- ओंकार करंबेळकरपाकिस्तानातील एक चहावाला. अर्शद खान.उपरवाला देता है तो छप्पर फाड के देता है म्हणतात ना, तसं झालं त्याचं ! साधा चहावाला तरुण मुलगा. जगभर व्हायरल झाला. त्याचे ते अॅक्वामरिन म्हणजे समुद्री निळ्या-हिरव्या छटेचे डोळे पाहून अनेकांचा घात झाला. १८ वर्षांचा हा तरुण मुलगा. मुलीच काय तरुण मुलगेही पागल झाले त्याला पाहून. त्याचे फोटो दणादण व्हायरल झाले. अनेकांच्या फेसबुकावर झळकले. कुणाकुणाला कविता स्फुरल्या. कुणी कोट्या केल्या. कुणी जान कुर्बान करणाऱ्या दर्दभऱ्या, शायऱ्या ठोकल्या.कुणीच नव्हता हा निली आँखोवाला अर्शद. आज तो फेमस पाकिस्तानी चायवाला आहे. रातोरात त्याची तकदीर बदलली आणि अशी काही प्रसिद्धीची लाट आली की त्या लाटेत दोन-तीन दिवस त्याच्याशिवाय जगात दुसरं काही चर्चेत नव्हतंच.अर्शदला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचं काम केलं ते जिया अली या पाकिस्तानी छायाचित्रकारानं. पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादेतील इतवार बजारमध्ये एका चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या या तरुणाचा तिनं फोटो काढला. ‘हॉट टी’ अशी कॅप्शन लावून तिनं तो फोटो इन्स्टाग्रामवर टाकून दिला. अर्शदच्या अफलातून, बेहद खुबसुरत चेहऱ्याच्या मागे मग नेटवरची दुनिया पागलच झाली. पुरती दिवानी झाली.माध्यमांनी त्याला शोधून काढला, त्याच्या मुलाखती घेतल्या. बीबीसी असो वा अमेरिकन बातम्यांची संकेतस्थळे एकापाठोपाठ त्याच्या मुलाखती प्रसिद्ध करू लागले. ‘पाकिस्तानी चायवाला’ म्हणून माध्यमांनी त्याला असा काही डोक्यावर घेतला की रातोरात माणसं जमली कुणी त्याचा मीडिया मॅनेजर झाला तर कुणी फेसबुक, इन्स्टाची अकाउण्ट चालवू लागला. अर्शदला इंग्रजी येत नाही म्हणून इंग्रजी बोलू शकणारे अनेकजण त्याच्या मदतीला धावले. अर्शदचा मामा रिझवान काजमी त्याचा सल्लागार झाला तर मलिक फहिम नावाचे गृहस्थ मॅनेजर होऊन त्याचे फोन उचलू लागले.त्यातून जगाला त्याची कहाणी समजली. १८ वर्षांच्या अर्शदला सतरा भावंडं आहेत. घरची चूल पेटायला हवी म्हणून तो चहा विकायला लागला. आणि नशीब मेहरबान झालं म्हणून असा फेमसही झाला. युरोपातून, अमेरिकेतून आणि दक्षिण आशियाई देशांमधून त्याला म्हणे सिनेमाच्या आॅफर्सही यायला लागल्या.अर्शद नावाच्या पाकिस्तानी चायवाल्यावर टिप्पण्या करून, राजकीय-सामाजिक कमेण्ट करत जोक मारून जन्ता थांबतच होती तोवर दुसरी लाट आली. नेपाळमधून !एका भाजी विकणाऱ्या, मेहनती अत्यंत सुंदर मुलीचा फोटो ‘नेपाली तरकारीवाली’ म्हणून असाच प्रसिद्धीच्या लाटेवर व्हायरल झाला. झुलत्या पुलावरून पाठीवर टोमॅटोचे ट्रे वाहून नेणाऱ्या कुसुम श्रेष्ठ या मुलीचा तो फोटो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाला. अकरावीत असणाऱ्या या मुलीलाही कुटुंबाला मदत करण्यासाठी भाजी विकावी लागते.चायवाल्याप्रमाणेच ही तरकारीवालीनंही प्रसिद्धीचे रेकॉर्ड मोडत व्हायरल होत इंटरनेट ब्रेकच केले.रातोरात स्टार झाली ही मुलं. जगभर फेमस झाली. पण त्यांची प्रसिद्धी टिकेल?का येतात आताशा अशा लाटा इंटरनेटवर. येतात, फुटतात, जातात. असं का?नव्या जगात ‘व्हायरल’ होणाऱ्या या साऱ्या प्रसिद्धीच्या ट्रेण्डच्या पोटात नक्की असतं काय?- शोधून पहायला हवं !