- वृन्दा भार्गवे
गजबजल्या रस्त्याच्या कुठल्याशा कोपऱ्यात, एखाद्या चाय टपरीवर, आडवळणाच्या पुलावर, एकमेकांच्या हातात केवळ हात घालूनच नव्हे, तर अतीव असोशीने एकमेकांना कवटाळून पाठमोरी बसलेली जोडपी...जाणाऱ्या-येणाऱ्या समोरच पाठीवरून हात फिरव, कीस कर, जवळ घे... हे सगळे बिनदिक्कत चालू!
गेल्या काही दिवसांतल्या बातम्या. अस्वस्थ करणाऱ्या! शाळकरी मुलींविषयी, महाविद्यालयीन तरुण-तरुणींविषयी. बलात्कार, अत्याचाराबरोबर शाळा-महाविद्यालयातील त्यांचे असभ्य वर्तन, अश्लील, अश्लाध्य बोलणे, वावरणे कोणाच्याही नजरेत भरणारे. याकडे साऱ्यांनीच केलेले दुर्लक्ष. शाळेत शिक्षकांनी, महाविद्यालयात प्राध्यापकांनी, समाजात लोकांनी. रस्त्याच्या कुठल्याशा कोपऱ्यात, एखाद्या चाय टपरीवर, आडवळणाच्या एखाद्या पुलावर, तेथील सुशोभित मैदानवजा बागेत एकमेकांच्या हातात केवळ हात घालूनच नव्हे, तर अतीव असोशीने एकाच शालीत एकमेकांना कवटाळून पाठमोरे बसलेले अनेकजण.
जाणाऱ्या-येणाऱ्या समोरच पाठीवरून हात फिरव, कीस कर, जवळ घे... हे सगळे बिनदिक्कत चालू! अशा ‘जोडप्यां’च्या समोरूनच रस्त्यावरून जाणारे-येणारे फेऱ्या मारतात. इतर मुले नीट पाहून घेतात. छोट्या मुलांना अधिक कुतूहल, जे पडद्यावर पाहतो त्यापेक्षा हे अधिक चांगले की वाईट याची शहानिशा ते करत राहतात. पोलीस आलेच तर केवळ हटकल्यासारखे. त्यात दम वा जोर कमीच.कुणी हटका-बोलायला-लिहायला-हरकत घ्यायला गेलेच, तर प्रश्नांच्या फैरी...
वयात येणाऱ्या मुलांना तारुण्यसुलभ भावना असू नयेत का? आकर्षणाचे काय? स्पर्शाचे काय? मोकळीकीचे काय? नसतात त्यांना घरे, नसतात कोणत्या खासगी जागा. मग ते संध्याकाळी एखाद्या फांद्या न कापलेल्या झाडाखाली, मित्राच्या पार्किंग प्लेस नसलेल्या जागेत, गाडीच्या आत, स्पर्शाचा हा अनावर खेळ खेळत असतील तर काय बिघडले? किंवा भर दुपारी रस्त्याच्या विरळ गर्दीच्या ठिकाणी कीस घेत उभे राहिले तर तुमच्या पोटात दुखायचे काय कारण? स्कार्फ लावून आपली ओळख न दाखवता सुसाट टू व्हीलरवरून गावापलीकडे जात आपापले वासनेचे वा प्रेमाचे जग त्यांनी उभे केले तर तुमचे काय बिघडले? त्याचा एवढा बाऊ का? कशासाठी?
- वरवर पाहता प्रश्न सुसंगत वाटू शकतील. परंतु ते तर्कशुद्ध नाहीत. शहरी महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या या मुला-मुलींकडे जरा बारकाईने पाहा :२० ते २५ टक्के मुलेमुली सोडल्यास अकरावीत प्रवेश घेतलेल्या मुलींचा मेकअप, त्यांचे राहणीमान थक्क करणारे असते. त्यांना युनिफॉर्म असतो, परंतु तरीही त्यांनी कानात-हातात घातलेले अलंकार, त्यांच्या सलवारीच्या आत घातलेली लेगीन जाणवत असते. पाहण्या-बोलण्याचे विषय काय? - तर मोबाइलवर कोणी काल काय पाठवले, मग तो फोटो असो वा एखादे संभाषण. ते जितके चावट, फाजील द्वयर्थी तेवढे त्यांना चेकाळता येणार. हे पाहण्यासाठी तास बुडाला तरी चालेल.
