मार्चमधली ही गोष्ट. पॅरिस फॅशन वीकवर कोरोनाची काळी सावली होतीच. फॅशन इंडस्ट्रीला मोठा दणका बसेल असा अंदाज तेव्हाच वर्तवला जाऊ लागला होता.मात्र त्या फॅशन वीकमध्ये काही डिझायनर असेही होते, ज्यांनी इनकन्व्हिनियन्स हीच अपॉच्यरुनिटी म्हणत डिझायनर मास्क रॅम्पवर उतरवले आणि आगामी काळात मास्क हेच स्टाइल स्टेटमेण्ट नाही तर सोशल स्टेटमेण्ट बनतील असं म्हणत एक नवी वाट चालून पाहिली. अर्थातच त्याकाळी त्याचं कोणी कौतुक केलं नाही. मात्र आता सप्टेंबर मध्यावर येता येता यूएस ओपन चॅम्पियन नाओमी ओसाकाने तर मास्क हे एक मोठं सोशल स्टेटमेण्ट करून टाकलं आणि अनेकांच्या लक्षात आलं की जे आपल्याला बोलायचं आहे ते, किंवा जे आपण आहोत ते या मास्कच्या मदतीने बोलता येतं. इतके दिवस टी-शर्ट लाइन्स हा एक बोल्ड स्टाइल प्रकार मानला जात होता, आता टी-शर्ट आणि मास्क यांचं कॉम्बिनेशनही लवकरच बाजारात येईल अशी चिन्हं आहेत. तरुण मुलंच कशाला, तरुणांच्या जगात ज्या स्टाइल स्टेटमेण्टची अलीकडे बरीच चर्चा झाली त्यात सर्वात वरचा नंबर होता तो इंग्लंडची राणी क्विन एलिझाबेथ यांचा. त्या प्रत्येक ड्रेसवर सध्या मॅचिंग रंगाचा मास्क घालत आहेत.आणि मॅचिंग-कॉण्ट्रा मॅचिंग, एथनिक, बोल्ड, रिबेल असे मास्कचे एकेक नवेच चेहरे आता समोर येत आहेत.अलीकडे गाजलेल्या मास्कची ही एक यादी पाहा, म्हणजे 500 रुपये दंड भरून मास्क न घालण्यापेक्षा मास्क वापरून फॅशनेबल होणं आता सोपं आहे.
1. यूएईची ख्यातनाम सिंगर अहलामने ज्वेलरी एम्ब्रॉयडरी केलेला एक मास्क घातलेला स्वतर्चा फोटो अलीकडेच ट्विट केला, त्याची जगभर चर्चा झाली. एम्ब्रॉयडरीवाले मास्क ही सध्याची नवी फॅशन आहे.2. इजिप्तचा डिझायनर सामे हग्राम याने ब्रायडल मास्क तयार केला, मोती लावलेला. तो पॅरिस फॅशन वीकमध्ये गाजला. मात्र आपल्याकडे त्याचं कोणाला कौतुक असावं, महाराष्ट्रात पैठणीचे, दक्षिणेत कांजीवरम, उपाडाचे आणि आसाममध्ये मुगा सिल्कचे मास्क लग्नात सजलेच.
3. डिस्ने कॅरॅक्टर्स मास्क ही सध्या एक जगभर आवडती लाट आहे.
4. अलीकडेच वेअरिंग मेकअप ऑन मास्क नावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात खूप फिरला, मास्क लावून मेकअप ही भलतीच क्रेझ ठरते आहे.