‘दादा... ’
‘काय चिनुराव? आज स्वारी भर दुपारी इकडे कशी?’
‘हे वाच, टीचरनी दिलंय.’
‘नोटीस दिसतेय. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्याकरिता वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. वेशभूषेसाठी विषय- निसर्ग... हं, मग?’
‘तू सांग, मी काय बनू?’
‘अरे ! मी का सांगू? तू ठरवायला हवंस ना तुला काय बनायचंय ते?’
‘मला नै माहीत. आई म्हणाली दादाला विचार म्हणून.’
‘हे बरंय! विषय - निसर्ग, मग काय? झाड बनशील? चॉकलेटी टी-शर्ट, पॅँट घालून आणि हाता-पायाला पानं लावून?’
‘नको. झाड फार कॉमन आहे.’
‘मग? सूर्य होशील?’
‘सूर्य? अं?’
‘मला सांग, कपडे काय काय आहेत तुझ्याकडे?’
‘कपड्यांचं राहू देत तू. आई आणेल ते. तू फक्त सांग मी काय बनू.’
‘हां हां! ओके, मग तू ना ढग हो मस्तपैकी. कापूस लावून.’
‘ढग? काळा की पांढरा?’
‘बरं नको. तू पाऊस हो.’
‘पाऊस? काहीतरीच हं! पाणी कसं दाखवणार?’
‘...दादा, मी ना इंद्रधनुष्य बनतो. सगळ्यात सोप्पं. सात रंगांचे कपडे घालून जायचं.’
‘भारी! चालेल की!’
‘हं. पण नाही. इंद्रधनुष्य नाही. ते तर मीच ठरवलं. तू सांग, मी काय बनू. तू सांगशील तेच बनणारे मी.’
‘अरे चिमण, तुझ्या शाळेत आहे ना स्पर्धा? मग तू ठरवायला हवंस ना तुला काय बनायचं ते? मी का म्हणून सांगायचं?’
‘आई म्हणते तुझं डोकं छान चालतं. तू सांगितलेलं केलं की मी जिंकतो. म्हणून तू सांग मी काय बनू?’
‘बरं बुवा, विचार करून सांगतो मी उद्या.’
‘ओके, पण विसरू नकोस आणि हो, भाषण पण करायचंय स्टेजवर. ते पण लिहून ठेव.’
‘ठीके.’
‘फक्त पाचच ओळी हं. पाठ करायचंय मला... नेहमीसारखं लांब लांब लिहित बसू नकोस, छोटंसंच लिही.’
‘ओके बॉस!’
- प्रसाद सांडभोर