-समीर मराठे
‘मी आकाशाचं स्वप्न पाहत होतो, ग्रह, तार्यांमध्ये रमत होतो, त्यासाठी केवळ एक छोटी दुर्बीण मला हवी होती; पण हे साधं स्वप्नही पूर्ण होईल, कधी सत्यात उतरेल, याची मुळीच खात्री नव्हती. मुख्य प्रश्न होता पैशांचा. दुर्बिणीसाठी खूप पैसे लागणार होते, अशातला भाग नाही; पण दोन वेळच्या नीट जेवणासाठीही आमची मारामार. त्यासाठी पाच हजार रुपये खर्च करणं, हे आमच्यासाठी खूपच ‘श्रीमंत’ स्वप्न होतं. आईवडील अंगठेबहाद्दर. शाळेचं तोंडही त्यांनी कधी पाहिलं नाही. झोपडपट्टीतलं आमचं घर. ना इंटरनेट, ना साधा मोबाइल. अक्षरशर् काहीही नव्हतं आमच्याकडे. आणि मी आकाशातल्या स्वप्नात रमलो होतो. अनेकांनी मला वेडय़ात काढलं; पण मी प्रयत्न सोडला नाही. त्याचं फळ मला मिळालंच.’दिल्लीच्या झोपडपट्टीत राहणारा, डोळ्यांत मोठी स्वप्नं असणारा आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तहान-भूक हरपून त्यापाठी धावणारा 19 वर्षाचा तरुण आर्यन मिश्रा झपाटल्यागत बोलत होता.पाच वर्षापूर्वी त्यानं एक लघुग्रह शोधून काढला आणि एका शाळेच्या मदतीनं खगोलशास्नची एक प्रयोगशाळाही तयार केली. सर्वसामान्य मुलांनाही खगोलाची आवड निर्माण व्हावी, किमान त्यांच्यार्पयत हा विषय पोहोचावा, यासाठी आपण केलेल्या कामाचं प्रेझेंटेशन त्यानं केंद्र सरकारचे प्रमुख विज्ञान सल्लागार के. विजयराघवन यांच्यापुढे मांडलं. त्यांनाही आर्यनचा हा प्रस्ताव पसंत पडला आणि चमत्कार घडला.झोपडपट्टीतल्या या तरुण मुलाच्या मागे थेट केंद्र सरकारच खंबीरपणे उभं राहिलं आणि येत्या दीड-दोन वर्षात देशातील तब्बल पाचशे केंद्रीय विद्यालयं आणि जवाहर नवोदय विद्यालयांत ‘लो कॉस्ट’ खगोल प्रयोगशाळा उभ्या राहणार आहेत. या उपक्रमाचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला असून, येत्या तीन महिन्यांत आठ नवोदय विद्यालयांत या खगोल प्रयोगशाळा उभ्या राहिलेल्या असतील. त्या अनुभवांतून मग टप्प्याटप्यानं देशभरात इतर ठिकाणी प्रयोगशाळा उभारल्या जातील.या सर्व प्रयोगशाळा आर्यनच्या मार्गदर्शनाखाली उभारल्या जातील हे या उपक्रमाचं सर्वात मोठं वैशिष्टय़.कसं घडलं हे?. झोपडपट्टीतल्या एका तरुण मुलाचं मार्गदर्शन थेट केंद्र सरकार घेतंय, ही घटनाच मोठी विलक्षण होती. त्यामुळेच आर्यनला गाठलं आणि त्याचा थरारक प्रवास जाणून घेतला.आर्यन सांगतो, ‘वडील घरोघरी वर्तमानपत्रं टाकायचे. त्यातून दोनवेळची पोट भरायचीही मारामार. मीही मग वडिलांना मदत करायला लागलो. बारावीर्पयत मी स्वतर्ही घरोघरी वर्तमानपत्रं टाकली. मला मुळातच खगोलशास्नची आवड होती. फुकट वाचायला मिळालेल्या वर्तमानपत्रांनी माझी ही आवड वाढवली. सातवीपासून मी खगोलाच्या अक्षरशर् प्रेमातच पडलो.’विज्ञान; त्यातही खगोलशास्नसंदर्भातल्या सगळ्या बातम्या, लेखांचा आर्यन फडशा पाडायचा. पण तेवढी माहिती त्याच्यासाठी पुरेशी नव्हती. त्यासाठी एकच मार्ग होता, तो म्हणजे इंटरनेट. पण घरी ना कॉम्प्युटर, ना इंटरनेट, ना मोबाइल.