उपेक्षित समाजासाठी काम करणा-या मुंबईतल्या फॅण्ड्री फाऊंडेशनने गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी 10 एप्रिल रोजी सोशल मीडियावर मदतीचं आवाहन केलं होतं. दहा शाळांना इ-लर्निगची सुविधा पुरवण्यासाठी व आदीवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदत म्हणून देण्यासाठी सुमारे सहा लाखांचा खर्च अपेक्षित होता. पण सोशल मीडियाहून केलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादानं बघता बघता ही रक्कम 7 लाखांच्या घरात गेली.
तरुण मुलांनी सोशल मीडीयाचा विधायक उपयोग केला तर अनेक चांगल्या गोष्टी घडतात याचं हे एक उदाहरण. अवघ्या दोन वर्षाच्या प्रवासात संस्थेशी अनेक तरुण जोडले गेले. इगतपुरी जवळ कुरुंगवाडी, डहाणू जवळ चेरी कुटबी या गावांमध्ये या संस्थेचं काम सुरू आहे. आणि आता हाताशी निधी असल्यानं शाळांना इ लर्निगची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आणि शालेय साहित्य इतर शाळांमध्येही देण्याचं या संस्थेनं ठरवलं आहे.
शिक्षणाचं महत्त्व समजविण्यासाठी हे तरुण कार्यकर्ते जनजागृती करत आहेत. इगतपुरीजवळ कुरुंगवाडी गावक-यांच्या रोजगारासाठी गावाजवळच्या धरणात मस्त्यबीजरोपण तर जवळच्या कुरुंग किल्ल्याजवळ पर्यटन व्यवसायासाठी मदत करण्यात येत आहे. डहाणूच्या काही गावक-यांना प्रायोगिक तत्त्वावर बारमाही शेतीच्या हेतूने प्रोत्साहन देण्यात येत आहे.
सोशल मिडीयावरील सामाजिक जाणिव असेलेले तरुण मोठ्या प्रमाणात संस्थेशी जोडले गेल्याचा अभिमान असल्याचं संस्थेच्या कार्यकर्त्या विद्या पिकले सांगतात.
प्रवीण दाभोळकर