पुण्यात पीफचे वारे सुरू झाले की, अनेकांची फुकट पास मिळवण्यासाठी धडपड सुरू होते. ‘पीफ’ म्हणजे पुणे फिल्म फेस्टिव्हल. त्याचा पास फुकटात मिळाला तर भारीच. नाहीच तर पैसे भरून का होईना घेऊ पण पास हवाच, असं अनेकांचं मत. तुम्ही म्हणाल चित्रपटातले दर्दी प्रकरण दिसतेय. तर असले गैरसमज अजिबात नको. आपल्याला इथलेच चित्रपट अजून नीट झेपत नाहीत तर चीन-जपानी-इराणी केव्हा झेपायचे? पण तरी पास बाकी हवाच. असं का? अहो, सध्याचा स्टेट्स सिम्बॉल आहे तो.
.. तर याही वर्षी खटपटी-लटपटी करून पीफचा पास मिळवलाच. शिक्का मारून कॅटलॉग घेतला. शेड्युलची सुरनळी हातात ठेवली. आता चित्रपट पाहण्यासाठी लागणारी सारी सिद्धता तर झाली होती आता प्रश्न होता पहायचं काय? कसं? आणि कळणार काय?
पण या सार्यांवर मात करत एका रांगेत उभा राहिलो. हळूहळू रांग आत सरकत होती. हा-हा म्हणता थिएटर हाऊसफुल्ल झालं. माझ्यासारखे असंख्य तरुण होते. शहरातल्या सगळ्याच मल्टिप्लेक्समध्ये रांगा. हेच चित्र काही दिवसांपूर्वी होतं कोल्हापुरात अन् त्या आधी गोव्यातही होतं म्हणे.
फिल्म फेस्टिव्हलला येणार्या सगळ्या तरुणांना चित्रपट कळतात का? की माझ्यासारखंच? असो..
मी रांगेत पुढे सरकत राहिलो. थिएटरमध्ये शिरलो तेव्हा थिएटर गच्च भरलेलं. नुसत्या सीटच नाही तर पायर्याही गच्चं भरलेल्या. पॅसेजमध्येही तरुण मुलं-मुली अगदी दाटीवाटीनं बसलेली..
आयला भारीच दिसतोय पिक्चर कुठलातरी.. या गडबडीत इतका वेळ कुठल्या रांगेत अन् कुठल्या पिक्चरसाठी जातोय हेच पाहिलं नव्हतं. मोबाइल लाइटमध्ये पिक्चरचं नाव पाहून घेतलं. पथेर पांचाली. डिरेक्टर - सत्यजित रे.. इतक्या जुन्या त्यातून ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाला पाहायला इतकी गर्दी? अन इतकं हाऊसफुल्ल? जरा चक्रावलोच. गर्दीत एकाच्या खांद्यावरून मान काढत उभा राहूनच मी चित्रपट पाहायचा प्रयत्न करू लागलो. हळूहळू मी त्या पडद्यावरच्या जगात रंगत गेलो. इतका वेळ उभा राहूनच चित्रपट पाहतोय हेदेखील विसरलो. चित्रपट संपला आणि अख्खं थिएटर उभं राहिलं. सत्यजित रे या माणसाच्या कलाकृतीला तो सलाम होता. चित्रपटातला दर्दी नसलो तरी त्यातला ‘दर्द’ काळजाला येऊन भिडला होता..
चित्रपट संपवून गर्दीतून बाहेर आलो आणि मग पहिला प्रश्न मनात आला ही तरुण मुलं आहेत तरी कुठली?
सगळीच काही फिल्म इन्स्टिट्युटवाली नसतील..
बरीचशी असतीलही. काही अगदीच माझ्यासारखी स्टेट्स आणि स्टाइल सांभाळण्यासाठीच आलेली असतील तरी दीड पायावर उभं राहून चित्रपट पाहत राहायची धडपड तरी ते कशाला करतील?
पण हे सगळं जग काहीतरी वेगळं होतं खास. बरेचजण चित्रपटांवरच बोलत होते. त्यात काय आवडलं. काय सॉलीड होतं काय खूपच बंडल होतं असं कितीतरी...? मधूनच एखादा समर नखाते सारखा दाढीवाला बाबा दिसायचा गर्दीत. मुलं चुंबकासारखी खेचली जायची त्याच्याकडं. तो बोलत राहायचा चित्रपटांवर काहीतरी. मुलं समोर चित्रपटच सुरू असावा अशा तन्मयतेनं ऐकत राहायची.
या सार्या तरुणांची सतत कसली तरी धडपड सुरू होती. ती समजून घ्यायला हवी असं वाटलं म्हणून चार दोन जणांना गाठून विचारलंही, पण असल्या गप्पांच्या मूडमध्ये कुणीच नव्हतं. काहींनी उडवलं. काही जण बोललेही.. त्यासार्यांतून एक मात्र समजत होतं, त्यांना समजून घ्यायचंय काय चाललंय या पडद्यावर! तिथल्या जगाचं अवकाश, तिथं घडणारं सगळंच किंवा जितकं समजेल-उमजेल तेवढं तरी जाणून घेण्याची उर्मी पक्की होती. हे सारं लगेच समजणार नाही कदाचित हेदेखील समजत असावं..
मात्र कुणीतरी आपल्याला काही सांगू पाहतंय. त्याच्या नजरेतून काही दाखवू पाहतंय. ते समजून घ्यायला हवं ही सारी धडपड होती ती. किमान या बाबतीत दिखावूपणा नव्हता अगर कन्फ्यूजनही..
बराच वेळ तिथं थांबल्यानंतर मला यातले बरेचसे तरुण काहीतरी शोधताना वाटते. अनेकांची या सार्या विषयांकडे पाहण्याची दृष्टी भिन्न होती पण जी काही होती ती स्वच्छ होती. हे सगळं पडद्यावर खर्या अर्थाने जग अनुभवत असताना ही तरुणाई त्याच्याशी स्वत:ला जुळवून पाहत होती. काय सांगायचंय हे समजून घेतानाच स्वत:लाच काय हवंय हे देखील जाणून घेऊ पाहत होती..
नाहीतर मला सांगा किती का भारी चित्रपट असेना, दीड पायावर उभं राहून ब्लॅक अँड व्हाइट चित्रपट पाहत राहण्यात काही अडलंय?
- पराग पोतदार