बघ रे थोडं पत्र्यावर जाऊन रेंज येते का? थोडं पलीकडं जा की... असं म्हणत कोरोनाकाळात ऑनलाइन शिकण्यापासून ‘पर्सनल’ फेस टाइम कॉलपर्यंत आपण बरेच उद्योग केले. शहरात फोरजीला सरावलेलं क्राउड तर टूजी पकडलं फोनने तरी चिडचिडत होतं. टूजीवरून थ्रीजी अन् आता सर्वांच्या हाती आलेल्या फोरजीने इंटरनेट वापराची व्याख्याच टॉप टू बॉटम बदलून टाकली. व्हिडीओ बफरिंग होण्याचा जमाना संपत आलाय आणि विनासायास व्हिडीओ पाहण्याचं प्रमाणही प्रचंड वाढलं आहे. गेमिंगचं जग झपाट्याने तरुणाईच्या डोक्यावर मिरे वाटू लागलंय आणि हे भूत इंटरनेटच्या वाढत्या स्पीडमुळे आणखीनच धुमाकूळ घालत आहे.
पण याच इंटरनेट स्पीडने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची नोकरी टिकविण्यासाठी हातभार लावला हेही विसरून चालणार नाही. घरबसल्या ऑनलाइन शिक्षण घेणारे आणि परीक्षा देणाऱ्यांनाही याच इंटरनेटने आणि त्याच्या सुसाट स्पीडने साथ दिली. ते होतं म्हणून निभलं या अवघड काळात.
आणि आता २०२१ मध्ये येतंय फाइव्ह जी. ते आल्यानं काय बदलेल?
१. उत्तम दर्जाचा स्मार्टफोन आणि त्यावर सुसाट धावणारं इंटरनेट हे तरुणाईचं स्टेटस सिम्बॉल. ते अजून भाव खाणार, पण त्याचा वापर कोण कसं करतं, त्यावरून त्या-त्या तरुणाच्या भवितव्याच्या रेषा आखल्या जातील. स्पीडवर स्वार होताना तुम्ही कोणत्या माहितीचा हात धरता, यावर बरंच ठरेल, नाहीतर हे फाइव्ह जी नुसतं टाइम किलर ठरेल.
२. ऑनलाइन गेमिंग असो वा सर्फिंग, व्हिडीओ असा वा मूव्ही पाहणे असो किंवा सोशल मीडिया, इंटरनेटचा स्पीड हा अनुभवच बदलून टाकेल. ओटीटीसारख्या माध्यमांमुळे मनोरंजनाचे अनेक विषय पर्सनल फोनवरच पाहिले जातील. मनोरंजन पर्सनल होईल.
३. ऑनलाइन शॉपिंगचं वेड, निदान वस्तू पाहून ठेवणं याची चटक अनेकांना लागलेली आहे, नव्या फाइव्ह जी काळात ते वाढेल.
४. पोर्नोग्राफी पाहणंही हा तरुण जगात चिंतेचा विषय झाला आहे. इंटरनेटच्या स्पीडमुळे अनेक पोर्नसाइट्सला तरुण बळी पडत आहेत. उत्तम स्पीड मिळाल्यानंतर त्यात आणखी तरुणाई गुंतत जाण्याची भीती अधिक आहे. अर्थात, हा प्रत्येकाच्या तारतम्याचा भाग आहे.
५. सर्वाधिक धोका आहे, तो तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा चेंदामेंदा होण्याचा. इंटरनेटमुळे डार्कनेट, हॅकर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळे माणसांची पर्सनल माहिती अधिक प्रमाणात वेबच्या महागुहेत जमा होणार आहे आणि ती सातत्याने-वेगाने अपडेट होत राहणार आहे. त्यानुसार, कुणी तरुणांची मतं कण्ट्रोल करण्याचं भयही आहेच. ऑनलाइन फ्रॉडही त्याच गतीने वाढतील.
६. इंटरनेटचा प्रचंड स्पीड आणि त्यातही ते कमी खर्चात मिळत असेल, तर त्याचा वापरही प्रचंड होणार, यात शंका नाही. तासन् तास इंटरनेट धुंडाळत राहायचं. व्हिडीओ पाहात राहायचे, याचं अनेकांना वेड असतं. बरं त्यात भर पडते ती सोशल मीडियाची. टॉपिक कोणताही असो, सोशल मीडियावर त्याची चर्चा करण्यात तरुणाई अग्रेसर असतेच, पण त्यात आपला वेळ किती जोतोय आणि त्याचा शरीरावर-मेंदूवर काय परिणाम होतोय, याचा फारसा विचार होताना दिसत नाही. एकाच ठिकाणी बसून राहण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि ते वाढणारही आहे. त्यामुळे तरुणाईत एक मोठी समस्या मूळ धरू लागली आहे, ती म्हणजे लठ्ठपणा!
बघा ‘फाइव्ह जी’ तुम्हाला गोलमटोल तर करणार नाही?