- अमृता कदमकाही संस्थांच्या नावातच असा करिष्मा असतो की त्यांच्याशी जोडलं जाणं ही अभिमानाची, कौतुकाची बाब बनून जाते. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा अर्थात एनएसडी हे त्यांपैकीच एक नाव. नाटकातच स्वत:चं भविष्य घडवू इच्छिणाऱ्यांना एकदा तरी एनएसडीची पायरी चढावी अशी इच्छा असतेच. मग ती एनएसडीच्या वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये स्वत:चं नाटक सादर करणं असो, की तिथं होणाऱ्या वर्कशॉप किंवा इतर अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होणं असो.पण नाटकवेड्या कुणाला जेव्हा थेट एनएसडीतच प्रवेश मिळतो तेव्हा?तेव्हा एक स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद अवर्णनीय असतोच. एनएसडीच्या अवघ्या २६ जागांसाठी देशभरातून मुलं अर्ज करतात. यावर्षी देशभरातून निवडल्या गेलेल्या मुलांमध्ये पाच नावं ही महाराष्ट्रातल्या मुलांची आहेत. यात मराठी अस्मितेचा कुठलाही मुद्दा नाही, पण एनएसडीसाठी सिलेक्ट होणं हेच एक अवघड काम असतं. आणि तिथं पोहचण्याचा स्ट्रगलही मोठा असतो. त्यामुळेच तिथवर पोहचणाऱ्या तरुण मुलामुलींचा झगडा काय असतो, हे जरा समजून घ्यावं असं वाटलं. एनएसडीमध्ये यावर्षी सलिम मुल्ला, स्नेहलता तागडे, अभिलाषा पॉल, आश्लेषा फड आणि अश्विनी जोशी अशी पाच मराठी मुलं निवडली गेली आहेत.त्यापैकी सलिम आणि स्नेहलताची भेट झाली आणि गप्पा रंगल्या.सलिम मूळचा कोल्हापूरचा, तर स्नेहलता नागपूरची. सलिमच्या वडिलांचा भाजी विकण्याचा व्यवसाय, तर स्नेहलताचे वडील रेल्वेमध्ये आहेत. दोघांच्याही घरी नाटकामधला ‘न’सुद्धा माहीत नाही. नाटक करून काय मिळणार, असा प्रश्न जिथे विचारला जातो अशा वातावरणात दोघंही वाढलेले. पण तरीही त्यांना लागलेला नाटकाचा किडा काही पाठ सोडेना!कसा घडला हा प्रवास याविषयी त्यांच्याशी मग गप्पा रंगल्या..एनएसडी का? या प्रश्नाचं स्नेहलचं उत्तर भन्नाट होतं.ती सांगते, माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नाटक हे फार उशिरा आलं. पण मला पहिल्यापासून दिल्लीचं आकर्षण. दिल्लीमध्ये एकदा तरी आपलं नाणं खणखणीत वाजलं पाहिजे, असं वाटायचं. म्हणून कॉलेजमध्ये गेल्यावर पहिला पर्याय निवडला एनसीसीचा. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावरच्या परेडमध्ये सहभागी होऊन परत येण्याचं आणि कॉलेजमध्ये अभिमानाने मिरवण्याचं स्वप्न होतं. दिल्लीमधल्या मेगा कॅम्पमध्येही सिलेक्शन झालं. पण काही कारणामुळे राजपथावरच्या संचलनाची संधी हुकली. ही हुकलेली संधी भरून काढण्यासाठी कॉलेजमध्ये सेकंड इअरला असताना एनएसएस जॉइन केलं. सोबतीला हॉर्स रायडिंग आणि अॅडव्हेंचर स्पोर्ट्सही सुरू. एनएसएसमध्येही हिला बेस्ट व्हॉलंटिअरचा अवॉर्ड मिळाला. हॉर्स रायडिंगच्या माध्यमातूनही दिल्लीला जाण्याचे प्रयत्न सुरूच होते. पण केवळ ‘सी’ सर्टिफिकेट असलेल्यांनाच कॅम्पमध्ये सहभागी होता येणार होतं. त्यामुळे पुन्हा एकदा ‘दिल्ली दूर’च राहिली.पण मग नाटक?स्नेहलता सांगते, कॉलेजमध्ये कराटे खेळण्याची प्रॅक्टिस करत असताना सरांनी तिला नाटकात काम करण्याबद्दल विचारलं. स्नेहलताचा आवाज एकदम बुलंद आहे. पहाडी छापाचा. म्हणूनच तिला या नाटकात एका राजस्थानी ठाकूरचा रोल मिळाला होता. त्यातही नाटकाच्याच दिवशी हॉर्स रायडिंग करताना तिचा अॅक्सिडेंट झाला. तसाच सुजलेला चेहरा घेऊन ही मुलगी स्टेजवर! या नाटकानंतर तिला अजून एका नाटकात रोल मिळाला, शिवाय गाणंही वाट्याला आलं. तिच्या वेगळ्या आवाजामुळे ही मुलगी सगळ्यांच्याच लक्षात राहिली. मग रवींद्रनाथ टागोरांच्या पोस्टमास्तर कथेवर आधारित नाटकात लीड रोल. त्यानंतर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत ‘मुघलांनी सत्ता दान केली’ या नाटकातल्या भूमिकेसाठी तिला अभिनयाचं तिसऱ्या क्र मांकाचं पारितोषिक मिळालं आणि मग खऱ्या अर्थाने स्नेहलताचं नाटक सुरू झालं. दरम्यान, ग्रॅज्युएशननंतर तिने एमबीएलाही अॅडमिशन घेतलं. त्याचवेळी तिला तिच्या सहकाऱ्याने एनएसडीसाठी का प्रयत्न करत नाही, असं विचारलं. पहिल्याच प्रयत्नात ती इंटरव्ह्यूमधून वर्कशॉपसाठी निवडली गेली. मात्र वर्कशॉपमधून शेवटच्या २६ जणांमध्ये काही तिची निवड झाली नाही. पण एनएसडी आणि त्यातही दिल्ली असं आकर्षण असल्यानं तिनं पुन्हा प्रयत्न सुरू केले.