- श्रुती पानसे
अंतर पडणं हे वाईटच ! मग ते कोणातही का असेना ! म्हणून शक्यतो हातात हात हवेत. पाश्चात्त्य संस्कृतीत मूल चौदा-पंधराव्या वर्षी आईबाबांपासून सुटं व्हायला लागतं. आपल्याकडे अजून ती परिस्थिती नाही. पण याचा अर्थ घराघरांमधलं वातावरण अगदीच गुण्यागोविंदाचं असतं असंही नाही. कित्येक घरांमध्ये आईबाबा म्हणतात ते आणि मुलांना वाटतं ते यामध्ये भलंमोठं अंतर पडतं. मुलं आईबाबांपासून सर्व काही लपवू बघतात. यामुळेच धोका वाढतो. असा कोणताही धोका निर्माण होऊ द्यायचा नसेल तर संवाद तसाच पाहिजे. मुलांना सावधगिरीच्या ढीगभर सूचना द्याव्याशा वाटतात. ‘तुझ्यावर विश्वास आहेच, पण जगावर नाही.’ हे म्हणणं पालकांनी मुलांपर्यंत - विशेषत: मुलींपर्यत पोचवायला हवं. दुसऱ्यांच्या वैचारिक क्षमतेवर विश्वास हवा. प्रत्येकाला विचार करता येतो. ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. तो व्यक्त करायला लागेल. तरच मुलं आपल्याशी मोकळी होण्याचा निदान विचार तरी करतील. मुलांनी आपल्याशी येऊन बोलावं यासाठी पालकपणाची झूल थोडी बाजूला सरकवून त्यांचे मित्र मैत्रिणी बनावं लागेल. मुला-मुलींवर विश्वास असतोच. पण तो वेळोवेळी व्यक्त करावा लागेल- अगदी त्यांच्या मित्रमैत्रिणींसमोरसुद्धा. मुलं आणि पालक एकमेकांशी मन मोकळं करत असतील तेव्हा दोघांनीही अतिशय शांतपणे प्रतिक्रि या द्यायला हवी. सिनेमातल्या पारंपारिक आईबाबांसारख्या प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल. पण चिडून - संतापून बोललात, तर हा संवाद संपू शकतो. आपल्याला हा संवाद संपवायचा नाही. तर चालू ठेवायचा आहे. पालकांची भीती वाटते, म्हणूनच मुलं घरात येऊन बोलत नाहीत. म्हणून आपला दृष्टिकोन खाप पंचायतींसारखा निष्ठुर नको. कोणताही निर्णय घेताना मुलांना आणि मुलींना त्या निर्णयाच्या जास्तीत जास्त पैलूंकडे बघायला लावा. प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लावा. गाईडसारखे रेडिमेड उपदेश नकोत. चांगल्या आणि वाईट गोष्टींची चर्चा करायला हवी. त्यातूनच मार्ग सापडेल. हा मार्ग त्यांचा त्यांना सापडला तर ते त्याप्रमाणे वागतील. नाही तर तो धुडकावून लावण्याचीच शक्यताच जास्त. मुलं स्वतंत्र होऊ बघताहेत. त्यांचे प्रश्नही तितक्याच नाजूकपणे सोडवले गेले तर खरं तर सर्वांच्याच दृष्टीने योग्य ठरेल. परंतु अजूनही बऱ्याच घरांमध्ये जिथे मुला-मुलींच्या बदलत्या आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वालाच स्वीकारलेलं नसतं. आम्ही म्हणू ते करायचं, अशी हुकुमशाही असते. एकमेकांचं ऐकून घेणं आणि स्वीकारणं म्हणजे दुसऱ्याची मनमानी सहन करणं असं नाही. तर जे काही चालू आहे, त्याबद्दल बोलत राहणं. जाणून घेणं. अंतर कमी करणं. शेवटी पालक आणि मुलं - मुली हे एकाच होडीचे प्रवासी. स्वतंत्र निर्णय घेऊ बघतात, म्हणून त्यांचं एकदम शत्रुत रूपांतर होत नाही. हा गुंता विचारांनी सोडवणं महत्त्वाचं ! त्यासाठी काही महत्वाची तत्त्व दोघांनीही लक्षात ठेवायला हवीत. दोघांनी म्हणजे आईबाबांनी आणि वयात येत असलेल्या ( म्हणजे शिंग फुटलेल्या) त्यांच्या मुलांनीही. ती अशी :
1. मुलं जसजशी मोठी होतात, तसं त्यांचं क्षेत्र व्यापक होतं. अशा वेळेस मुलं आपल्यापासून दुरावताहेत की काय, अशी शंका पालकांच्या मनात येते.
2. मुलं आपल्यापासून लांब जाऊ नयेत, म्हणून ते त्यांना जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या याच प्रयत्नात मुलं अजूनच लांब जातात. तुटतात.
3. मुलांना वाटतं, माझं काहीच हे समजून घेत नाहीत. तर पालकाना वाटतं, आम्ही इतकं करतो, तरी मुलं आमच्याशी अशी का वागतात?
4. मुलं जवळ असावीत असं वाटत असेल तर आईबाबांनी आपलं वर्तुळ मोठं करायला हवं.
5. मुलांना शिंगं फुटली की ते आईबाबांच्यामधले दोष काढायला लागतात, त्यांच्या तक्रारी वाढतात. यातून भांडणं आणि पुढे विसंवाद निर्माण होतात. हे सर्व होण्यापेक्षा मुलांच्या मनातलं न घाबरता पालकांशी बोलता आलं तर पुढचे अनेक प्रश्न मिटतील सहज जमतील अशा दोन आयडिया
1. घरच्यांची संडे मिटिंग सगळे आपापल्या घाईत. कोणालाच कोणाशी बोलायला धड वेळ नाही. यावर उपाय म्हणून एका कुटुंबाने दर रविवारी सकाळची वेळ घरच्यांच्या मीटींगसाठी ठेवली आहे. घरातले सर्वजण एकत्र बसून या आठवड्यात काय झालं याचा आढावा घेतात आणि पुढच्या आठवड्यात काय करायचं हे ठरवतात. त्यावेळी एकमेकांच्या खटकलेल्या गोष्टीही एकमेकांना सांगतात. मनं स्वच्छ होऊन पुढची दिशा ठरवणं सोपं जातं. भांडणातून मुद्दे बाहेर पडण्याऐवजी मनात साठवून न ठेवता ज्यात्या वेळी मनं मोकळी होतात, हा यामागचा उद्देश. ... त्या कुटुंबाला याचा फार फायदा होतो.
2. पत्र एका कुटुंबाने एक वेगळीच शक्कल शोधून काढली आहे. या घरात एका विशिष्ट ठिकाणी एक पारदर्शक फोल्डर ठेवलं आहे. ज्यावेळेस घरातल्या कुणालातरी कुणाला काही सांगायचंय पण संकोच आड येतोय किंवा भीती वाटते आहे, अशी परिस्थिती असते. तेव्हा त्या व्यक्तीच्या नावे पत्र लिहून फोल्डरमध्ये ठेवलं जातं. ज्याच्या नावाने पत्र असेल, तीच व्यक्ती ते पत्र वाचते. परस्परांमधल्या वादांना, समज-गैरसमजांना वाट देण्याची ही एक सुंदर पध्दत आहे. अशा मन मोकळं करण्याच्या काही पद्धती विचारी कुटुंबांनी तयार केल्या आहेत.