नेटवर्कच्या गुंत्यात प्रसिद्धीच्या लाटाआज आपण इंटरनेट, मोबाइल किंवा सोशल मीडियाच्या ज्या नेटवर्कमध्ये गुंफले गेलो आहोत ते जगड्व्याळ आहे, गुंतागुंतीचे आहे. अशा महाकाय आणि गुंतागुंतीच्या नेटवर्क व्यवस्था एका टप्प्यानंतर आपल्या नेहमीच्या व्यवस्थांसारख्या नियमित, प्रमाणित स्वरूपात वागत नाहीत. नेहमीचे शब्द वापरायचे तर त्यानंतर त्यांचे वर्तन अनेकदा विचित्र किंवा अनाकलनीय बनते. नेटवर्क जितके महाकाय आणि गुंतागुंतीचे तेवढी अशा विचित्र वर्तनाचे ‘अपघात’ होण्याची शक्यताही जास्त. इंटरनेटवर विशेषत: सोशल मीडियावर कोणालातरी किंवा कशालातरी मिळणाऱ्या लोकप्रियतेच्या महालाटा हे नेटवर्कच्या अशाच विचित्र वर्तनाचा एक आविष्कार. सोशल मीडियावर पाकिस्तानी चहावाला किंवा नेपाळी भाजीवालीला मिळालेली अफाट प्रसिद्धी ही अशाच महालाटेचे ताजे उदाहरण. याआधीही व्हाय धिस कोलावरी किंवा ओपा गँगनम स्टाईल किंवा पीपीएपी साँगसारख्या व्हिडीओच्या लोकप्रियतेच्या महालाटा आपण अनुभवलेल्या आहेत. अशा अनाकलनीय पण अल्पजिवी महालाटा महाकाय (सोशल) नेटवर्कवर बऱ्याचदा येत असतात. आणि येत्या काळात नेटवर्क जसजसे अजून मोठे होत जाईल तसे त्यांचे प्रमाणही वाढत जाईल. सोशल मीडियावर कोणत्या टप्प्यावर गर्दीचे रूपांतर महालाटेत होईल हे सांगणे जसे अवघड आहे तसेच कोणाच्या आणि कशाच्या बाबतीत ही महालाट निर्माण होईल हेही सांगणे अवघडच आहे. पण हल्ली बाळबोध गंमत, विसंगती, निरागसता, कारुण्य, भीती, वैचित्र्य अशा भावनांना किंवा मानवी स्खलनशीलतेला स्पर्श करणाऱ्याा पोस्ट्स अशा महालाटेत रूपांतरित होण्याची शक्यता जास्त असते. लाखो लोकांच्या सांस्कृतिक, बौद्धिक वैविध्याला पार करून त्यांच्या मनाला स्पर्श करण्याची ताकद अशा खोलवरच्या मानवी संवेदना किंवा प्रेरणांमध्ये असते. इतकी देखणी व्यक्ती इतक्या विपरीत स्थितीत कशी या विसंगतीची ऊर्जा मिळाल्याने पाकिस्तानी चहावाला किंवा नेपाळी भाजीवालीच्या फोटोची व्हायरल महालाट आली असे म्हणता येऊ शकते. इंटरनेटवर नियोजनातून गर्दी नक्कीच निर्माण करता येऊ शकते, पण महालाटा नाही. ती खास नेटवर्कच्या अंतर्गत गुंतागुंतीची किमया. यापुढे अशा महालाटा अनपेक्षितपणे बऱ्याचदा येत-जात राहतील याचीही मानसिक तयारी ठेवली पाहिजे. - विश्राम ढोले (तंत्रज्ञान, संस्कृती व संज्ञापन या विषयाचे अभ्यासक)* चार वर्षांपूर्वी व्हाय धिस कोलावरी, कोलावरी डी? या गाण्यानं असंच इंटरनेट ब्रेक करत लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. त्यावेळी या गाण्यापलीकडे भारी काहीच दिसत नव्हतं अनेकांना या गाण्याचा अर्थही अनेकांना कळत नव्हता तरीही त्या गाण्यामागे सगळे दिवाने झाले होते.* मध्यंतरी सिक्सवर्ड्स स्टोरीजच्या नावाखाली सहा शब्दांमध्ये गोष्ट सांगण्याचा असाच आटापिटा जनतेनं केला.* अमर फोटो स्टुडिओ या टॅगखाली एका नाटकाच्या प्रसिद्धीनं अनेकांना आपला लहानपणचा किंवा शाळेतला किंवा ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो आपापल्या फेसबुक प्रोफाईलवर टाकायला भाग पाडलं. आणि आपण काय करतोय हे न समजूनही अनेकांनी ते खुळ्यागत केलं.* अमेरिकेत समलैंगिकांना विवाहाचा हक्क मिळाल्यावर भरपूर लोकांनी आपले फोटो सप्तरंगी केले तर फ्रान्समध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यावर फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाच्या आपले डीपी बुडवले. आपण काय करतोय, हे अनेकांना माहितीही नव्हतं.* कधीकधी कविता करून दुसऱ्याला कविता करायला लावण्याची टूमही निघते. तर कधी पुस्तक वाचनाची. कधी काही ना काही डेअर करत राहण्याची.* आपण इतरांच्या स्पर्धेत मागे पडू या भीतीने आणि आपणही ‘इन’ आहोत हे दाखविण्यासाठी अनेकजण इतर जे करतात ते स्वत: करतात. ( लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)
onkark2@gmail.com