शिष्ट-अशिष्ट
एक्झिट इण्टरव्ह्यू होतात, माहितीये ना?
नोकरी सोडताना विचारतात, कंपनीत तुम्हाला काय-कसा अनुभव आला?
त्यात अनेकजण जे काय फ्रस्ट्रेशन असेल ते व्यक्त करून मोकळे होतात.
मग पुढच्या कंपनीत जातात.
इथवर सगळं ठीक चालतं. पण अनेकदा नव्या कंपनीचे एचआरवाले जुन्या कंपनीच्या एचआरला आपल्या वर्तणुकीविषयी विचारतात.
अशी विचारणा झाल्यावर त्या संबंधित व्यक्तीविषयी व्यक्तिगत काय सांगायचं ते सांगतातच एचआरवाले, मात्र सरसकट काही कारणं अनेकांच्या संदर्भात सारखी दिसतात, असं एका एचआर फर्मचं म्हणणं आहे.
त्यात एचआरवाल्यांनी दोन अचूक निरीक्षणं केली आहेत.
ती सांगितली तर आपल्याकडे कुणालाही वाटेल की, त्यात काय एवढं?
पण नव्या कार्पोरेट जगात या लहानसहान गोष्टी भलत्याच संदर्भानं घेतल्या जातात आणि मग नको ते ठप्पे टॅलेण्टेड माणसांच्याही वाटय़ाला येतात.
त्या या दोन गोष्टी.
ज्या नव्या व्यावसायिक जगात काम करताना लक्षातही ठेवायला हव्यात आणि टाळायलाही हव्यात.
1) अनरिझनेबल नॉईज
बाकी सगळं चांगलंय पण खूप मोठय़ानं बोलतो. फोनची रिंगटोन मोठी आहे. मोठय़ानं हसतो. लोक काम करत असतात तेव्हा याची खाटखूट सुरूच. फोनवर मोठमोठय़ानं बोलत हिंडतो.
जेवताना तोंडाचा आवाज करतो. चालताना चपला-बुटांचा फार आवाज करतो.
- अशी अनेक कारणं या अनरिझनेबल नॉईज नावाच्या कारणाखाली सांगितली जातात.
खरंतर या किती क्षुल्लक गोष्टी वाटाव्यात एरवी, पण त्या अशावेळी फार महत्त्वाच्या ठरतात. कारण ठप्पा बसतो की, कामाला तसा चांगला आहे, पण मॅनर्स नाहीयेत!
नव्या काळात हे मॅनर्स ही पण मोठी गोष्ट मानली जाते ना, कारण पुन्हा इतर कर्मचा:यांनी तक्रार नको करायला की, या नव्या माणसाच्या वागण्यानं आम्हाला त्रस होतो.
2) कॉन्फरन्स कॉलवरची बडबड
हल्ली कॉन्फरन्स कॉलवर बोलणं हे तसं नव्या नोकरीचा भाग झालंय. वेगवेगळ्या शहरातली माणसं एकाचवेळी मोबाइलवर किंवा ऑफिसमधल्या फोनवर कॉन्फरन्स कॉल करून नियोजन करतात. चर्चा करून काम करतात. मात्र या कॉन्फरन्स कॉलवर कसं बोलावं, आपण कधी आणि किती बोलावं याचे काही सांकेतिक नियम असतात. म्हणजे सदासर्वदा तेच नियम खरे असं काही नसतं. मात्र तरीही बॉस बोलत असताना आपण मधेच बोलू नये. आपल्याला बोलायचं असेल तर आधी खुणोनं तसं सुचवावं बरोबरच्यांना. पलीकडचा माणूस बोलत असेल तर त्याचे मुद्दे तत्काळ खोडून काढू नयेत. त्याला बोलणं पूर्ण करू द्यावं.
असे साधारण संकेत असतात. काहींना मात्र हेच कळत नाही. ते मधेच बोलतात. खूप बोलतात. इतरांना बोलूच देत नाहीत. मधेच हसतात. चर्चा सुरू असताना लक्षच देत नाहीत अशा अनेक गोष्टी!
त्यावरून त्यांचं हसं तर होतंच, पण कुणी त्यांना सहजी कॉन्फरन्स कॉलवर घेत नाही.
एचआरवाले सहज सांगतात, उसको चूप रहना सिखाओ!
आपल्या म्हणण्याची किंमत कमी होते, हे यातून शिकायला हवं!
- मृण्मयी सावंत