- स्नेहा मोरे
वर्षभरातल्या ३६५ दिवसांपैकी ‘स्त्री’चे अस्तित्त्व अधोरेखित करणारा एक दिवस. महिला दिन. झाले की आता आठ दिवस. भरपूर कौतूक झाले त्या काळात स्त्रीशक्तीचे. त्यादिवशीची ही गोष्ट. महिला दिनाच्या दिवशी ‘शुभेच्छां’चं जंजाळ होतं. त्या ओव्हरडोसमधून बाहेर पडत त्यापलिकडे जाऊन काही शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्या शोधात यू-ट्यूबवर सर्फिंग करताना ‘थँक्स, बट नो थँक्स’ हा व्हिडीओ सापडला. आणि मग अवघ्या काही मिनिटांच्या या व्हिडीओने विचार करण्यास भाग पाडला.
व्हिडीओनंतर मग आपणही आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक पुरुषाला ‘थँक्स, बट नो थँक्स’ म्हणावसं वाटलं, तुम्हालाही ते वाटेल यात शंका नाही. या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील ‘ती’ आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील त्या क्षणांसाठी ‘थँक यू फॉर द ब्युटीफुल फ्लॉवर्स’, ‘थँक यू फॉर द चॉकलेट्स’, ‘थँक यू फॉर द टेकिंग एक्स्ट्रा केअर’, ‘थँक यू फॉर क्युट सॉफ्ट टॉइज’ असं म्हणते खरी.
पण, त्यानंतर अत्यंत धाडसीपणे ‘आय सेलिब्रेट माय सेल्फ एव्हरीडे’ म्हणणारी ‘ती’ काळजाला भिडते. ‘आय चूझ मी एव्हरीडे’, ‘आय रिस्पेक्ट माय सेल्फ एव्हरीडे’, ‘आय पॅम्पर माय सेल्फ एव्हरीडे’ असं बिनधास्तपणे म्हणणारी ‘ती’ आजच्या घडीला समाजात पुरुषाबरोबर किंबहुना एक पाऊल पुढे उभी आहे. या व्हीडीओमध्ये ‘स्त्री’ शक्ती एकवटून जेव्हा ‘वी डोन्ट नीड वन डे’ असं म्हणते तेव्हा ती अनेक प्रश्नच उपस्थित करत असते.
याप्रमाणे, फेसबुकवरही ‘दोस गाईज्’ या पेजनेही महिला दिनी हटके मेसेज देऊन समाजाची चाकोरी मोडली. त्यात या पेजवर काही तरुण मुलांनी एकत्र येत हातात बोर्ड घेऊन त्या माध्यमातून वेगळा संदेश दिला. साधारणत: ‘स्त्री’ म्हणून समाजाच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी आमच्या आयुष्यातील ‘स्त्री’च करते, असे यातून दाखविण्यात आले. यात ‘आय एम अ मॅन अॅण्ड माय वाईफ इज द वन हू फिक्सेस द बल्ब’, ‘आय एम अ मॅन अॅण्ड माय वाईफ ट्रेन्स मी अॅट जीम’, ‘आय एम अ मॅन अॅण्ड फॉर मी माय वाइफ इज सुपरहिरो’ आणि ‘ ‘आय एम अ मॅन अॅण्ड माय सिस्टर आॅलवेज विन्स इन आर्म रेस्लिंग’ अशा संदेशांचा समावेश आहे. सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होणाऱ्या या पोस्ट्सप्रमाणे ‘तो’ विचारही समाजात तितक्याच गतीने रुजावा असं वाटतं. महिलांचे प्रश्न वेगळ्या संदर्भानं त्यातून कदाचित पाहता येतील!