फट फट फट फट.. करत ऐटीत तो त्याच्या सुपरबाईकवरून दिल्लीच्या मैदानावर खेळायला यायचा तेव्हा येणारा जाणारा प्रत्येक जण त्याच्याकडे आणि त्याच्या रुबाबाकडे पाहायचा. त्यांना त्याचा हेवाही वाटायचा. अंगात स्लीवलेस टी शर्ट. खाली शॉर्ट. दोन्ही हातांवर, पाठीवर. अंगावर प्रत्येक ठिकाणी कोरलेले टॅटूज. अस्सल रावडी लूक आणि बॉडी. तसलंच बेदरकार हसणं. अख्ख्या जगाला ओवाळून कचर्यात टाकल्यासारखं त्याचं चालणं. चेहर्यावर मग्रुरी नाही, पण एक वेगळीच बेफिकिरी. त्याच्या या वागण्याचं, त्याच्या सुपरबाईकचं सगळ्यांनाच कौतुक वाटायचं. ही बाईक त्यानं खास स्वतर्साठी बनवून घेतली होती.
कस्टमाईज्ड बाईक. एक हजार सीसीची ! त्याच्यासारखीच रांगडी. दणकट.
ज्या मैदानावर तो क्रिकेट खेळायला यायचा, तिथेच भारतीय क्रिकेट संघातून खेळलेला एक प्रसिद्ध क्रिकेटपटूही यायचा.
त्यानंही एकदा त्याला नवलाईनं विचारलं,
‘बेटा, ये बाईक कितने को खरिदी आपने?
‘पच्चीस लाख’ !
‘फिर मर्सिडिज क्यूं नही ले लेते?
‘वो भी खरीद लेंगे सर.’
- दात दाखवत, मनमोकळं हसत आणि तेवढय़ाच बेदरकारपणे त्यानं सांगितलं.
काही र्वष लोटलीत या घटनेला.
पण दिल्लीच्या मैदानावर क्रिकेट खेळायला, पाहायला येणार्या पोराटोरांमध्ये आणि दिल्लीच्या क्रिकेट सर्कलमध्ये त्याचं नाव एकदम हीट होतं. पोरांमध्ये त्याची क्रेज होती आणि त्यांच्या बोलण्याचा विषयही तोच होता.
कोण हा मॅचो मॅन?
**
क्रिकेट त्याच्या रक्तात होतं.
येताजाता फक्त क्रिकेट.
एका तुफानी बॉलनं एकदा मैदानावर त्याचं थोबाड फुटलं. बेकार फुटलं. तोंडातून रक्त वाहायला लागलं. तोंडाची पार वाट लागली. ते बेढबही दिसायला लागलं.
‘होता है’.
- त्याला अर्थातच त्याची काही फिकीर नव्हती.
पण काही मित्रांनी त्याला सल्ला दिला.
‘तू दाढी-मूॅँछ क्यों नहीं रखता?’
त्यालाही त्याचा होकार नव्हता किंवा नकारही नव्हता.
‘ठीक है, रखता हॅँू. अच्छा लगा तो रखूंगा, नहीं तो छाट दॅूंगा’. असं म्हणून त्यानं दाढी-मिशा राखायला सुरुवात केली.
हे नवं रुपडं त्याला बरं वाटलं, नंतर आवडायला लागलं.
मग ती त्याची आणखी एक ओळख झाली.
तो आता आणखीच ‘मॅनली’ दिसायला लागला.
कारण तो तसा होताच.
कोण हा मॅचो मॅन?
**
भज्जीनं एकदा एका मुलीशी त्याची ओळख करून दिली. हो तोच भज्जी. हरभजनसिंग.
कोण होती ही मुलगी? कुठे भेटली ती त्याला?
भज्जीनं हे ‘फिक्सिंग’ कुठे करून दिलं?
- सोशल नेटवर्किग साईटवर.
फेसबुकवर.
