- गौरी पटवर्धन
प्रत्येक माध्यम आणि समाजमाध्यमाने आपापल्या अभिरुची आणि वकूबाप्रमाणे सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची हेडलाईन दिली खरी, पण त्याच्या अश्या अचानक जाण्याने लोक मनातून हादरले आहेत हे दिसतंय. ऍक्टिव्ह लाइफस्टाइल असणारा, नियमितपणे व्यायाम करणारा, डाएट वगैरे सांभाळणारा सिद्धार्थ असा चाळिसाव्या वर्षी हार्ट अटॅकने जाईल कसा?
आणि जर का हे सगळं करूनही एखाद्याला चाळिसाव्या वर्षी हार्ट अटॅक येणार असेल तर मग आपण काय करायचं? इतके दिवस आपण असं गृहीत धरून चाललो होतो की जिमला गेलं, व्यायाम केला आणि डाएटकडे लक्ष दिलं म्हणजे बास. अजून फिटनेससाठी काही करायची गरज नाही. पण आपलं गृहितकच सिद्धार्थच्या जाण्याने मोडीत निघालं आहे.
बरं नुसता हार्ट अटॅक असाही हा विषय नाहीये. मनोरंजन विश्वाकडे बघितलं, तर हार्ट अटॅक, नैराश्य, अंमली पदार्थ, रक्तदाब असे अनेक रोग मोठमोठ्या लोकांना होताना दिसतात. आणि तिथून नजर हटवून जरा आपल्या आजूबाजूला बघितलं, तर आपल्याही ओळखीच्या लोकांना चाळिशीत हार्ट अटॅक, नैराश्य, रक्तदाब, थायरॉईड, इतर मानसिक विकार यांनी ग्रासलेलं दिसतं. आपल्या आरोग्याकडे ते दुर्लक्ष करताहेत असं नाही, उलट तरुण मंडळींमध्ये तर फिटनेसबद्दल चांगलीच जागरूकता आलेली दिसते. मग तरीही हे लाईफस्टाईल डिसीज त्यांच्या मागे का लागलेत हे काही कळत नाही.
व्यायाम केला, डाएट सांभाळलं, आता तब्येत सांभाळण्यासाठी अजून काय करू? या प्रश्नाचं उत्तर म्हंटलं तर सोपं आहे आणि म्हटलं तर अवघड. कारण त्याचं उत्तर आहे, -‘स्लो डाऊन’. थोडं थंड घ्या. सततची धावाधाव कमी करा. लाईफस्टाईल नावाचं जे आपणच मोठं केलेलं भूत आहे ते सांभाळण्यासाठी धावणं कमी करा. थोडे रिलॅक्स व्हा. प्रत्येक वेळी स्वतःला विचारा, “इतकी घाई काय आहे?”
जास्त पगार, जास्त पर्क्स, जास्त मोठं घर, जास्त भारीतली गाडी, एका खोलीत एसी, सगळ्या खोल्यांना एसी, परदेशी ऑनसाईट जाण्याचा चान्स, त्यासाठी जास्त वर्किंग अवर्स… या सगळ्याचा सध्याच्या तरुण पिढीला प्रचंड स्ट्रेस येतो. आणि हा स्ट्रेस सगळ्या फिटनेसला पुरून उरतो. कारण स्ट्रेस घालवण्यासाठी ड्रिंक्स, स्मोकिंग, ड्रग्जचा आधार काही जणांना हवासा वाटतो. आणि त्याने सगळं गणित अजूनच बिघडत जातं.
कितीही कमावलं तरी पुरेसं वाटत नाही, समाधान मिळत नाही, मनोरंजनासारख्या क्षेत्राकडे बाहेरून बघताना चित्र वेगळं असतं. पण प्रत्यक्षात तिथली परिस्थिती काय असते हे बाहेरून समजत नाही. काम मिळण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. उत्तम दिसणं हा व्यवसायाचा भाग असल्यामुळे स्वतःला मेंटेन करणं हा बऱ्यापैकी खर्चिक प्रकार असतो. सतत एक प्रकारची असुरक्षितता मनात असते. कामाच्या वेळा अत्यंत अनियमित असतात. या प्रत्येक गोष्टीचा कळत नकळत मनावर ताण येतो. आणि हा ताणच घात करतो असं डॉक्टर्स म्हणतात.
त्याशिवाय आशियाई माणसांची जनुकीय संरचना अशी आहे, की युरअन किंवा अमेरिकन माणसांपेक्षा आपल्याला हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यासाठी आपण काही करू शकत नाही. पण निदान आपल्या मनावर किती आणि कसला ताण आहे हे लक्षात घेऊन तो कमी ठेवण्यासाठी प्रयत्न तरी करू शकतो. कुठल्या गोष्टीमागे किती धावायचं, त्यासाठी कशाची आणि किती किंमत मोजायची या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक गोष्ट पटकन हवीशी वाटणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. पण तरीही, “इतकी काय घाई आहे?” हा प्रश्न स्वतःला विचारलाच पाहिजे. जगण्याचा वेग थोडा नियंत्रणात आणलाच पाहिजे. दारू, सिगारेट, तंबाखू, अंमली पदार्थ यांच्यापासून दूर राहिलंच पाहिजे. नाही तर उलट्या बाजूने हा प्रश्न सिद्धार्थला विचारण्याची वेळ येते, “अरे तुझं वय तरी किती होतं? अशी निघून जाण्याची इतकी घाई काय होती?”
तणाव कशाने निर्माण होतो?
1-कामाच्या ठिकाणचं वातावरण
2-टार्गेट्स गाठण्याचा तणाव
3-आर्थिक ताण
4-कौटुंबिक ताणतणाव
5-इतरांकडे स्पर्धात्मक दृष्टीने बघितल्यामुळे येणारा तणाव
तणावाची मॅनेजमेंट कशी करायची?
1- आपल्याला कशाचा स्ट्रेस येतो याकडे लक्ष द्या
2- काही वेळा गरजा कमी केल्या तरी स्ट्रेस कमी होतो
3- आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल त्यासाठी स्वतःला जास्त वेळ द्या. पाच वर्षात घर घ्यायचा प्लॅन असेल तर तो दहा वर्षांचा करून स्ट्रेस कमी होतो का ते बघा
4- मानसिक आरोग्य सांभाळा
5- खूप ताण, राग किंवा नैराश्य येत असेल तर सायकॉलॉजिस्टची मदत घ्या.
6- कौटुंबिक ताणतणाव असतील तर कौटुंबिक समुपदेशकाची मदत घ्या.
(मुक्त पत्रकार)
patwardhan.gauri@gmail.com