आर्यननं मग त्यासाठी सायबर कॅफेमध्ये जायला सुरुवात केली. पाच वर्षापूर्वी त्यासाठी एका तासाला दहा रुपये द्यावे लागायचे. आर्यननं मग त्याच्या आणखी एका मित्रात खगोलाची आवड निर्माण केली. हे दोघं मग सायबर कॅफेत जायचे. खर्च अर्धा अर्धा वाटून घ्यायचे. त्यामुळे तासाला पाचच रुपये लागायचे; पण त्यासाठीही जीव काढावा लागायचा आणि आठवडय़ातून जास्तीत जास्त तीनवेळा सायबर कॅफेवर जाता यायचं. इंटरनेटवरून बर्यापैकी माहिती मिळवल्यावर, तिथले फोटो, व्हिडीओ पाहिल्यावर आर्यनला आता एखाद्या खर्याखुर्या दुर्बिणीची गरज भासू लागली. पण आकाशनिरीक्षणासाठी साधी दुर्बीण घ्यायची तरी त्यासाठी ‘तब्बल’ पाच हजार रुपये लागणार होते. कसे आणायचे एवढे पैसे? आर्यननं भीत भीतच आईवडिलांना विचारलं. त्यांनी सपशेल नकार दिला. कारण त्यांच्यासाठी एवढी मोठी रक्कम डोईजडच होती. शिवाय या वेडापासून त्यांनी आर्यनला परावृत्त करण्याचाही प्रय} केला. पण खगोलाचं त्याचं वेड सुटत नाही म्हटल्यावर शेवटी त्यांनी आर्यनशी बोलणंही टाकलं. आर्यन सांगतो, ‘मी माझ्या सार्याच खर्चात बचत करायला सुरुवात केली. शाळा-कॉलेजात बसनं जावं लागायचं. मी बसनं जाणं सोडून पायी जायला लागलो. तेही पैसे वाचायला लागले. दीड-दोन र्वष पै-पैसे जमवून आणि काटकसर करून मी पाच हजार रुपये जमवले आणि त्यातून एक दुर्बीण घेतली! माझ्या आयुष्यातला तो सर्वोच्च आनंदाचा क्षण होता.’वयाच्या चौदाव्या वर्षीच आर्यन आणि त्याचा मित्र कीर्ती वर्धन यांनी अवकाशातला एक छोटा लघुग्रह शोधून काढला. त्यामुळे त्याचं खूपच कौतुक झालं. वर्तमानपत्रांत नाव छापून आलं. आर्यनच्या वडिलांची अख्खी हयात वर्तमानपत्रं वाटण्यात गेली, आजही ते हेच काम करतात; पण त्यांच्या घराण्यात कधीच कोणाचं नाव वर्तमानपत्रांत छापून आलं नव्हतं. आपल्या मुलाचं नाव पेपरांत छापून आल्यावर आर्यनच्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांना खूप आनंद झाला. त्या दिवसापासून आर्यनच्या स्वप्नाला असलेला घराचा विरोधही मावळला!.आर्यनचाही उत्साह वाढला. तो अधिक उत्साहानं आपल्या ध्येयाच्या मागे लागला. अॅस्ट्रॉनॉमर बनायचं त्याचं ध्येय आहे; पण त्याआधी खगोलातल्या साध्या साध्या गोष्टी, दुर्बीण, अवकाशातली गंमत खेडय़ापाडय़ातल्या गरीब मुलांर्पयत पोहोचावी, त्यांना त्याची गोडी लागावी हा त्याचा ध्यास आहे.आर्यन कळकळीनं सांगतो, ‘क्रिकेट खेळायचं, तर आधी बॅट-बॉल पाहिजे, फूटबॉल खेळायचा, तर चेंडू पाहिजे, ते मुलं कुठूनही मॅनेज करतात; पण आकाश पहायचं, तर ते कसं पाहणार?. मुलांना किमान एखाद्या छोटय़ाशा दुर्बिणीची तरी सोय हवी. त्यासाठी मग मी प्रयत्न सुरू केले.आर्यननं दिल्लीतल्या शाळा-शाळांमध्ये जायला सुरुवात केली. आपल्या आणि आपल्याला करायच्या कामाचं प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. शाळांनी आपल्या कॅम्पसमध्ये एखादी छोटीशी लॅब उभारावी, यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली.
