शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सांगितलं स्वत:लाच, एव्हरीथिंग इज पॉसिबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 8:00 AM

डोंगर चढणं-उतरणं मला नवीन नव्हतं, पण गिर्यारोहणासाठी तेवढंच पुरेसं नसतं, मात्र मी ठरवलं करू, असं काहीतरी करू की चार लोकांत आपलं नाव झालं पाहिजे.. आणि तिथून सुरू झाला हा प्रवास..

- अनिल वसावे

आजूबाजूला डोंगर आणि पायाखाली कच्चा रस्ता. धुळे जिल्ह्यातलं बालाघाट हे माझं गाव. गावातल्या पाड्यावरच्या वस्तीशाळेत प्राथमिक शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या शेंदुर्णीत झालं आणि पुढे डी. फार्मसी शिकायला साताऱ्याला गेलो. या प्रत्येक टप्प्यात मला वाटायचं की आपण विशेष काहीतरी करायला हवं. आपल्याला लोकांनी आपल्या नावानं ओळखायला हवं. चारचौघात आपण वेगळं दिसावं ही माझी लहानपणापासूनची इच्छा.

२०१५ मध्ये शाहू स्पोर्टसने ‘जरंडेश्वर गिर्यारोहण स्पर्धा’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. कॉलेजमधले सर म्हणाले, तू चांगला काटक आहेस, तू स्पर्धेत उतर. मी भाग घेतला, यशस्वी झालो. स्पर्धेचं बक्षीस वितरण एव्हरेस्टवीर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे गिर्यारोहण प्रशिक्षक आनंद बनसोडे यांच्या हस्ते झालं. तिथे त्यांच्याशी पहिल्यांदा गाठ पडली. त्यांना माझं कौतुक वाटलं. तू माझ्याकडे ये, मी तुला गिर्यारोहणासाठी तयार करतो असं म्हणत त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. डोंगर चढणं माझ्यासाठी नवीन नव्हतं. गावातल्या डोंगरांवर चढा-उतराची नेहमीचीच सवय होती. पण गिर्यारोहणात काही विशेष करायचं असेल तर गिर्यारोहणाचं व्यावसायिक प्रशिक्षण-मार्गदर्शन गरजेचं असतं.

 

कॉलेज आणि अभ्यास सांभाळून रोज गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी वेळ काढणं शक्य नव्हतं. मी मधून मधून बनसोडे सरांच्या शिबिरांमधे जात होतो. सरांनी गिर्यारोहणासाठी अंगावर काय घालायचे ते डोंगर चढण्यासाठी पाऊल कसं टाकायचं या बारीक बारीक गोष्टी शिकवल्या. ‘३६० एक्सप्लोअर ग्रुप’ या त्यांच्या ग्रुपमार्फत मला गिर्यारोहणाच्या वेगवेगळ्या संधी मिळू लागल्या. गावाकडे गेलो की गावातले डोंगर चढून सरावाची भूक भागवायचो. धडगाव तालुक्यातलं अस्तंबा गावातला अस्तंबा डोंगर. सातपुडा पर्वत रांगेतला हा सर्वात उंच डोंगर. त्या डोंगरावर दिवाळीत जत्रा भरते. जे नवस करतात तेच नवस फेडायला तिथे जातात. पण मी मात्र घरच्यांचा विरोध असूनही दिवाळीच्या सुटीत बिना नवसाचा फक्त सरावासाठी जायचो. माझ्या या प्रयत्नातूनच मला दक्षिण आफ्रिकेतील किलिमांजारो या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावरची चढाई करण्याची संधी मिळाली होती. कोरोनामुळे ही मोहीम नऊ महिने पुढे ढकलली गेली.

 

किलिमांजारो मोहिमेसाठी निवड करण्यासाठी ३६० एक्सप्लोअर ग्रुपने ऑगस्ट २०१९ मधे एक तीन दिवसांचं सराव शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात देशभरातील गिर्यारोहक सहभागी झाले होते. या सर्वांतून आधी टॉप ३०, मग टॉप १० अशा टप्प्यात माझी निवड झाली. पण प्रत्यक्षात निवड झाल्याचं पत्र हातात पडायला ऑक्टोबरचा पहिला आठवडा उजाडला. आणि हे पत्र हाती पडताक्षणी माझी सगळी धावपळ सुरू झाली. निवड तर झाली पण घरुन आई वडिलांची परवानगी मिळ्वणं, बेताच्या आर्थिक परिस्थितीत या मोहिमेसाठी पैसे जमवणं, पासपोर्ट काढणं, किट घेणं, बाकीची जमावाजमव करणं अशी असंख्य कामं होती.

