- डॉ. यशपाल गोगटे
थायरॉईड. हल्ली तरुण मुलांनाही हा आजार सर्रास होतो. अनेकजण थायरॉईडच्या टेस्ट करून, त्याविषयीची माहिती स्वत:च गुगलही करत बसतात.जगामध्ये अंतर्स्रावी ग्रंथींच्या आजारामध्ये थायरॉईड ग्रंथीच्या आजाराचं प्रमाण सर्वात जास्त आहे. हा आजार सामान्यजनतेत जेवढा सुप्रसिद्ध आहे, तेवढाच कुप्रसिद्धदेखील आहे. यात विशेष करून सर्वात कुप्रसिद्ध असलेला आजार - हायपोथायरॉईडीझम!लोकांना या आजाराबद्दल ऐकीव किंवा पुस्तकी माहिती बरीच असते; परंतु या अपुºया माहितीमुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. या आजाराची लक्षणं जरी वाचली तरी ती आपल्यात आहे असं वाटून ती स्वत:मध्येही जाणवू लागतात. लहान मुलांना बुवा आला म्हणून आपण घाबरवतो, तसाच या आजाराचाही मनात एक बागुलबुवा तयार होतो. देशात जसं काहीही वाईट घडलं तरी विरोधी पक्ष सरकारवरच खापर फोडतो तसंच शरीरात कुठलाही अपाय झाला की त्याचा थायरॉईडशी संबंध आहे का हे अनेकजण स्वत:च ठरवून टाकतात. काहीजण तर थायरॉईडलाच दोष देतात.
हायपोथायरॉईडीझमया आजाराची बरीचशी लक्षणं ही वाढत्या वयोमानाच्या लक्षणांशी मिळती-जुळती असतात, म्हणूनही अनेकजण घाबरतात. सरकारदरबारी जसं वरिष्ठ नागरिकाचं वय साठ वर्षे प्रमाण मानलेलं असलं तरी, वास्तविक पाहता आपल्या शरीराची वयाच्या तिसाव्या वर्षापासूनच वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू होते. ही वाटचाल खासकरून स्त्रियांमध्ये अधिक वेगाने होत असते.
वजन वाढणं, थकवा येणं, केस गळणं एकूणच गती मंद होणं, विसराळूपणा, बद्धकोष्ठ (पोट साफ न होणं) व पोटाच्या तक्रारी ही सारी लक्षणं तशी आम आहेत. हे सारं जसं हायपोथायरॉईडीझममुळे होऊ शकतं तसंच वाढत्या वयामुळेही होऊ शकतं.
शरीरातील हे नैसर्गिक बदल सहजासहजी मान्य होत नाहीत. त्यामुळे मनात याबद्दल एक अवास्तव भीती निर्माण होते. आणि त्यामुळे तयार होतो तो थायरॉईडचा बागुलबुवा. थोडंही शरीरात काही वेगळं झालं, बदल घडले की मनात पहिली शंका येते ती थायरॉईडच्या आजाराची!हे सारे गैरसमज बाजूला ठेवून हा आजार, त्याची लक्षणं आणि आपली लाइफस्टाइल याचा पुढच्या लेखात विचार करू..