही गप्प बसू देत नव्हती. उलट छळायची. चांगले खेळाडू घडले पाहिजेत, सापडले पाहिजेत म्हणून ते राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कॅम्पला जाऊन जाऊन मुलं हुडकून आणायचे.निपॉनदा सांगतात, आता शहरांत काय झालंय मुलांचं सगळं लक्ष अभ्यासावर, म्हणजे खरं तर डिग्य्रांवर. त्यांना वाटतं, खेळून वेळ वाया जातो. खेळायचं तरी ज्यात यश चटकन दिसतं, ते खेळ मुलं खेळतात. पण त्यातही गांभीर्य कमीच. निदान खेडय़ात तरी अस्सल खेळाडू सापडतील, ते रॉ टॅलण्ट खेळात नाव कमवेल अशी आशा वाटते. पण अशी खोटी आशा मनाला किती दिवस तगवून ठेवणार? आपल्याकडे खेळाला कुणी प्रतिष्ठेनं पाहत नाही. माझ्या मनात एक गोष्ट घर करायला लागली होती की, आता सोडून देऊ आपण कोचिंग. कशाला हे करत बसायचं? त्यापेक्षा काही टेक्निकलचं काम करू. त्यात आता बरे दिवस आहेत.माझ्या मनावर नैराश्य दाटलेलं असताना मला हिमा सापडली. तिचं कोचिंग सुरू केल्यावर वाटलं की, ही मुलगी काहीतरी भन्नाट करून दाखवेल. मी तिला ट्रेनिंग दिलं, तिनं मला उमेद दिली. त्या योग्य टप्प्यात ती सापडली नसती तर मीच कोचिंग सोडून दिलं असतं. प्लेअर के बिना कोच भी तो नहीं बनते.!’ निपॉनदा थोडक्यात बरंच काही सांगतात.तीच कथा निबाजितची. हा मुलगा खेळाडू. खेळावर प्रेम. पण त्याच्याच शब्दात सांगायचं तर, ‘हिमा जैसा फोकस मेरा कभी नहीं था, कभी स्पोर्ट किया, कभी म्युझिक, पर एक भी ठीक से नहीं किया.’ कोलकात्यात कामाच्या शोधात गेला. तिथं विप्रोच्या कॉलसेण्टरमध्ये काम केलं. एका हॉटेलमध्ये फ्रण्ट ऑफिस जॉब केला. त्याचकाळात त्याला या कोचिंगच्या डिप्लोमाची माहिती समजली. तो त्यानं पूर्ण केला. आसामच्या क्रीडा खात्यात कॉण्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरीही लागली. त्यानंतर काही दिवसांत त्यांना हिमा सापडली.निबाजित सांगतो, ‘मला स्पोर्ट्समध्ये काही यश आलं नाही. करायचं बरंच काही होतं; पण जमलं नाही. आता मी माझा फिटनेस सांभाळतो. आसामामधल्या टॅलेण्टेड मुलांना योग्य प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून निपॉनदाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. एक आसामी मुलगी इण्टरनॅशनल गोल्ड मेडल जिंकते, हे म्हणजे माझ्यासारख्या अनेकांचं स्वपA पूर्ण झाल्यासारखं आहे. जे इथं कुणालाच जमलं नाही, ते हिमानं केलं. आता आम्हाला वाटेल की, आपल्यालाही जमेल काहीतरी ! हिमा म्हणते ना, मोयं जय! म्हणजे मला हवंय! तसंच आता मलाही हवंय, फोकस होऊन कोचिंगमध्ये भरपूर काम करणं.’- एक झळाळतं यश किती माणसांना जगण्याची उमेद देतं, याची ही गोष्ट आहे.
( लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)
meghana.dhoke@lokmat.com