दुसऱ्या प्रयत्नात मुंबईमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेल्या स्नेहलताकडे तिथे राहायला जागाही नव्हती. ज्यावेळेस या प्रयत्नामध्येही सिलेक्शन झालंच नाही, त्यानंतर मात्र तिला अगदी डिप्रेशनच आलं. एमबीए पूर्ण करून ही मुलगी घरात बसलीये, ही काय करणार आहे, असे प्रश्न कानावर यायचे. मोठ्या बहिणीचंही लग्न झालंय. आता हिच्या पण लग्नाचा विचार करायला हवा, हे पण एक प्रेशर.स्नेहलता सांगते, ‘सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, दहावीपासूनच मी घरी पैसे मागणं बंद केलं होतं. मी डान्सर आहे. मी स्टेज शो करायचे आणि माझा पॉकेटमनी कमवायचे. मी काही वावगं करत नाहीये, याबद्दल मी ठाम होते.’आणि आता तिसऱ्या प्रयत्नात स्नेहलताचं एनएसडी सिलेक्शन झालंच.आणि दिल्लीमध्ये यायचं स्वप्नही पूर्ण झालंय.एनएसडीपर्यंत पोहचण्याच्या आपल्या धडपडीचं सार्थक झाल्यासारखं आता स्नेहलताला वाटतं आहे.सलिम शाळेत असल्यापासून नाटकामध्ये काम करायचा. पण त्यावेळीची नाटकं म्हणजे सगळा हौसेचाच मामला असतो. आपल्याला पुढे जाऊन हेच करायचंय वगैरे विचारही मनात नव्हतेच. शिवाय घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता बाकी काही नाही तर नोकरीचा विचार महत्त्वाचा होताच. दहावीनंतर सगळ्याच हुशार मुलांप्रमाणे तोही सायन्सलाच गेला. पण मग अकरावी-बारावीमध्ये कल्चरल अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला सुरु वात झाली आणि अभ्यास मागे पडत गेला. परिणाम बारावीला मार्क कमी. घरातही वडिलांच्या व्यवसायात, कुटुंबातही समस्या निर्माण झाल्या होत्या. सलिमच्या कमी मार्कांवर तीव्र प्रतिक्रि या उमटणं स्वाभाविकच होतं. तोही इतका निराश, हताश झाला की दीड दिवस घरातून गायबच झाला. त्यानंतर त्याने न्यू कॉलेजमध्ये बीएला अॅडमिशन घेतली. आता हा मुलाग बीए करणार म्हणजे कमावणार काय? असा प्रश्नही सगळ्यांना पडला. शिवाय तू तझ्या वडिलांना आता मदत केली पाहिजे वगैरे सल्लेही होतेच. पण सलिम म्हणाला, मी एका गोष्टीवर ठाम होतो. वडिलांना मदत करायची म्हणजे त्यांच्यासोबत भाजी विकायला नाही उभं राहायचं, तर त्यांना, कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर पडता येईल असंच काहीतरी करायचं. याच काळात सलिमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने नाटक आलं. आणि त्याचं श्रेय तो त्याचे गुरू अवधूत जोशींना देतो. एकदा नाटक काय आहे, हे उमजू लागल्यानंतर बीएनंतर त्यानं शिवाजी विद्यापीठातून नाट्यशास्त्राचा कोर्स केला. आणि नंतर लगेचच शिवाजी विद्यापीठातूनच मास्टर्सही केलं. मग विद्यापीठाच्या टीममधूनच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं सुरू झालं. जसजसं यश मिळत गेलं तसतसा आत्मविश्वासही वाढत गेला. त्याचवेळी अवधूत जोशींनी सलिमला एनएसडीबद्दल सांगितलं आणि त्याची तयारीही करून घ्यायला सुरु वात केली.सलिमसाठी मात्र एनएसडीची दारं पहिल्याच प्रयत्नात उघडली गेली. त्यासाठी त्याचे गुरू अवधूत जोशींची तर त्याला मदत झालीच; पण तो विशेष उल्लेख करतो, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांचा. एनएसडीच्या फॉर्मसोबत एक रेफरन्स लेटरही जोडावं लागतं. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या आणि सलिमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या अभिराम भडकमकर यांनी त्याला रेफरन्स लेटरही दिलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्याला विश्वास दिला. ज्यावेळेस इतरजण एनएसडी कशासाठी, हे काही आपल्यासारख्यांचं काम नाही, त्यासाठी भरपूर ओळखी, पैसा लागतो असं ऐकवून नाउमेद करायचे, त्यावेळेस अभिराम यांनी नक्की प्रयत्न कर.. होईल! असा भरोसा दिला.भाजीविक्रेत्याचा एक मुलगा या ओळखीपासून सलिम आता आपली स्वतंत्र ओळख कमवायला निघाला आहे..लेखिका मुक्त पत्रकार आहेत.
amritar1285@gmail.com$d$