शाळांना त्याचा उपक्रम पसंत पडायचा; पण 19 वर्षाचा तरुण मुलगा, हा काय करणार? उगाच आपला पैसा आणि वेळ वाया जाईल, असंच सगळ्यांना वाटायचं. आर्यननं शेवटी शाळांना सांगायला सुरुवात केली, हा प्रोजेक्ट फेल गेला, तर तुमची पै न् पै मी परत करीन. दिल्लीतल्या एका शाळेनं अखेर त्याच्या प्रयोगाला संमती आणि निधीही दिला. याच प्रयत्नतून ‘स्पार्क अॅस्ट्रॉनॉमी’ नावाचं आर्यनचं एक ‘स्टार्टअप’ उभं राहिलं आणि त्याच्या स्वप्नांना आकार येऊ लागला. दिल्लीतल्या दोन शाळा, याशिवाय पंजाब, हरयाणा, गुजरातमधील प्रत्येकी एकेक अशा पाच शाळांनी त्याच्याकडून खगोल प्रयोगशाळा तयार करून घेतल्या.उत्साह वाढलेल्या आर्यननं मग थेट केंद्र सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांना गाठलं आणि या उपक्रमाची आवश्यकता, महत्त्व त्यांच्या गळी उतरवलं. आणखी एक नवा टप्पा त्यानं गाठला. याच माध्यमातून ‘लो बजेट अॅस्ट्रॉनामी लॅब्ज’ आता शाळाशाळांत उभ्या राहणार आहेत. आर्यन ज्या शाळांना खगोल प्रयोगशाळा बनवून देतोय, त्यासाठी साधारण तीन लाख रुपयांचा खर्च येतो, इतर व्यावसायिक कंपन्या मात्र याच कामासाठी किमान बारा लाख रुपये आकारतात. आर्यन म्हणतो, ‘खगोल विज्ञान ही काही फक्त ठरावीक लोकांची मक्तेदारी नाही. खगोल अभ्यासकांचा एखादा गट, हाताच्या बोटावर मोजता येतील असे विज्ञान आणि गणिताच्या संदर्भातील काही लोक. यांच्यासाठीच केवळ खगोलशास्र नाही. अवकाश प्रत्येकाचंच आहे आणि त्याबद्दल जाणून घेण्याचा अधिकार जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. त्यातील किमान काही लोकांर्पयत जरी मला पोहोचता आलं तरी माझ्या प्रयत्नचं सार्थक होईल. त्यासाठीच मी प्रयत्न करतो आहे.’
************************
आईचे दागिने विकले, ‘पत्ता’ बदलला, मग मिळाली शाळेत अॅडमिशन!
