- शुभा प्रभू-साटम
मोठी सुपर मार्केट्स आता नवलाईची राहिलेली नाहीयेत. शहरं सोडा, तुलनेनं मध्यम अशा शहरातपण एका छताखाली सगळे जिन्नस विकणारी मोठी दुकानं, मॉल्स उभे राहिलेत. अगदी वीसेक वर्षापूर्वी मध्यमवर्गीय आणि काही उच्च मध्यमवर्गीय लोकांची धाव कोपर्यावरच्या परंपरागत किराणा दुकानाकडे असायची. घरातल्या रिकाम्या लहान पोराला चिठ्ठी देऊन पाठवले जायचं. वस्तू तरी काय तर धान्य, कडधान्य, तेल, डाळी आणि अन्य वस्तू, शैक्षणिक साहित्य बस्स. रव्याचे सतरा प्रकार आणि तुपाचे वीस ब्रॅण्ड असला मामला नव्हता. वाण्याकडे त्याच्या गावाकडचे दोन-तीन शिकावू उमेदवार असायचे जे वजन करणं, सामान बांधणं, पुडय़ा बांधणं हे काम करायचे आणि हिशेब गल्ल्यावरचा मालक करायचा. इथपासून आजच्या लयभारी अशा पॉश सुपरमार्केटर्पयत आपली प्रगती झालीय. खच्चून भरलेले आयल्स, वेगवेगळी उत्पादनं, भल्या मोठय़ा ट्रॉल्या आणि खरेदी झाली की चेक आउट करण्याचे खंडीभर काउण्टर्स. तिथं भेटतात युनिफॉर्ममधल्या चटपटीत हसतमुख अशा तरुण मुली. काही मुलंही. कुठलंही सुपरमार्केट असो किराण्याचे किंवा अन्य उत्पादनांचे; कस्टमरला मदत करणार्या, नेमकी वस्तू शोधून देणार्या, पर्याय सुचवणार्या आणि शेवटी हिशेब करून पॅकिंग करणार्यांत बहुसंख्य मुलीच दिसतात. साधारण वय वर्षे 19 पासून 30 र्पयतच्या तरुण मुली सुपरमार्केट मॉल्समध्ये काम करताना आताशा दिसतात. पुरुष किंवा मुलगे आहेत; पण तुलनेने तसे कमी.याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की, याप्रकारच्या कामासाठी फार मोठी शैक्षणिक गुणवत्ता लागत नाही. हिशेबासाठी ऑटोमॅटिक टिल्स असतात. चटपटीतपणा, हसतमुख चेहरा, नम्र वागणं आणि थोडंफार इंग्रजी आणि हिंदी यावर या क्षेत्रात नोकरी मिळते. आणि आताशा त्यातून नुसती रोजीरोटीचीच नाही तर करिअरची एक नवीन वाट या मुलींना सापडते आहे.वाशी येथल्या हायपर स्टोअर्समधील स्टोअर्स मॅनेजर नवीन चौहान सांगतात, या सर्वजणी जेव्हा रुजू होतात तेव्हा त्यांना एक लहान ट्रेनिंग अथवा इंडक्शन प्रोग्रॅममधून जावं लागते. ज्यात तुम्ही नीटनेटकं कसं राहावं इथपासून ते भडकलेल्या, संतापलेल्या कस्टमरशी कसं वागावं हे शिकवलं जातं. बोलायचं कसं, उत्तर कसं द्यायचं इतकंच काय; पण उभं कसं राहायचं या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. उत्पादनं कशी आहेत, कुणासाठीची आहेत याची माहिती दिली जाते. उदाहरण द्यायचं तर रवा वेगळा आणि कूसकूस वेगळं हे कसं ते समजावलं जातं.’हल्ली अनेक उच्च आणि मध्यमवर्गीय शहरी मॉल्स, बडे बाजार, मल्टिपर्पज स्टोअर्स दिसतात. सेल्स असिस्टंट, कॅशिअर म्हणून मुलीच तिथं काम करतात. भूषण कोयंडे डी-मार्टमध्ये काही वर्ष स्टोअर मॅनेजर म्हणून काम करीत होता. त्यानं अनेक नवख्या मुलींना व्यवस्थित ट्रेनिंग दिलेले आहे. तो म्हणतो, या सर्व मुली पंधरा-एकक दिवसांनंतर अगदी सफाईने रूळून काम करतात.प्रज्ञा महाले ही जवळपास पाच वर्षे या क्षेत्रात आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे हिशोबाचा प्रॉब्लेम नसतो, बारकोड चेक करणं महत्त्वाचं. दिवाळी, गणपती, लगAसराई अशावेळी तर पाणी प्यायला फुरसत मिळत नाही. हायपरमधील साधना कांबळे आणि मीनाक्षी महिंद्रकर इथे बरेच वर्ष आहेत. त्या कपडय़ांचा विभाग सांभाळतात. कुणाला काय हवंय आणि काय चांगलं दिसेल हे नजरेने जोखण्यात त्या आता तरबेज झाल्यात. या कामासोबत या सर्वजणींना एक काम अगदी नजरेत तेल घालून करावं लागतं ते म्हणजे चोर्यांवर लक्ष ठेवणं.वस्तू इथे उघडय़ा असल्याने अनेकदा चोरल्या जातात. कधीतरी हेतूपूर्वक नासधूस होते. कधी लहान मुलं सांडलवड करतात. या सगळ्यांना व्यवस्थित हाताळणं हे या सर्व मुलींचं मुख्य काम. एकदा दीक्षा वाघमारेच्या अंगावर एक आई संतापाने धावून आली होती आणि वंदना जेव्हा हिशेब करत होती तेव्हा जवळपास दहा-एक हजाराचा माल घेतलेल्या त्या व्यक्तीने पैसे द्यायला नकार दिला आणि तो सरळ चालता झाला.