-नम्रता फडणीस
‘स्मोकिंग इज इन्जुरस टू हेल्थ’ हे वाक्य सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतंच. अगदी टीव्ही-सिनेमातही एखादं पात्र जर स्मोकिंग करताना दाखविलं तर त्याखाली या वाक्याची पट्टी हमखास येतेच. पण ते पाहतं कोण, सार्वजनिक ठिकाणी धूर सोडणारे अनेक जण असतातच. त्यांना तर त्रास होतोच, पण पॅसिव्ह स्मोकर म्हणून बाकीच्यांनाही त्रास सहन करावाच लागतो.
पण कोण कुणाला सांगणार? मात्र पुण्यात तरुणांचा असा एक ग्रुप आहे जो एक शब्दही न बोलता अगदी शांतपणे, कोणताही वाद न घालता इतरांना त्यांची चूक दाखवून देतात. त्यांचं सूत्र एकच, फुका, पण फेकू नका. त्या ग्रुपचं नाव आहे, पुणे प्लॉगर्स. शहरातल्या विविध भागांमध्ये या गटाची तरुण मंडळी फिरतात. रस्त्यात जर एखादं सिगारेटचं थोटकं पडलं असेल तर ते त्याभोवती सुबक अशी रांगोळी किंवा एखादं वर्तुळ काढतात, मग तिथं त्याला जोडूनच , ‘बट व्हाय?’, ‘फुको, पण फेको मत’ अशी काही वाक्यं लिहितात. न बोलता निघून जातात. या अभिनव मोहिमेला त्यांनी नाव दिलंय #chalkofshame.
तरुणांची ही भन्नाट संकल्पना सध्या पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे.
या अभिनव मोहिमेविषयी ‘पुणो प्लॉगर्स’चा संस्थापक विवेक गुरव सांगतो, वर्षभरापासून आम्ही शहरात प्लॉगिंग करतोय. जॉगिंग करता करता रस्त्यावर पडलेले प्लास्टिक उचलतो. ते गोळा करता करता असं दिसलं की शहरात ठिकठिकाणी सिगारेटची थोटकं पडलेली आहेत. आता कोरोनाच्या काळात ती आम्ही उचलणंही धोकादायक आहे. मग आम्ही दिवाळीच्या दरम्यान ‘लाजेचं रिंगण’ नावाची जनजागृती मोहीम सुरू केली. लोकांना लाज वाटली पाहिजे की, सिगारेट पिऊन ते त्याची थोटकं रस्त्यावर फेकतात. घाण करतात. याचा अर्थ लोक जास्त पैसे मोजून हवा प्रदूषित तर करतातच; पण कचरादेखील करतात. एका सिगारेटच्या थोटकामुळे ५० लिटर शुद्ध पाणी टॉक्सिक बनते. अशी लाखो सिगारेटची थोटकं मुठा नदीपात्रात आढळून येतील. एरव्ही आम्ही ही थोटकं उचललीही असती, पण कोरोना इन्फेक्शनचं भय असलेल्या काळात ती उचलताही येत नाहीत. मग ती तिथेच ठेवून त्याभोवती रिंगण बनवत आम्ही जंगली महाराज रोडवरती हा उपक्रम राबवत आहोत. स्मोकिंग केल्यानं आरोग्याला हानी पोहोचते हे सगळ्यांना माहीत असतं, पण शेवटी हा ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे. पण फुंकून उरलेली सिगारेट रस्त्यावर फेकणं हे तर चूकच आहे. निदान अशी वर्तुळ पाहून, आपण फेकलेल्या थोटकाभोवती कुणी वर्तुळ आखताना पाहून तरी स्वत:ची किमान लाज वाटावी, अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत आम्ही प्लॉगिंग करताना हजारो सिगारेटची थोटकं उचलली आहेत. शिक्षित तरुण-तरुणींनी तरी निदान कचरा असा रस्त्यावर टाकू नये. आनंद एवढाच की आता आमच्या भागात देखील ही मोहीम राबवा, असं लोक म्हणू लागले आहेत.’
याच गटातली वैद्यकीय शिक्षण घेणारी हर्षल दिनेश शिंदे म्हणते, स्मोकिंग करण्याचा जसा पिणाऱ्याला त्रस होतो तसाच त्याच्या धुराचा इतरांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. कार्बन उत्सजर्नाचा जागतिक पर्यावरणावर परिणाम होतो आहे. आपण आधीच विनाशाच्या दिशेने चाललो आहोत. जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसाच आसपासचा परिसरदेखील स्वच्छ ठेवला पाहिजे. याचे भान प्रत्येकाला असायला हवं.’
या मुलांना भेटून हे कळतं की, त्यांनी स्वत:हून ही जबाबदारी स्वीकारली आहे. पटकन कुणी येऊन थोटकाभोवती वर्तुळ करतं, संदेश लिहितं, आपल्या कामाला लागतं. ना कसला दिखावा, ना बडबड. फक्त ते आपलं जनजागृतीचं काम चोख करत आहेत. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, हे नक्की.
(नम्रता लोकमतच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहे.)
namrata.phadnis@gmail.com
या उपक्रमाचा व्हिडीओ पहा
त्यासाठी ही लिंक
https://www.facebook.com/132309676835568/posts/3665649223501578/