कलीम अजीम
मंगोलीयन लोकं आपल्या धाडसी करामतींसाठी इतिहासात अजरामर आहेत; पण आज इतिहासातली नाही, तर वर्तमानातली एक भन्नाट धाडसी कहाणी सांगतोय. बायगेल्मा नॉरजामा नावाची 30 वर्षाची मंगोल तरु णी जग फिरायला निघाली आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? हल्ली बरेच जण जातात.जरा थांबा, ही बायगेल्मा उंटावरून जगभ्रमंतीला निघाली आहे. उंटावर बसून ती 12 हजार किलोमीटरच्या सफरीवर निघाली आहे.मंगोलिया ते लंडन अशा 14 देशांच्या ट्रिपवर बायगेल्माचा काफिला आहे. तीन वर्षे चालणार्या या सफरीचा मार्ग अर्थातच खडतर आहे. व्हिसा, स्थानिक प्रशासनाची संमती, भौगोलिक अडचणींवर मात करत आता वर्ष झालं ती उंटावरून प्रवास करतेय. आता तर तिच्या या थरारक सफरीवर फिल्म्सदेखील बनवल्या जात आहेत.
मात्र हे असं उंटावरून जग पाहण्याचं धाडस करावं असं या मुलीला का वाटलं असेल? बायगेल्माच्या या प्रवासाची कथा फारच रोचक आहे. एका हौशी व निसर्गप्रेमी कुटुंबात तिचा जन्म झाला. ती गेल्या 10 वर्षांपासून पर्यटन व्यवसायात सक्रि य आहे. तिची स्वतर्ची ‘ऑफ रोड मंगोलिया’ नावाची टूर एजन्सी आहे. ट्रेकिंग हा तिचा आवडीचा छंद. तिनं संपूर्ण मंगोलियाच्या टेकडय़ा फिरून पालथ्या घातल्या आहेत. देशातील जवळजवळ सर्व शिखरांवर चढण्याचा तिनं विक्र म केला आहे. याच छंदापायी तिनं माउंटनियरिंगची डिग्री मिळवली आहे.2010 साली तिला ऑस्ट्रेलियातील टीम कॉपबद्दल समजलं. तो मंगोलिया ते हंगेरी घोडय़ावरून यात्ना करत होता. तिलाही असंच काहीतरी करावंसं वाटलं. तिनं विचार केला की हे धाडसी काम जर एखादा परदेशी करू शकत असेल तर मी का नाही? मी तर मंगोलीयन आहे. मलाही जमू शकेल.ही ड्रीम कल्पना ज्यावेळी तिनं आपल्या मित्नांना सांगितली त्यावेळी तेही तिच्यासोबत सफरीवर येण्यास तयार झाले. सर्वांनी मिळून मंगोलिया ते लंडन अशी 14 देशांच्या प्रवासाची आखणी केली. या प्रवासातून युरोप, तुर्की, आशिया खंडातून जाणार्या सिल्क रूटचा शोध त्यांना घ्यायचा आहे. कारण याच रस्त्यावरून प्राचीन काळी त्यांचे मंगोल पूर्वज उंटावरून जगाच्या सफरीवर निघाले होते. पण तिनं प्रवासासाठी घोडे न निवडता उंट का निवडले? या प्रश्नाला तिने दिलेलं उत्तर भन्नाट आहे. ती म्हणते, ‘मंगोल घोडय़ांच्या कथा जगाला माहीत आहेत. ते किती चपळ आणि साहसी होते त्याची नोंद इतिहासात आढळते; पण मंगोल उंटाबद्दल फारसं कुणाला माहीत नाही. त्यामुळे मंगोल उंटाची ओळख जगाला व्हावी म्हणून त्यांना प्रवासात सोबत घेतलं.’ मंगोलियात घोडय़ाएवढेच उंटालादेखील महत्त्व आहे.
उंटावरच्या प्रवासाबद्दल ती सांगते, ‘बर्याच लोकांना वाटतं की, गाडी चालवण्याइतका हा प्रवास सोपा आहे; पण तसं नाही. वेळ जास्त लागतो. जोखीम जास्त आहे. सोबत उंट असल्यानं त्यांची देखरेख करणं, त्यांना वेळीच खायला देणे, बर्फाळ प्रदेशात पाणी शोधून त्यांना पाजणं, त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष देणं हे सारं बारकाईनं करावं लागतं. उंट दररोज फक्त 30 किलोमीटर चालतात. बर्फाळ प्रदेशातून चालणं त्यांच्यासाठी खूप त्नासदायक काम आहे. त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तेलानं मॉलिश करावं लागते. मी थकले तरीसुद्धा त्यांच्या गरजा पूर्ण करणं भागच असतं. त्याला पर्याय नाही.’आत्तापर्यंत या चमूनं चीन आणि कझाकिस्तान राष्ट्रं पार केली आहेत. पुढे ती उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानमध्ये प्रस्थान करणार आहे. नेव्हिगेशन मॅप टूअर गाइड म्हणून त्यांचा आधार झाला आहे.तिला प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोकांची मदत मिळते आहे. लोकांचा प्रतिसाद बघता बायगेल्माचा उत्साह वाढला आहे. मंगोल हा भटका समुदाय मानला जातो. जगभरात 1 कोटी मंगोल लोक पसरले आहेत. आपली मंगोल ओळख जपायची म्हणून ती पारंपरिक वेशभूषेतच प्रवास करते आहे. या ट्रीपमधून तिला मंगोलीयाचा सांस्कृतिक वारसा जगाला सांगायचा आहे. बायगेल्माचा हा धाडसी प्रवास यशस्वी झाला तर ती उंटावर बसून एवढा दीर्घ प्रवास करणारी आजवरच्या इतिहासात जगातली एकमेव महिला ठरेल!उंटावरचे शहाणे आपण भरपूर पाहतो, उंटावरचं हे धाडस काबील ए तारीफ आहे!