- लीना बोकील
मिशन इम्पॉसिबल अॅण्ड एव्हरीथिंग इज स्टिल पॉसिबल असाच हा अनुभव आहे.गेल्या वर्षी अकोल्याच्या सोनल बाबरेवालला फ्रान्सच्या इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीची कल्पना चावला फेलोशिप मिळाली. यंदा कोल्हापूरच्या अनिशा राजमानेला.
जगात फक्त ‘अंतराळा’चा अभ्यास करणारं, पूर्णत: याच विषयाच्या संशोधनाला वाहिलेलं दुसरं विद्यापीठ नाही. फ्रान्सचं हे एकमेव विद्यापीठ आहे. हे विद्यापीठही खऱ्या अर्थानं पूर्णत: ‘इंटरनॅशनल’ आहे. इथं जगभरातून विद्यार्थी अभ्यासाला येतात. निवडले जातात.त्यात सलग दोन वर्ष भारतीय, त्यातही महाराष्टÑातल्या मुलींनी कल्पना चावला फेलोशिप मिळवावी ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे.या नव्या अंतराळ विज्ञान संधींबद्दल अनेकदा मुलांना माहितीच नसते. त्यांच्यापर्यंत या संधी पोहचत नाही. मात्र पोहचल्या तर महाराष्टÑातल्या लहान शहरातल्या मुलीही किती मोठी भरारी घेऊ शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोनल आणि अनिशा. याआधीही करिश्मा इनामदारची या विद्यापीठात अभ्यासक्रमात निवड झाली आहे. मात्र कल्पना चावला फेलोशिप गेल्या वर्षीपासून सुरू झाली आणि दोन्ही वर्ष ती आपल्याच मुलींना मिळाली आहे. भारतातून सर्वप्रथम हेमील मोदीची या विद्यापीठात शिक्षणासाठी निवड झाली. दुसरा तिथं जाणारा अविशेक घोष. सध्या तो पॉसन मिशन या मोठ्या मोहिमेत अंतराळवीर म्हणून काम करतो आहे. त्यानं नासातही इंटर्नशिप केली आहे.
कल्पना चावला आंतरराष्ट्रीय फेलोशिप ही या क्षेत्रातली मानाची शिष्यवृत्ती. मुलींसाठीची. मुलींना अंतराळ संशोधनात संधी मिळावी म्हणून सुरू झालेला हा उपक्रम. अर्ज करतानाच उमेदवारानं एक निबंधही सादर करायचा असतो. अंतराळ संशोधनात काय ‘पॅशन’ आहे, काय काम करण्याची इच्छा आहे याविषयी हा निबंध लिहायचा असतो. जगभरातून हजारो मुली त्यासाठी अर्ज करतात. शंभर शॉर्टलिस्ट होतात. आणि एका मुलीला ही फेलोशिप मिळते.
या मुलांना मी मार्गदर्शन केलं. आवश्यक ती गरजेची कागदपत्रं नि रेकमेण्डशन दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवला. मात्र त्यांनीही आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून मेहनत घेतली. अत्यंत ‘फोकस्ड’ राहिले. ही जिद्द त्यांना आकाशात भरारी घ्यायची प्रेरणा देत राहील...
(नासाच्या हनीवेल स्पेस एज्युकेटर)