- ऑक्सिजन टीम
23 जुलै 2017. या दिवशी जर मिताली राजच्या भारतीय संघानं लॉर्डसवर विश्वचषक जिंकून दाखवला असता तर आज कदाचित वेगळं चित्र असतं, भारतीय महिला क्रिकेटची वेगळी गोष्ट सांगावी लागली असती. पण एकेकाळी कपिल देवच्या भारतीय संघाला लॉर्डसवर जे साधलं ते मिताली राजच्या संघाला साधलं नाही. अटीतटीचा अंतिम सामना झाला आणि इंग्लंडनं भारतीय संघाला नमवत तो विश्वचषक जिंकला. तोच विश्वचषक घेऊन जर मिताली राजचा संघ भारतात आला असता तर कदाचित कपिल देवच्या संघाच्या वाटय़ाला आली आणि त्यानंतर जन्माला आली तशी क्रिकेटच्या भरभराटीची एक कहाणी या महिला संघाच्या वाटय़ालाही आली असती. भारतात एकदिवसीय क्रिकेटला अच्छे दिन आले त्याचा आवाज 1983 सालच्या विजयानं केला होता. अर्थात या जर-तरला खेळात काही अर्थ नसतो; पण खेळाच्या पलीकडे समाजात मात्र हारजितीच्या पलीकडची खेळण्यासह जगण्याची एक गोष्ट घडत असते.भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात आपली विश्वविजयी दावेदारी सांगतो आहे, तेव्हा या संघाच्या प्रवासाचीच नाही तर भारतीय महिला क्रिकेटच्या उदयाची आणि आता वर्ल्डक्लास खेळाडू घडवण्याच्या प्रवासाचीही नोंद घ्यायला हवी. न्यूझीलंड दौर्यावर असलेल्या पुरुष संघाइतकी चर्चा या महिला खेळाडूंची (नेहमीप्रमाणे) होत नसली तरी भारतीय महिलांची क्रिकेटमधली गुणवत्ता आज जग मान्य करतं आहे. हरमनप्रीत कौर ही जगातल्या कुठल्याही संघात असावी, अशी उत्कृष्ट बॅटर आहे. गेल्या विश्वचषकात तिनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली 171 धावांची खेळी वनडे बॅटर्सच्या यादीत सर्वोत्तम खेळी म्हणून नोंदवली जाते. स्मृती मानधनाचा गौरव विराट कोहली म्हणून होत असला तरी या लेबलिंगच्या आणि कौतुकाच्या पलीकडे जाणारा तिचा प्रोफेशनल खेळ आणि गुणवत्ता आहेच हे मान्य करावंच लागेल. त्यापूर्वीही मिताली राज, झुलन गोस्वामींनी महिला क्रिकेटची पायाभरणी केली. आणि आता तर शेफाली वर्मा नावाचा 16 वर्षाचा तारा भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उगवला आहे. जिच्या खेळाकडे क्रिकेटजग अवाक होऊन पाहतं आहे.महिला क्रिकेट म्हणजे भातुकली असं समजणार्यांना किंवा काहीतरी खेळतात मुली करा त्यांचं कौतुक असं वाटणार्यांना काहीही वाटो मात्र भारतीय महिला क्रिकेटचा उदय (प्रोफेशनल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगात) गेल्या दोन वर्षात अत्यंत वेगवान आणि ड्रामॅटिक झालेला दिसतो. एकतर भारतात पोषक असलेलं क्रिकेटचं वातावरण, क्रिकेटमधला पैसा, सोयीसुविधा, कोचिंग, अगदी लहानसहान गावात उदयाला आलेल्या क्रिकेट अकॅडमी यासार्यापलीकडे ‘जेण्डर बॅरिअर’ तोडून मुली आपल्या वळणाची एक नवी क्रिकेट कहाणी लिहू पाहत आहेत.ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा कोच मॅथ्यू मॉट म्हणतो, ‘भारतासारख्या क्रिकेटवेडय़ा देशातल्या या मुली, क्रिकेटचं पॅशन त्यांच्यात आहेच. आजच भारतीय महिला क्रिकेट संघात 3-4 वर्ल्ड क्लास खेळाडू आहेत. दे आर द स्लिपिंग जायण्ट इन विमेन क्रिकेट!’भारतीय क्रिकेटमधली ही सुप्त ताकद याच वर्ल्डकपमध्ये समोर येईल आणि हा संघ हा विश्वचषक घेऊनच भारतात परतेल का, हे कळायला अजून वेळ आहे. हा लेख लिहीत असताना केवळ साखळी सामन्यांची सुरुवात झाली होती. आणि शेफाली वर्माची फटकेबाजी पाहून जग तोंडात बोटं घालू लागलं होतं. त्यामुळे स्पर्धेअंती काय होतं, हा वेगळा विषय; पण एक नक्की, या संघातील खेळाडूंचा खेळ हा क्रिकेटला अभिमान वाटेल, त्याचा दर्जा उंचावेल असाच होतो आहे.आणि त्यापलीकडेही जाणारी या संघाची एक गोष्ट आहे. जी इतके दिवस फक्त पुरुषांच्या खेळाबद्दल बोलली जात होती, धोनी इफेक्ट नावाची. राइज ऑफ स्मॉल टाउन पॉवरची. या महिला संघांवर जरा नजर घाला आणि पहा, कुठून कुठंवरचा संघर्ष करत या खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. म्हणून ही गोष्ट फक्त क्रिकेटची नाही, या खेळाडूंची, त्यांच्या पालकांची, भावाबहिणींची, प्रशिक्षकांची आणि बदलत्या भारतीय समाजाचीही आहे.क्रिकेटवेडय़ा ‘इंडिया’त या भारतातल्या मुली क्रिकेट खेळण्याची एक जिद्दीची गोष्ट घडवत आहे.जी वर्ल्डकप जिंकण्या-हरण्याच्या मैदानाबाहेरची आहे.
