सोशल मीडियावर तुम्हाला कसं वाटतं?
म्हणजे सतत सोशल मीडियात ऑनलाइन राहून तुमच्या स्वभावात काही मूलभूत बदल झालेले आहेत का?
म्हणजे पूर्वी कदाचित तुम्ही अबोल म्हणून ओळखले जायचात पण हल्ली ‘कूल टॉकेटिव्ह डय़ूड’ म्हणून तुम्ही तुमच्या सोशल मीडियातल्या मित्रपरिवारात प्रसिद्ध आहात?
ज्या नातेवाइकांशी तुम्ही प्रत्यक्षात एखादं मिनिटही बोलत नव्हतात, त्यांच्याशी आता व्हॉट्सअॅपवर ग्रुपमध्ये चॅटिंग करता? त्यांच्या अपडेट्सना क्षणार्धात प्रतिसाद देता?
तुम्हाला अचानक मत निर्माण झालं आहे? किंवा तुम्हाला अचानक तुमची मतं मांडावीशी वाटताहेत का, ती मत मांडण्याची भीती काहीशी कमी झाली आहे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर ‘हो’ अशी असतील तर याचा स्पष्ट अर्थ एकच, की तुम्ही होतात त्यापेक्षा आता जरा जास्त सोशल झाला आहात. म्हणजेच आता तुम्ही बहिमरुख (एक्स्ट्रोव्हर्ट) होत आहात. अंतर्मुख (इण्ट्रोव्हर्ट) राहण्याची तुम्हाला गरज वाटत नाही म्हणा किंवा तुमच्यात तो बदल झाला आहे. किंवा त्याही पुढचं म्हणजे निदान तसा समज तरी तुम्ही स्वत:विषयी हा करून घेतलेला आहे.
हे सगळं कशामुळे, तर सोशल मीडिया आपल्या सगळ्यांनाच स्वत:च्या अहंगंडातून किंवा न्यूनगंडातून बाहेर पडण्याची संधी देतोय. तुम्ही कोण आहात? कसे आहात? तुमची मतं, तुमचे विचार लोकांपर्यंत पोचवा, कुणाचीही भीती न बाळगता व्यक्त व्हा, असंच सोशल मीडियाचं सांगणं! बोलते व्हा असाच जर आग्रह असेल तर तिथं येणा:या प्रत्येकाला बोलण्याची, सतत बोलण्याची संधीच दिली जाते. आणि आपण सगळेच ही संधी पुरेपूर वापरतो. आपला व्यवसाय वृद्धिंगत करायला, आपली इमेज तयार करायला, जगाशी दोस्ती करत करत जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी गोळा करायला, विचार मांडायला, दुस:याच्या पटलेल्या विचारांवर कडाडून टीका करायला सगळेच पुढे सरसावले!
पण या सोशल होण्याच्या नादात आत्मकेंद्री माणसांचीच गर्दी वाढली. आभासी जगात बहिमरुख आणि प्रत्यक्ष जगात अंतर्मुख, आत्मकेंद्री अशा माणसांचा एक प्रचंड समुदाय तयार होतोय. आणि त्या गर्दीत श्वास गुदमरू नये म्हणून आणि उठून दिसावं म्हणूनही जास्तीत जास्त बोलत राहण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्यातून मग एकाच वेळी दोन आयुष्य जगण्याची धावपळ सुरू होते. आभासी जगातून मिळणारं प्रोत्साहन, तिथलं यश, कौतुक ख:या जगण्यातली गंमत हिरावून घेतेय. आणि आभासी जग रम्य आणि प्रत्यक्ष जग निरस वाटायला लागतं.
असं अनेकांचं होतं, आपलं होतंय का, विचार करून बघा.
जगभरात याविषयावर संशोधन आणि चर्चा सुरू आहे. मुळात माणसं बोलकी होताहेत, की बोलकीच होती ती जास्त बोलताहेत, की मुळात अबोल असलेली, आत्मकेंद्रीच असणारी नुस्ती वरवर बोलकी झालेली दिसताहेत, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं मानसोपचारतज्ज्ञ शोधत आहेत.
