- भक्ती सोमण
लहान असताना आई एक घास काऊचा, एक घास चिऊचा असं म्हणत आपल्याला भरवते. पुढं आपण स्वत:च्या हातानं, ताट-वाटी-चमच्यानंही जेऊ लागतो. भसाभसा वाढून घेतो, टाकायचं कसं म्हणून खातो. हॉटेलातही तेच. अनेकदा सगळ्या ग्रेव्ही सारख्याच. अनेकदा अन्न उरतं, वाया जातं. बुफेत वाया जाणाºया अन्नाविषयी बोलायलाच नको.पण हे चित्र आता पालटतंय.
अनेकांना वाटतंय की, अन्नाशी अशी नासाडी बरी नव्हे. काहीजण तर खाण्याविषयी फार कॉन्शस. त्यांना सतत वजनाचा काटा दिसतो. ते मोजून-मापून खातात. त्यावर आता अनेकजण भन्नाट प्रयोग करू लागलेत. त्याविषयी गेल्या काही महिन्यांपासून ऐकून होते; पण प्रत्यक्ष बघायला मिळालं ते एका पार्टीत.
त्या पार्टीला अर्धेअधिक पदार्थ हे खोलगट चमच्यातून दिले (सर्व्ह) जात होते. तिथे ५-६ प्रकारचे काउण्टर्स होते. एका काउण्टरवर पनीर, भाज्या मिक्स केलेला सॅलेडचा काउण्टर होता. तर एका काउण्टरवर छोट्या आकाराच्या ब्रेडवर तेवढाच छोटा बटाटेवडा होता. एक काउण्टरवर पास्ता होता, तर एकावर गुलाबजाम. असे हे सगळे पदार्थ हारीने आणि आकर्षक रंगसंगतीने त्या चमच्यात मांडले होते. हे खायचं कसं, हा प्रश्न साहजिकच पडला. म्हणून लोकांचं अनुकरण करून एक प्लेट घेतली त्यात आवडीप्रमाणे सॅलेडचा चमचा घेऊन तो घास खाल्ला. आवडलं म्हणून पुुन्हा घेतलं. मग असंच बाकीच्या पदार्थांचेही घास घेतले. त्या सगळ्याची चव अतिशय सुंदर होती. बरं, खाताना वाया जाणं हा प्रकारच नव्हता. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेतला तर लोकांना अशाप्रकारे खायला आवडतंय हे दिसून येत होतं. यासाठी लागणारा चमचा हा सुपासाठी लागणारा खोलगट रंगीबेरंगी किंवा आवडीप्रमाणे खोलगट पदार्थ ठेवता येईल असा असतो.
या घासभर खाण्याच्या आणि तेही बदलत्या ट्रेण्डविषयी सुप्रसिद्ध शेफ अमेय महाजनी म्हणाला, हा मुख्यत: युरोपियन ट्रेण्ड आहे; पण आता ग्लोबलायजेशन आणि इन्स्टाग्राममुळे लोकांना याविषयी आकर्षण निर्माण झालं आहे. असं म्हणतात की माणसाचं जेवण ९० टक्के डोळ्यांवर आणि १० टक्के चवीवर अवलंबून असतं. चमच्याने दिल्या जाणाºया पदार्थात रंगसंगती इतकी कलात्मक असते की ते पाहूनच खावेसे वाटतात. शिवाय चवही चांगलीच असते. तसंच एकावेळी खूप पदार्थ घेऊन ते वाया घालवण्यापेक्षा तुम्हाला ज्या आकारात पदार्थ हवाय त्या आकारात तो चमच्यात एका घासात खाता येतो.
खाते पिते घर का आदमी दिसण्यासाठी भरपूर खाणं हे जसं महत्त्वाचं असतं, तसंच अन्न वाया जाऊ नये हेदेखील महत्त्वाचं आहे. म्हणूनच पदार्थ चमच्यात देण्याचा ट्रेण्ड हा सध्या जाम चालतो आहे. हे वाचल्यावर असं वाटेलं की, पदार्थ एकदाच घ्यायचा का? तर तसं नाही. पदार्थ आवडला असेल तर पाहिजे तेवढ्या वेळा तो चमचा घेता येऊ शकतो बरं का..
(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)