****
भेटा भारतीय संघाला
हरमनप्रीत कौरती ऑल राउण्डर आहे. आणि वीरेंद्र सेहवागला आदर्श मानते, यातच सारं आलं. त्याच्यासारखाच तडाखेबाज खेळ खेळण्यात ती माहीर आहे. एकेकाळी या मुलीला व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आवडायचं. पण मग तिच्या आयुष्यात क्रिकेट आलं. मोगा नावाच्या पंजाबमधल्या छोटय़ाशा गावची ही मुलगी. रोज 30 किलोमीटर प्रवास करून ती क्रिकेट अकॅडमीत जायची. तिची जिद्द ही तिची ओळख आहे आणि तिची कप्तानीही त्याच तोडीची आहे.
स्मृती मानधनास्मृती ती आजच्या घडीला उत्तम आंतरराष्ट्रीय बॅटर, टॉप स्कोअरर आहेच. सांगलीची ही मुलगी. तिथंच क्रिकेट शिकली, वाढली. भावाला क्रिकेट खेळताना पाहून मैदानात उतरलेली स्मृती उद्या भारतीय महिला क्रिकेटची कप्तान असेल हे नक्की.
जेमिया रॉड्रिग्जजेमिया मुंबईची. अण्डर प्रेशर कसं उत्तम खेळतात तिला विचारा. मुंबईत भांडूपमध्ये वाढलेली ही 19 वर्षाची तरुणी. तिचे वडील प्रशिक्षक, त्यांच्याच कडे तिनं क्रिकेटचे धडे गिरवले. भावांबरोबर क्रिकेट खेळता तिच्या सार्या कुटुंबानं आंतररष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचं स्वपA पाहिलं, आज ते स्वपA ती इंडिया जर्सी घालून पूर्ण करतेय.
शेफाली वर्माआजच्या घडीला क्रिकेट जगात कुणाची चर्चा असेल तर ती या मुलीची आहे. हरयाणातल्या रोहतकची 16 वर्षाची एक मुलगी भारतीय क्रिकेट संघात दावेदारी सांगते आणि थेट वर्ल्डकप खेळायला जाते. मुलांसोबत ही मुलगी क्रिकेट खेळली कारण मुली नव्हत्याच सोबत. पण या मुलीला लागलं तर काय म्हणून तिला संघात कुणी घेत नव्हतं. मग तिनंच ठरवलं आणि वडिलांना सांगितलं केस कापून टाकते मग कुणाला कळणारच नाही मी मुलगी आहे. तसंच झालं. आणि आता ती सचिन तेंडुलकरचं फास्टेट फिफ्टीचं रेकॉर्ड मोडूनही मोकळी झाली. सिंधू आणि जडेजा ज्यांना स्पॉन्सर करतं ती स्पोर्ट मार्केटिंग कंपनी तिच्याशीही कॉण्ट्रॅक्ट करतेय. आता सुरुवात आहे तिची, जगभरातले क्रिकेटवेड या बालचमत्काराकडे लक्ष ठेवून आहेत.
वेदा कृष्णमूर्तीआजच्या भारतीय संघातली सगळ्यात सिनिअर खेळाडू. 27 वर्षाची वेदा. वडील केबल ऑपरेटर. चिकमंगलूर गावात ते रहायचे. वयाच्या तिसर्या वर्षी या मुलीनं हातात बॅट घेतली. ती जिथं शिकायची त्या अकॅडमीचे प्रशिक्षक इरफान सैट तिच्या वडिलांना म्हणाले, या मुलीत गुणवत्ता आहे, तुम्ही बंगळुरूला जा. आणि आपली मुलगी एक दिवस भारतीय संघात खेळेल हे स्वपA पाहत हे कुटुंब बंगळुरुला आलं. आणि आज अनेक वर्षे वेदा भारतीय संघाचा आधार आहे.