एखाद दोन तास अटेंड करून कॉलेज कॅम्पसमध्ये दोन-तीनच्या जोड्यांनी बसायचे. प्रशासन दर वेळेस हटकते असे नाही. एकतर वर्गात किंवा ग्रंथालयात किंवा उपक्र म असल्यास थोडा वेळ परिसरात नाहीतर थेट घरी असा निर्णय कडकपणे प्रशासन पाळते का?
या मुलामुलींकडे संततिनियमनाची साधने सर्रास दिसतात हल्ली. याचा धक्का मानावा की ‘निदान काळजी तरी घेतात’ याचा सुस्कारा टाकावा, ते कळणे अवघड! या मुलामुलींमधल्या मोकळेपणाचा वारा बदलाची सुंदर दिशा दाखवतो हे खरे; पण त्याला नको त्यावेळच्या शरीर सहवासाचे-नात्याचे फसवणारे, आक्रोश करायला लावणारे, कधीकधी तर उद्ध्वस्त करायला लावणारे एक विचित्रसे अस्तर येऊन चिकटले आहे. नीटशी वाढही न झालेल्या कोवळ्या शरीराच्या मुली; आपले सर्वस्व कुणाकुणाच्या स्वाधीन करतात आणि त्यांच्यावर कोणीतरी व्हिडीओ फिल्म काढून मोकळा होतो. एखादीला गंमत म्हणून सिगरेट हवी असते.
‘तुझ्या आईचे इंस्टाग्रामचे फोटो काय सेक्सी आहेत आणि तू! तुझी आई मस्त राहते यार, तुझ्याकडे काय आहे?’ - असले प्रश्न विचारले गेले की मुली निराश होतात. समोरचा जे म्हणेल तसे करायला तयार होतात. काळ बदललाय हे खूप सवंग वाक्य आहे. आज या बदलत्या काळात प्रामुख्याने कुटुंबाने, शाळेने, महाविद्यालयाने सरते शेवटी समाजाने या मुलामुलींना कोणते संचित दिले आहे याचा विचार करायला हवा.
कुटुंब मुलामुलींना कोणत्या गोष्टी दाखवते आणि कोणत्या लपवते? टीव्हीवर अमुक एक पाहा असे सांगितले जाते, की काय पाहू नको हे? स्मार्टफोन, पीसी किंवा लॅपटॉप हातात दिला जातो तेव्हा ‘जबाबदरी’ नावाचे एक जरुरीचे उपकरण कुणी देते का या मुलांच्या हातात?
महाविद्यालयात एकाही प्राध्यापकाला मुलांचे दप्तर तपासण्याचा अधिकार नसतो. अपवाद फक्त परीक्षेच्या वेळेचा. अचानक प्रत्येक प्राध्यापकाने मोबाइलसकट विद्यार्थ्यांच्या सर्व वस्तू चेक करायला सुरुवात केली तर? घडणाऱ्या गुन्ह्याअगोदर कॉलेजा-कॉलेजात कितीतरी मुद्देमाल सापडू शकेल. पोर्नोग्राफीशी संबंधित छायाचित्रे, व्हिडीओज, कोणत्यातरी निरपराध मुलीने विश्वासाने केलेल्या गप्पांची रेकॉर्डेड संभाषणे, जिथे जे सेव्ह केले असेल ते पाहता येईल.
