डॉ. हॉवर्ड गार्डनर. सुप्रसिद्ध न्यूरो-सायण्टिस्ट. त्यांनी मेंदूंवर खूप संशोधन केलं. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं हे शोधायचा प्रयत्न केला की मेंदूत नेमकं काय चालतं? त्याची माहिती, बारीकसारीक तपशील गोळा केले. त्यावरून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, माणसाची अवघी बुद्धी ही त्याच्या न्यूरॉन्समध्ये साठवलेली असते. प्रत्येकाच्या विविध क्षेत्रांमधल्या न्यूरॉन्सच्या गतीनुसार त्याची बुद्धिमत्ता ठरत असते. मग त्यांनी बुद्धीच्या विविध आयामांचा विचार केला आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक जण, प्रत्येक मेंदू वेगळा आहे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यातल्या मानवी मेंदूची रचना एकसारखीच असते. त्याची विविध क्षेत्रं ठरलेली असतात. त्यातली कामंही ठरलेली असतात. मात्र त्यातल्या न्यूरॉन्स या पेशींनुसार बराच फरक पडत जातो. या पेशींमुळे आपण इतरांपेक्षा वेगळे ठरतो. प्रत्येकाच्या बुद्धीची काय खासियत असते हे त्यातून ठरतं. आणि त्यातूनच त्यांच्या लक्षात आलं की, बुद्धिमत्ता एक नसते, तर अनेक असतात !मानवी समाजाला कायम दिशादर्शक ठरेल असं हे अत्यंत महत्त्वाचं विधान मग समोर आलं. त्यांनी सांगितलेल्या आठ बुद्धिमत्तांपैकी सहा बुद्धिमत्ता आपण मागील दोन अंकात पाहिल्या. आता या काही बुद्धिमत्तांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती करून घेऊ!निसर्गविषयक बुद्धिमत्ता(Naturalistic intelligence)डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक असे चॅनल्स लावल्यावर आपल्याला प्राणी, पक्षी, झाडं अशा विषयावर संशोधन करणारी मंडळी दिसतात. ही सर्व माणसं निसर्गविषयक बुद्धिमत्तेची असतात. त्यामुळेच अशा विषयांमध्ये ती रमतात. वाहिन्यांवर न झळकणारी पण कुठेतरी गडकिल्ल्यांवर, जंगलात काम करणारी, निसर्गाचा अभ्यास करणारी, वाइल्डलाइफ फोटोग्राफीत रस असणारी, व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून याच विषयात काम करणारी अशी असंख्य माणसं जगभरात आहेत. उत्खननशास्त्र, भूगोल, खगोल, हवामान यांचे अभ्यासक अशा अनेकांच्या मेंदूत खास पेशी असतात. म्हणूनच ती माणसं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, जंगलात राहून किंवा शहरात राहूनही निसर्गविषयक कामांमध्ये मग्न असतात. पक्षितज्ज्ञ सालीम अली, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. कार्व्हर, डॉ. जगदीशचंद्र बोस ही अशाच काही माणसांची उदाहरणं. त्यांना निसर्गाच्या हाका ऐकू येतात, कारण त्या हाकांना ओ देणारी बुद्धिमत्ता त्यांच्या मेंदूत काम करत असते.व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता (Intrapersonal intelligence) स्वत:च्या मनात डोकावणं, स्वत:शीच संवाद साधणं, स्वत:ला केंद्रित ठेवून काही प्रयोग करणं, या प्रयोगातून निष्कर्ष काढणं ही एक वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे. एखादी गोष्ट जितकी जास्त वैयक्तिक, तितकी ती जास्तीत जास्त लोकांना पटते, आवडते असं म्हणतात. ते अशा माणसांना आणि त्यांच्या वागण्याला लागू पडतं. यालाच डॉ. गार्डनर यांनी नाव दिलं आहे- व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता. संयमी, स्वत:वर नियंत्रण ठेवणारा माणूस या बुद्धिमत्तेचा असतो. गांधीजी हे या बुद्धिमत्तेचं एक उदाहरण. गांधीजी लहान असताना त्यांच्या हातून काही चुका झाल्या होत्या. एकदा तर त्यांनी वडिलांच्या खिशातून चोरी केली होती. अतिशय सराईतपणे केलेल्या या चोरीचा त्यांना अतिशय मानसिक त्रास झाला. हा त्रास सहन होईनासा झाला तेव्हा त्यांनी वडिलांना सांगायचं ठरवलं. पण स्वत:च्या तोंडाने गुन्हा कबूल करण्याची हिंमत नव्हती. त्यामुळे त्यांनी ते लिहून वडिलांच्या हातात दिलं. चिठ्ठी वाचून वडिलांना खूप वाईट वाटलं. या प्रसंगातून त्यांनी जो धडा घेतला तो कायमचाच. त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका लिहून प्रसिद्ध करण्याचं धाडस त्यांच्यात होतं. ही त्यांच्या मनाची ताकद होती. अहिराणी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना लिहा-वाचायचं शिक्षण मिळालं नव्हतं. पण त्यांच्या कविता या तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. या माणसांकडे ही बुद्धिमत्ता होती असं म्हणता येतं. म्हणून त्यांनी हजारो माणसं जोडली.आपल्या टॉप ३ बुद्धिमत्ता ओळखाआपल्या ज्या आवडीनिवडी असतात, छंद असतात, काही गोष्टी करायला न आवडणं असं आपण सहजपणाने बोलतो. नेहमी आवडीच्या गोष्टी करण्याकडे आपला स्वाभाविक कल असतो. आपण नेमकं कोणत्या क्षेत्रात जायला हवं, कोणत्या क्षेत्राकडे गेल्यास आपण नैसर्गिकरीत्या अतिशय उत्तम काम करू शकतो हे स्वत:ला ठरवता येऊ शकतं. ते बघावं आणि त्याप्रमाणे आपलं क्षेत्र निवडावं.सध्या बोटांच्या ठशांवरून बुद्धिमत्ता ओळखून देतो, असं सांगणाऱ्यांचा आणि त्या निमित्ताने भरपूर पैसे उकळणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र डॉ. गार्डनर यांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या बुद्धिमत्ता या निरीक्षणावरून ठरवता येऊ शकतात, कोणत्याही टेस्टद्वारा नाही. या आठ बुद्धिमत्तांपैकी कोणत्या दोन ते तीन बुद्धिमत्ता प्राधान्यक्रमाने आहेत, हे ठरवावं. त्याप्रमाणे स्वत:चा निर्णय स्वत: घ्यावा.- डॉ. श्रुती पानसे( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
drshrutipanse@gmail.com