रिचा घोषसिलिगुडी हे नाव तर आपण ऐकतोच. कधीमधी येतं बातम्यांमध्ये हिमालयाच्या कुशीतलं गाव. तिथं क्रिकेट पोहोचलं होतं; पण अकॅडमी नाही की क्रिकेटच्या सुविधा नाहीत, मुलांसोबत क्रिकेट खेळतच ही मुलगी मोठी झाली. वडिलांनी कष्टानं तिला कोलकाताला क्रिकेट शिकायला पाठवलं आणि म्हणता म्हणता ती भारतीय संघातलीही पोहोचली. वय फक्त 19 वर्षे.
हर्लीन देओलही पंजाबी कुडी. चंदिगडचीच. हिमाचल प्रदेशकडून खेळते. तिची गोष्टही तीच, तिची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची सुरुवात निराशादायक होती; पण त्यातून स्वतर्ला सावरत तिनं संघात आपलं स्थान बळकट केलं.
दीप्ती शर्माआग्रा ते लॉर्डस अशी दीप्तीची गोष्ट आहे. एकदम कादंबरीत शोभावी अशी गोष्ट. तिचा भाऊ क्रिकेट खेळायचा. ही त्याला बॉलिंग करायची, त्याच्यासोबत जायची सामन्यांना. बसून राहायची. एकदा तिला थ्रो करायला सांगितलं तर थ्रो लांबून थेट स्टम्पवर गेला. तिथून तिचं क्रिकेट सुरू झालं. तिच्या भावाचं क्रिकेट फार पुढं गेलं नाही; पण आपल्या बहिणीनं भारतीय संघात खेळावं म्हणून या भावानं जिवाचं रान केलं.तानिया भाटियाती भारतीय संघात विकेटकीपर आहे. वय 22 वर्षे. तीपण चंदिगडचीच. तिचे वडील, काका, भाऊ सगळेच क्रिकेट खेळाडू. सुरुवातीला ती युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्याकडे क्रिकेट शिकली. सध्या माजी क्रिकेटपटू आर. पी, सिंग यांच्याकडे ती शिकतेय. मधल्या काळात तिचा परफॉर्मन्स बिघडला, त्या नैराश्यातून बाहेर पडत तिनं पुन्हा आपला खेळ उंचावला. थाला धोनी म्हणत अनेकदा तिच्या किपिंगचं कौतुकही झालं आहे.
राधा यादव
राधा मुंबईचीच. स्पिनर. 19 वर्षाची. आज महिला आसीसी टी ट्वेण्टी रॅकिंगमध्ये ती दुसर्या क्रमांकावर आहे. कांदिवलीची ही मुलगी. एका खोलीच्या घरात वाढलेली. झोपडपट्टी पुनर्विकासात मिळालेलं घर, त्याबाहेर वडिलांचा भाजीचा ठेला. आणि त्यावर गुजराण करणारं कुटुंब. ही मुलगी उत्तम क्रिकेट खेळायची. प्रशिक्षक प्रफुल्ल नाइक यांनी तिचा खेळ पाहून प्रोत्साहन दिलं आणि तिचं क्रिकेट तिला भारतीय संघार्पयत घेऊन आलं.
पूजा वस्रकार
बाबुलाल आणि बबलू अशी तिची दोन टोपण नावं आहेत. मुलांसोबत क्रिकेट खेळतच ती क्रिकेट शिकली. मध्य प्रदेशातली ही मुलगी. ती दहा वर्षाची असताना तिची आई गेली. चार भावंडं. वडील बीएसएनएलमध्ये नोकरीला होते. आधी ती बॅटिंग करायची; पण प्रशिक्षकांनी सुचवलं आणि तिनं बॉलिंग सुरू केली.
अरुंधती रेड्डी
हैदराबादची अरुंधती. राहुल द्रविड तिचा आदर्श. त्याच्यासारखीच ती शांत असते. शांत डोकं ठेवून खेळते. तिला खरं तर विकेट कीपर व्हायचं होतं. पण तिच्या वेगवान चेंडूनं अशी गती घेतली की उत्तम बॉलर म्हणून तिनं नाव कमावलं आहे.
पूनम यादवपूनम आग्य्राची. तिचे वडील आर्मीत होते. मुलीनं क्रिकेट खेळणंच त्यांना पसंत नव्हतं. पण तिची प्रशिक्षक हेमलताने खूप समजावल्यावर वडील तयार झाले. आणि आठव्या वर्षापासून पूनमनं क्रिकेट खेळणं सुरू केलं. पहिला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारतीय संघानं पूनमच्या उत्कृष्ट कामगिरीवरच आताही जिंकला.
शिखा पांडेदिलीप सरदेसाई यांच्यानंतर भारतीय संघार्पयत पोहोचलेली शिखा ही गोव्यातली एकमेव खेळाडू. शिखाही आज भारतीय संघातली वयानं सगळ्यात मोठी खेळाडू आहे.
राजेश्वरी गायकवाडराजेश्वरी कर्नाटकची. तिचे वडील क्रिकेट प्रशिक्षक. मुलीचं क्रिकेट करिअर हे त्यांचं स्वपA तिचंही स्वपA झालं. खेळाडूंचंच कुटुंब असलेल्या घरातली राजेश्वरी आजच्या घडीला भारतीय संघातली उत्तम बॉलर आहे.