डॉ. पैविका शेल्डन यांनी अलाबमा विद्यापीठात एक सर्वेक्षण केलं होतं. ‘जर्नल ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च ऑन सायबर स्पेस’मध्ये त्यांनी यासंदर्भात काही निरीक्षणं मांडली आहेत. त्यांच्या सर्वेक्षणानुसार, बहिर्मुख व्यक्ती सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव्ह दिसत असली तरी अंतर्मुख व्यक्तीच प्रदीर्घ काळासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. अनेक संशोधक आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या मते ‘ऑनलाइन बहिर्मुख आणि ऑफलाइन अंतर्मुख’ असं अनेकांचं व्यक्तिमत्त्व दिसतं. अशा व्यक्तींची मानसिक जडणघडण अतिशय गुंतागुंतीची असते.
ही गोष्ट आपण अनेकदा बघतो. फेसबुकवर आपले अनेक मित्र, मैत्रिणी असतात, ते इतर अनेक गोष्टी शेअर करत असतात; मात्र स्वत:विषयी फार कमी माहिती शेअर करतात. यात स्त्री, पुरु ष असाही भेद असतो. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात व्यक्तिगत माहिती शेअर करतात, असे अनेक अभ्यासक सांगतात.
हे सारं स्वत:शी किंवा आपल्या मित्रपरिवाराशी ताडून पाहिलं तर कदाचित लक्षात येतं की, आपल्याला माहिती असलेले अनेकजण फेसबुकवर वेगळेच दिसतात. प्रत्यक्षात काही बोलत नाही, पण चॅटवर मात्र अखंड असतात.
आणि आपण?
आपणही कदाचित त्यातलेच आहोत का?
उत्तर आपलं आपण शोधायचं!
* ज्या लोकाना प्रत्यक्षात मुक्तपणो व्यक्त होता येत नाही ते लोक स्वत:ला मुक्तपणो व्यक्त करण्यासाठी सोशल माध्यमांचा वापर करतात.
* अनेक बहिर्मुख माणसं सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात पण त्यांना सोशल माध्यमांचा चटकन कंटाळाही येतो.
* पण अंतर्मुख व्यक्ती मात्र दीर्घ काळ सोशल मीडियावर असतात. त्यातले काहीजण स्वत:विषयी फार कमी माहिती शेअर करतात. किंवा काहीच न बोलता किंवा प्रतिक्रि या न देता निव्वळ चालू असलेल्या चर्चा वाचतात, ऐकतात. ते जास्त काळ सोशल मीडियात अॅक्टिव्ह असतात.
सोशल की अनसोशल?
fाlashgap या संस्थेनं एक सर्वेक्षण केलं आहे.
सोशल मीडियानं आपलं असामाजिकीकरण केलं आहे का?
असा त्या सव्रेक्षणाचा विषय होता. या सर्वेक्षणात असं आढळलं की, आताशा लोक सामाजिक सोहळे, मित्र, मैत्रिणींच्या पाटर्य़ा, इतर सामाजिक कार्यक्र म यांना जाणं अनेकदा टाळतात. किंवा तिथं गेलं तरी अनेकदा आपल्या फोनमध्येच गुंतलेले असतात. कारण त्यांना सोशल मीडियावर चाललेली एकही गोष्ट गमवायची नसते. किंवा तिथंच राहायचं असतं. म्हणजे अनेकदा ते शरीराने सामाजिक कार्यक्र मात, मित्र परिवार आणि नातेवाइकांसोबत असतात, मनानं मात्र सोशल मीडियातच अडकलेले असतात.
मग हे सोशल होणं म्हणायचं की अनसोशल?
- मुक्ता चैतन्य
muktachaitanya11@gmail.com
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)