कारण फेसबुकवर ती त्याची कॉमन फ्रेंड होती.
या यादीत मग तोही सामील झाला.
तिला मेसेज टाकायला लागला. कमेण्टायला लागला. तीही तसंच करायला लागली. दोघांना एकमेकांची भाषा आवडायला लागली. मग ते अधूनमधून प्रत्यक्ष भेटायलाही लागले.
हे भेटणंही त्यांना आवडायला लागलं आणि एक दिवस त्यानं तिच्याशी लग्नच केलं.
तिचं नाव आएशा मुखर्जी.
आधीच्या लग्नपासून तिला दोन मुली आहेत. दोन्हीही शाळेत जातात. ऑस्ट्रेलियात.
अनेकांनी त्याला हटकलं. ‘अशा’ लग्नापासून त्याला परावृत्त करायचा प्रयत्न केला.
पण त्यानं सगळ्यांनाच ‘हाड’ केलं आणि जे करायचं तेच केलं.
आएशाचे वडील बंगाली तर आई ब्रिटीश.
ती स्वतर् ऑस्ट्रेलियात राहते.
तीही एक हौशी बॉक्सर आहे.
आएशा सांगते, कायम ‘सरप्राईज’ देणार्या या रांगडी माणसाची अशी एकही गोष्ट नाही, जी मला आवडत नाही. त्यामुळेच तर मी त्याच्या प्रेमात पडले आणि त्याच्याशी लग्न केलं.
लोकांना फाटय़ावर मारत दोन मुलं असलेल्या बाईशी लग्न करणारा कोण हा मॅचो मॅन?
**
इतरांना ‘तलवार’ वाटणारी त्याच्या हातातली बॅट त्याला ‘खेळणं’ वाटते. 2004च्या अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये त्यानं तब्बल तीन शतकं ठोकली. त्याच्याबरोबर त्याच संघात असलेले विराट कोहली, सुरेश रैना, आरपी सिंग कधीच भारतीय संघात आले आणि स्थिरावले. त्याची ‘संधी’ हुकली. आपल्याबरोबरची ‘पोरं’ भारतीय संघात आणि आपण ‘बाहेर’ म्हणून त्याला वाईटही वाटायचं, पण तो म्हणतो, मी ते फारसं मनावर घेतलं नाही. मैं हमेशा खुश रहा. गलती मेरीही होगी, इसलिए गलतियॉँ सुधारता रहा. ए ऐसी रेस है, जो कभी खतम नहीं होती. इसलिए दौडता रहा.
त्याच्या दौडीचं फळ ‘शेवटी’ त्याला मिळालंच. ‘चान्स’ मिळाला. त्यानं मिशांना ताव मारला, ‘संधी’ला एक सणसणीत टोला हाणला आणि कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच मॅचमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला. आणखीही बरंच काही त्यानं केलं.
कोण हा मॅचो मॅन?
**
शिखर धवन.
‘बब्बर’ म्हणतात त्याला त्याचे टीममेट.
मैदानात मिशांना ताव मारत बेदरकारपणे फिरणार्या या बब्बर शेरनं अख्ख्या भारताला वेड लावलं. गुळगुळीत सफाचट करून फिरणारी कॉलेजगोईंग पोरंही दाढी-मिशा वाढवायला लागले. मिशांना पिळ मारू लागले. या ‘दबंग’ची कॉपी करायला लागले.
शिखरच्या मिशा म्हणजे आता एक स्टाईल स्टेटमेंट झालं आहे. दिल्लीच्या क्रिकेट सर्कलमधली त्याची क्रेज आता भारतीय क्रिकेटपटूंमध्येही पसरली आहे.
कॉलेजच्या पोराटोरांचं सोडा, इंडियन क्रिकेटचा ‘सर’ रवींद्र जडेजानंही त्याची स्टाईल सहीसही उचलली आणि तोही आता येताजाता मिशांना ताव मारताना दिसतो आहे.