‘तुम्ही आहात का मॅरेज मटेरिअल’ असं विचारणारा लेख ऑक्सिजनने १३ मार्चला प्रसिद्ध केला होता. निमित्त होतं इंधूजा पिल्लई नावाच्या तरुणीनं तयार केलेली स्वत:ची वेबसाइट. आपण कसे आहोत हे कसलाही आडपडदा न ठेवता तिनं सांगून टाकलं होतं आणि मोकळेपणानं जोडीदाविषयीच्या अपेक्षाही लिहिल्या होत्या. त्या पचायला जड होत्याच सगळ्या समाजालाच!
म्हणून ऑक्सिजननं ठरवलं, आपल्या वाचक मित्रमैत्रिणींना विचारावं की, तुम्हाला असं थेट-स्पष्ट आणि स्वच्छ सांगता येईल स्वत:विषयी मोकळेपणानं? आणि दुसरं म्हणजे, टिपिकल अपेक्षांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कसा हवाय जोडीदार हे सांगा?
अपेक्षेप्रमाणं अनेकांनी लिहिलं, पण स्वत:विषयी फारच कमी लोकांना काही सांगता आलं. वय-उंची-नाव-गाव-रंग-शिक्षण यापलीकडे स्वत:विषयी चार ओळीसुद्धा अनेकांना धड सांगता आल्या नाहीत! आपली आवड, स्वभाव, आपली मूल्यं, जगण्याची शैली हे काही म्हणता काही सांगता आलं नाही!
बाकी, जोडीदाराकडून हातभर आणि पुन्हा ‘टिपिकल’ अपेक्षा होत्याच; म्हणजे आहेतच!! त्यातही तरुणांच्या, त्यांना अजूनही ‘कमीच बोलणारी, शिकलेली, कमावती, पण गृहकृत्यदक्ष, नवर्याचं ऐकून घेणारी समजूतदार बायकोच हवी आहे!’
आणि मुलींना मात्र स्वतंत्र, मोकळढाकळं, स्पेसवालं स्टेबल आयुष्य हवं आहे! दोघं दोन टोकावर. मात्र याहून गंभीर एक गोष्ट आम्हाला या पत्रात आढळली.
ही सारी पत्रं वाचताना आम्हाला प्रश्न पडला की, ज्यांना आपण स्वत: कसे आहोत हेच सांगता येत नाही, ते जोडीदार कसा हवा हे सांगतात, जोडीदारानं तडजोड करावी म्हणतात, आग्रह धरतात. पण स्वत:विषयी मात्र काहीच गंधवार्ता नाही!
हे किती भयाण आहे?
म्हणूनच निदान लग्न करताना तरी माहिती हवं तुमचं तुम्हाला की, आपण कसे आहोत? आपला स्वभाव काय, आपली जीवनशैली कशी आहे, आपले विचार काय म्हणून या काही प्रश्नावल्याच!
त्यातून तरी ओळखा स्वत:ला आणि मग अपेक्षांचे डोंगर बांधा!
इतरांविषयीचे अंदाज चुकले तर ठीक, पण निदान स्वत:विषयीचा अंदाज चुकू नये,
तो चुकला की फसगत अटळ-कायमची!
- ऑक्सिजन टीम