आपल्या आजवरच्या प्रवासाविषयी आर्यन सांगतो, ‘माझे आईवडील अशिक्षित असले तरी, सुदैवानं मुलानं शिकावं आणि तेही उत्तम शाळेत, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. पण अशा शाळेत प्रवेश मिळणं हीच खूप मोठी गोष्ट होती. पहिलीच मुख्य अडचण होती, आम्ही राहात असलेल्या परिसराची. आम्ही झोपडपट्टीत राहातो, असं शाळेला कळलं असतं तर मला कदाचित अॅडमिशनच मिळाली नसती. त्यासाठी काय करता येईल म्हणून आईवडिलांनी खूप विचार केला, डोकं खाजवलं. आणि त्यांना एक युक्ती सुचली. माझे काका एका नामांकित वकिलांच्या बंगल्यावर वॉचमन म्हणून काम करायचे. माझं राहण्याचं ठिकाण म्हणून फॉर्मवर त्यांनी तोच पत्ता टाकला! एक मोठं काम झालं. पण अॅडमिशनसाठी पैसे कुठे होते? मग माझ्या आईनं तिचे दागिने विकले, फीसाठी पैसे उभे केले आणि मला शाळेत प्रवेश मिळाला! माझे जवळचे मित्र सोडले, तर मी झोपडपट्टीत राहातो, हे अजूनही अनेकांना माहीत नाही!’
इतर छंदांनीही पोहोचवलं आंतरराष्ट्रीय स्तरावर!
आर्यनला खगोल विज्ञानाची प्रचंड आवड असली तरी त्यानं स्वतर्ला त्या पुरतंच सीमित ठेवलेलं नाही. अॅस्ट्रोफोटोग्राफी, बीट बॉक्सिंग, समाजसेवा, स्पोर्ट्स यासारख्या अनेक विषयांत त्याला रुची आहे.2018 या वर्षाचं ‘द प्रॅमेरिका स्पिरीट ऑफ कम्युनिटी अवॉर्ड’चं सिल्व्हर मेडल त्यानं पटकावलं आहे, तर कम्युनिटी सव्र्हिसमध्ये विधायक बदल घडवून आणल्यामुळे 2016 मध्ये ‘इंटरनॅशनल पिस प्राइज’साठी त्याचं नामांकन केलं गेलं होतं. दिल्लीपासून जवळच असलेल्या सोनिपत (हरयाणा) येथील अशोका युनिव्हर्सिटीत आर्यन बी.एस्सी. फिजिक्सच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेतो आहे.
तीन लाख मुलांना दिलं प्रशिक्षण
आर्यनची खगोल विज्ञानातील प्रगती, त्याबद्दलचं त्याचं वेड आणि समाजातील छोटय़ातल्या छोटय़ा घटकार्पयत ही माहिती पोहोचावी, याबद्दलचा त्याचा ध्यास. या क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनाही भावला. त्यामुळेच या क्षेत्रातील दिग्गज सुनीता विल्यम्स, राकेश शर्मा, डॉन थॉमस, सॅम्युएल डय़ुरान्स आणि कै. कल्पना चावलाचे कुटुंबीय. यासारख्या महनीय व्यक्तींना भेटण्याची संधी आर्यनला मिळाली. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’नंही आर्यनच्या कामाची दखल घेतली आहे. आपलं स्वप्न केवळ भारतापुरतंच मर्यादित न राहता जगभरात ते पोहोचावं आणि सार्याच सर्वसामान्य मुलांना त्याचा लाभ व्हावा अशी आर्यनची तीव्र इच्छा आहे. आर्यनची या क्षेत्रातील घोडदौड पाहिल्यावर भारत आणि जगभरातील अनेक ठिकाणांहून त्याला व्याख्यानांची आमंत्रणं येतात. आपल्या व्याख्यानांतून आजवर तीन लाखांपेक्षाही जास्त मुलांर्पयत त्यानं खगोल विज्ञानाची माहिती पोहोचवली आहे. एवढंच नाही, अनेक शिक्षकांनाही त्यानं खगोलशास्नचं प्रशिक्षण दिलं आहे. ‘टेड एक्स’ या प्रतिष्ठित उपक्रमातही आर्यनला व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं.