शंकराचार्यांच्या गावात भेटलेला सेक्युलॅरिझमअन् काश्मिरात भेटलेली नफरत याचा अर्थ नेमका कसा लावायचा? ‘माना तो सब भगवान है’. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या गावात त्या मुलींनी नोंदविलेलं मत विसरता येणार नाही. स्वरूपानंद साऱ्या जगाला सांगत सुटलेत, ‘साईबाबा देव नाही’. त्यावरून त्यांनी केवढं मोठं राजकारण पेटविलं. पण त्यांच्या गावातील गोंड समाजाच्या आदिवासी मुली मला सांगत होत्या, ‘हम नही मानते गुरुजीकी बाणी. हम साईबाबा को भगवान मानते है.’‘मेरा देश बदल रहा है’ अशी जाहिरात सध्या रोज कानीकपाळी आदळतेय. हा इंडिया बदलतोय म्हणजे नक्की काय होतयं हे मी शंकराचार्यांच्या दिघोरी (मध्य प्रदेश) या गावात पाहत होतो. कोणाला देव मानायचं आणि कोणाला मानायचं नाही याचे सर्टिफिकेट शंकराचार्य वाटत सुटलेत. पण त्यांच्या गावातील आदिवासी मुलींनी ‘माना तो सब भगवान हैै’ असं सांगून शंकराचार्यांनी देवांना बहाल केलेल्या डिग्य्रा बाद ठरविल्या. शंकराचार्यांच्या गावातच असा ‘सेक्युलर’ इंडिया भेटला. गोंड समाजाच्या या आदिवासी मुली बी.एस्सी. करत होत्या. बदलता देश जगाला दाखवायचाच असेल तर यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण सापडणार नाही असं वाटून गेलंच..‘जुना रस्ता खूप म्हातारा होऊन वारला व त्याची जागा आता एका डांबरट रस्त्याने घेतली आहे. गावकऱ्यांच्या अंगावरच्या कपड्यांप्रमाणे आता गावचे रस्तेही बदलत चाललेत’असं पु. ल. देशपांडेंनी एके ठिकाणी म्हटलंय. एनएच ४४ ने प्रवास करताना रस्त्यांचा हा डांबरटपणा जाणवत होता. रस्त्यांनी जुने अंगडेटोपडे फेकाटून रामदेवबाबांच्या पतंजलीची जीन्स घातलीय जणू. आपले रस्तेही मेकअप करून मार्केटिंगसाठी उभे आहेत असं जाणवलं. तेही कॉर्पोरेट होताहेत. गाव अन् प्रदेश बदलला की रस्त्यांचा स्वभाव बदलतो म्हणतात. तसे या राष्ट्रीय महामार्गाचे ठिकठिकाणी बदलणारे स्वभाव दिसले. त्याच्यावर गरिबी-श्रीमंती, जात-धर्म, प्रांत, बदलत्या भाषा, बदलती संस्कृती, आंतरभारती, छोटी टपरी ते मोठ्ठा मॉल, रोटी ते पराठा, सायकल ते कंटेनर, शेतकऱ्यांपासून ते अदानी-अंबानींपर्यंत सगळे भेटले. जिसको जो चाहे वो लेलो !
आपले रस्ते हेच आता बदलत्या इंडियाचा सर्वात मोठा डिस्प्ले बोर्ड आहेत. जाहिरातींचं सगळ्यात मोठ्ठं मार्केट या हायवेवर भेटलं. गरीब दिसून चालणार नाही. या नव्या जगासोबत इंटरनेच्या फोर-जी स्पीडनं पळावं लागेल हे हा रस्ताही आम्हाला सांगत होता.
आजवर रस्त्याने भरपूर फिरलो. पण ही भटकंती हा देश पाहण्यासाठी होती. देश समजून घेण्यासाठी होती. पण हा बदलता देश समजून घेणं हे आव्हान आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात ‘गाय को राष्ट्रीय पशू बनाओ’ ही घोषवाक्य वाचायला मिळाली. त्याचवेळी गायी सांभाळणं परवडत नाही म्हणून हजारो गायी थेट महामार्गावर सोडून दिल्याचंही दिसलं. बेटी बचाओची हाक देणारा हरियाणा मुलींना हॉकीचं दमदार प्रशिक्षण देताना भेटला. नवा इंडिया असा घोषणा अन् विरोधाभासांनी भरलाय.
या सगळ्या प्रवासात काश्मीरनं मनं हेलावून टाकलं. अनलिमिटेड इंडियाचे बोर्ड झळकावणारा हा देश काश्मिरात गेल्यावर नॉट रिचेबल झाला. संपूर्ण प्रवासात आमचं इंटरनेट चालू होतं. काश्मिरात गेल्यावर मात्र ते बंद पडलं. काश्मिरात हिंसाचार उसळल्याने सरकारने ते बंद केलं होतं. शंकराचार्यांच्या गावात भेटलेला सेक्युलॅरिझम अन् काश्मिरात भेटलेली ही नफरत याचा अर्थ नेमका कसा लावायचा?
या प्रवासात दिल्लीत भेटलेल्या बिजवाडा विल्सन यांचं एक वाक्यही सतत आठवतं. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या कामाबद्दल विल्सन यांना यावर्षी मॅगसेसे अवॉर्ड मिळालं. विल्सन यांनी आम्हाला एक प्रश्न केला.. ‘भाषा क्लीन इंडियाकी चल रही है. लेकीन इस देश के जाती व्यवस्थाने कई लोगोंको सालोसाल मलीन किया है उसका क्या? वो साफसफाई कौन करेगा?’
एक नक्की...हे सारे विरोधाभास पाहतानाही एनएच ४४ हा हायवे, उम्मीद का हायवे वाटला. सुपरस्पीडने तो लोकांच्या जगण्यात स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा पोहचवतो आहे.. सोपी नाही ही वेगवान घोडदौड नुस्ती समजून घेणंही.- सुधीर लंके (लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.)