गवताळ प्रदेश हा तसा दुर्लक्षित विषय आहे. अत्यंत महत्त्वाच्या अशा या परिसंस्थेला आपल्याकडे फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही. गवताळ प्रदेश म्हणजे माळरान, पडीक जमीन असं म्हणून त्याची अभ्यासात फारशी नोंद होत नाही. मात्र, सोलापूरच्या आदित्य क्षीरसागरने गवताळ परिसंस्थेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
आदित्यला लहानपणापासूनच वन्यजीवांचा अभ्यास करण्याची आवड होती. या आवडीमुळेच त्यानं काहीकाळ सर्पमित्र म्हणून काम केलं. जंगलाच्या अभ्यासातून त्याला गवताळ प्रदेशांची परिसंस्था किती महत्त्वाची आहे हे लक्षात आलं. जंगलामध्ये जितका वाघ महत्त्वाचा आहे, तितकाच गवताळ प्रदेशातील लांडगाही महत्त्वाचा असं त्याला वाटायला लागलं आणि गवताळ प्रदेश हा त्यांन अभ्यासाचा, निरीक्षणाचा विषय बनवला. सुरुवातीच्या काळात त्यानं सोलापुरातील पशू-पक्ष्यांची नोंद करायला सुरुवात केली. सोलापुरातील फुलपाखरांच्या जातीची पहिली यादी करण्याचं काम आदित्यनं केलं. या यादीच्या कामातून त्याला अनेक नव्या, आश्चर्यकारक बाबी समजल्या. सोलापुरात त्यानं महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू ब्लू मोर्मोनसह ८१ इतर फुलपाखरांची नोंद केली. या अभ्यासात त्यानं २२ जातींचे साप, ९ जातींचे बेडूक, २०० पेक्षा अधिक जातींचे पक्षी, १५ जातींचे सस्तन प्राणी आणि अनेक किटकांची नोंद त्यानं केली. एखाद्या जिल्ह्याचा असा संपूर्ण अभ्यास करण्याची ही दुर्मीळ बाब म्हणावी लागेल.
माळरानामध्ये होणारी शिकार रोखण्यासाठी त्यानं प्रयत्न सुरू केले. बऱ्याचदा शिकारीचे प्रयत्न रोखून वनविभागाला माहिती देण्याचं कामही केलं.सोलापूर जिल्ह्यातलं नान्नज हे माळढोकांचं हक्काचं घर होतं. शिकार, गवताळ प्रदेशावर शेतीचं अतिक्रमण, भटके कुत्रे, कालवे यांसारख्या अनेक कारणांमुळे माळरानातील इतर प्राण्यांप्रमाणे माळढोकही संकटात आहेत. दहा वर्षांपूर्वी आदित्यने नान्नजमध्ये १७ माळढोक पाहिले होते आणि एकूण २३ माळढोक असल्याची नोंद होती. आज ही संख्या केवळ एकावर आल्याचं आदित्य सांगतो. करमाळ्यात तर २००२ नंतर माळढोकांची नोंदच नाही. माळढोक वर्षभरात केवळ एकच अंडं घालत असल्यामुळे माळढोक नामशेष होण्याची वेळ लवकरच येईल अशी भीती तो व्यक्त करतो. माळढोकप्रमाणे तणमोर हा देखील गवताळ प्रदेशातील महत्त्वाचा पक्षी होता. पण २००४ साली एका तणमोराची नोंद सोलापुरात झाली. त्यानंतर गेल्या महिन्यात एक तणमोर सापडला होता. त्यामुळे माळढोक आणि तणमोर या दोन्ही पक्ष्यांचं भविष्य अंधारात आहे.
सोलापूरच्या गवताळ प्रदेशामध्ये श्वानवर्गातील खोकड, कोल्हा, लांडगा असेही प्राणी आढळतात. माळरानाच्या जमिनीत किंवा शेताच्या बांधावर खोकड आणि लांडगे बीळ करून राहतात. सशासारखे लहान प्राणी, पक्षी मारून ते आपलं पोट भरतात. आदित्यने अनेक पक्ष्यांचीही नोंद या माळरानावर केली आहे. तो म्हणतो, झाडं लावणं कधीही चांगलं असलं तरी माळरानाबाबत थोडं नियोजन करून वृक्षारोपण झालं पाहिजे. सरकारकडून माळरानावर काही परदेशी झाडं लावण्यात आली होती. मात्र निसर्गप्रेमींनी हे शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ती काढण्यात आली. वृक्षारोपण करताना निसर्गाचा विचार झाला पाहिजे. भारतीय झाडेच लावली पाहिजेत. माळरानातील प्राणी आणि पक्षी यांचं महत्त्व तेथे राहणाºया लोकांना पटवून दिलं तर हे सारं टिकेल.आदित्यने या कामाबरोबर शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि तो गिअरबल्क नावाच्या कंपनीत थर्ड इंजिनिअर पदावरती काम करतो. नोकरी आणि हे काम याचा तो सध्या मेळ घालतोय..
onkark2@gmail.com