- पण हे काम आमचे नाही म्हणून शाळेत शिक्षकांनी आणि महाविद्यालयात प्राध्यापकांनी कानावर हात ठेवायचे. आपली मुलगी अशी नाहीच, आपला मुलगा हे असले कधी करूच शकत नाही असे पालकांनी छातीठोकपणे सांगायचे. आणि त्यातून आपल्याच मुलामुलींना जाळ्यात गोवणारी भीषण प्रकरणे घडली, बलात्काराच्या तक्रारी रस्त्यावर आल्या; की गुन्हेगारीचा शोध घेण्याची जबाबदारी मात्र पोलिसांवर सोपवायची. पुन्हा तपासात पोलिसांनी मुलगी-मुलगा यांच्या वर्तनावर भाष्य केल्यास त्यांची असंवेदनशीलता काढण्यास आपण तयार!हे नुसते आरोप नाहीत. नुसती टीका नाही. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारावर क्षणार्धात एका पिढीवर फुली मारणे नाही.
पण मग का होते हे असे? का मुले आणि मुलीही फक्त शरीरानेच जगू-वागू लागतात? पालक आणि शिक्षक, शाळा आणि कॉलेजे काय करतात या मुलामुलींसाठी? आहे का काही ‘संवादा’ला वाव? भेटवली जातात का त्यांना त्यांचीच आते-मामे भावंडे? दिला जातो का त्यांना एखादा इंटरेस्टिंग प्रोजेक्ट? विचारले जाते का त्यांना त्यांच्याच मित्र-मैत्रिणींबद्दल? बोलावले जाते का कधी घरी? होतात का ओळखी? मुलांचा मोबाइल असतो कधी आई-बाबांच्या हातात? शाळकरी मुलगीदेखील तिच्या मोबाइलला पासवर्ड ठेवते आणि म्हणते, माझी आई किंवा माझे वडील माझे मित्रमैत्रीण कधीच बनू शकत नाहीत. घरात दोनच गोष्टी मिळतात या मुलामुलींना- अति संशय किंवा अति काळजी. आणि सततची पाळत. अशा घराबद्दल ‘जवळीक’ कशी वाटणार? आणि ‘जवळीक’ हवीशी वाटते तेव्हा/त्या वयात मग जवळच्याची ‘ऊब’ कोण कशी टाळणार?
महाविद्यालयात वयाला सर्वार्थाने पंख फुटतात. आकर्षणाचा वेग दुपटीने वाढतो, राग कधी प्रबळ होतो, हिंसा कधी रुजते समजत नाही. अहंकाराची लागण तातडीचीच! वस्तूसारखीच व्यक्ती मिळाली पाहिजे. तिचा नकार म्हणजे घाला, अपमान, त्याचा बदला म्हणजे तिला/त्याला संपवणे. एकदम एक घाव नाही. तिच्या दृष्टीने जे मौल्यवान त्याचाच पालापाचोळा करायचा. हे घडते आहे. रोज. माझ्या नजरेसमोर घडते आहे.
समाज कायम तटस्थ. सोयीने इकडचा नाहीतर तिकडचा. एकतर टोकाचा संस्कृतिरक्षक नाहीतर मग ‘मारा मिठ्या-हसा-नाचा’वाला! फ्रेंडली!! परिणामांबद्दल उदासीन. विपरीत घटना घडल्या की कायदा आणि सुरक्षा कशी बिघडली आहे याची बोंब मारायला तयार.कोण जबाबदार आहे हे जे (बि)घडते त्याला?- आपणच! समुपदेशन नावाच्या प्रकाराशी आपल्याला काही घेणे नाही. भीषण घटना घडल्याशिवाय यंत्रणा हलणार नाही. कॉलेजे ढिम्म बदलणार नाहीत. तरुणच नव्हे तर शाळकरी मुलेही हिंस्त्र बनत चालली आहेत. शरीराकडून त्यांचे लक्ष थोडे बाजूला वळवून त्यांच्या मनाशी त्यांची मैत्री घडेल असे काही करता येईल का?काहिलीनंतर गार पाण्याचा शिडकावा झाल्यावर मृदगंधाने श्वास भरून घ्यावासा वाटेल, असे काही...?(लेखिका विद्यार्थिप्रिय प्राध्यापिका आणि नाशिकच्या हं.प्रा.ठा. महाविद्यालयात वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाच्या प्रमुख आहेत.bhargavevrinda9@gmail.com )