 

आई वडिलांना जेव्हा या मोहिमेबद्दल सांगितलं तेव्हा ते आधी नाहीच म्हणाले. त्यांची भीतीही रास्तच होती. एवढी अवघड चढाई. कुठे पाऊल वाकडं पडलं तर मृत्यूशी गाठ. त्यांना भीती वाटत होती. पण माझ्या दोन मित्रांनी आई वडिलांची समजूत काढली. पण पैशांची जमवाजमव करणं हे अवघड काम होतं. आई अंगणवाडी शिक्षिका. तिच्या एकटीच्या कमाईवर घरखर्च चालतो. माझ्या या मोहिमेचा खर्च घरच्यांना पेलणं शक्यच नव्हतं. मी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात आर्थिक मदतीसाठी अर्ज केला. तेव्हाच किलिमांजारो मोहिमेसाठी आदिवासी भागातल्या तरुणाची निवड अशी वर्तमानपत्रात बातमी आली आणि माझा अर्ज स्वीकारला गेला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून मला तीन लाख वीस हजारांची मदत मिळाली. मोठं काम झालं होतं.

पण गिर्यारोहणासाठी आवश्यक असलेलं किट घेणं, पासपोर्ट काढणं, भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोना टेस्ट करणं अशा अनेक गोष्टींसाठी भरपूर पैसे लागणार होते. या मदतीसाठी मला ओळखणारी, न ओळखणारी माणसं धावून आली. ‘ पोरगं काहीतरी वेगळं करतंय तर करू थोडी मदत’ म्हणत लोकांनी शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत मदत केली. पैसे जमले. आतापर्यंत स्वत:कडे साधं गाडीचं लायसन्सही नव्हतं. पण पासपोर्ट मिळाला तेव्हा खूप आनंद झाला. आपण हे करू शकू असा विश्वास आला. या सर्व धावपळीनंतर मोहिमेची तयारी करायला काही दिवस होते. गावापासून काही किलोमीटरवर असलेल्या मोल्गी गावातल्या मेडिकलमधे काम करून उरलेला वेळ मी मोहिमेची तयारी करत होतो. रनिंग करुन दमसास वाढवत होतो. योग ,प्राणायाम, ध्यानधारणा करुन या अवघड मोहिमेसाठी आवश्यक असलेली मनाची शांतता आणि चित्ताची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करत होतो.

एवढं सारं पार करुन मी दक्षिण आफ्रिकेत पोहोचलो.

२२ जानेवारीला मारांगू रुटने प्रत्यक्ष किलिमांजारो चढायला सुरुवात केली. पहिल्या दिवसाची सुरुवात जोरदार पावसानं झाली. तरीही त्या दिवशी दुपारी दोनला सुरुवात करत संध्याकाळी सातपर्यंत नऊ किलोमीटर चढाई केली. २३ तारखेला उणे २० तापमान होतं. हाडं गोठवणारी थंडी पहिल्यांदाच अनुभवत होतो. श्वास घ्यायला त्रास होत होता. आपलं काही खरं नाही असं वाटायला लागलं. पण जे होत होतं ते दाखवून चालणार नव्हतं. माझ्यासोबतचा तिथला लोकल गाइड मला सतत ‘हाऊ आर यू’ विचारत होता. मी सर्व बळ एकवटून ‘आय एम फाइन’म्हणत सगळं आलबेल असल्याचं दाखवत होतो. मी जर हातपाय गाळले असते तर गाइडनं पुढे जाऊच दिलं नसतं आणि मला तर मोहीम पूर्ण करायची होती. मी स्वत:ला मोटिव्हेट करत होतो. २६ जानेवारीला सकाळी सव्वा अकरा वाजता किलिमांजारो सर केले. शिखरावर एका बाजूलाच रेंज होती. त्या बाजूला कलून शिखरावर काढलेला फोटो व्हॉटसॲप स्टेटसला ठेवला आणि मी शिखर सर केल्याची आनंदवार्ता माझ्या माणसांपर्यंत पोहोचवली. मी शेवटची चढाई चढत होतो तेव्हा रात्रभर आई वडील जागेच होते. माझं शिखरावरचं तिरंग्यासोबतचं स्टेटस पाहून मी पोहोचल्याचं त्यांना कळलं आणि त्यांच्या जीवात जीव आला. शिखरावर पोहोचल्यावर मला रडूच कोसळलं. आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं माझं स्वप्न किलिमांजारोच्या त्या शिखरावर पूर्ण झालं होतं.

या किलिमांजारो मोहिमेनं मला एकच गोष्ट शिकवली ती म्हणजे ‘एव्हरीथिंग इज पॉसिबल. मला आता एमपीएससीची परीक्षा द्यायचीय. पीएसआय व्हायचंय आणि सोबतीनचं एव्हरेस्टही गाठायचंय. या दोन्ही परीक्षा सर करण्याची हिंमत आणि विश्वास मला किलिमांजारोनं दिला आहे.

चौकट

गरम पाणी आणि बिस्किटं

पाच दिवसांच्या मोहिमेत मला आपल्याकडच्या जेवणाची खूप आठवण येत होती. तिकडे सगळं जेवणच वेगळं. मग पोट भरत नव्हतं. सोबत गरम पाणी असायचं. पाण्यात साखर टाकून त्यात बिस्किटं बुडवून खाल्ले की पोट भरायचं. सोबतीला सफरचंद, केळी होतीच. त्यांनी मला मोठी साथ दिली.

- मुलाखत आणि शब्दांकन - माधुरी पेठकर