कुठले कपडे घातले, कुठले कलर्स वापरले तर मी जरा तरी बारीक दिसेल?
- श्रेया पांगे, नाशिक
हा प्रश्न खरं तर अनेकांना रोज सतावतो. काहीही घाला, आपण खूप जाड दिसतो असंच अनेकींचं मत असतं. पण आपण ‘जाडच’ दिसतो हा कॉम्प्लेक्स डोक्यातून काढून टाकला आणि जरा विचारपूर्वक कपडे घालण्याचं सूत्र शिकून घेतलं तर काही कपड्यांत तुम्ही नक्की आहात त्यापेक्षा बारीक दिसू शकता. त्यासाठीचीच ही १0 सूत्रं. मुलीच नाहीतर मुलांनाही नक्की उपयोगी पडतील.
१) जी माणसं जाड आहेत त्यांनी शक्यतो डार्क रंगाचे कपडे वापरूच नयेत असं म्हटलं जातं, पण तसं करु नये. ब्राईट कलर्स वापरले तर आपण तरुण दिसतो, शिवाय आपला मुडही चांगला राहतो. पोट खूप सुटलेलं असेल तर डार्क कलरचा टॉप वापरावा. तेच जाडजाड मांड्यांचही, तंग सलवारी घालू नयेत. त्याएवजी सलवारचं बॉटम डार्क कलरचं असेल असं पहावं. तुमच्या ड्रेसच्या बाह्या, नेकलाईन, पायातले बूट, बॅग हे सगळं ब्राईट कलरचं वापरा.
२) मोठमोठय़ा प्रिण्ट्सचे किंवा अगदी मीडियम प्रिण्ट्सचे कपडेही घालू नयेत. त्यापेक्षा बारीक प्रिण्टचे कपडे वापरावेत. तिरक्या किंवा उभ्या रेघांचे कपडे वापरणं केव्हाही उत्तम. त्यामुळे तुम्ही बारीक दिसता. हा नियम मुलींइतकाच मुलांनाही लागू होतो.
३) प्लेट्स, अस्तराचे कपडे शक्यतो घालूच नका. त्यामुळे तुम्ही आणखी जाड दिसता. त्यापेक्षा ‘गॅदर्स’ टाईपचे कपडे वापरा. त्यात तुम्ही जास्त बारीक दिसता. सेमी फिटेड टॉप वापरणं नेहमी चांगलं. अंगाला चिकटणार्या कापडाचे ड्रेसेस शक्यतो वापरू नयेत. गॅदर्स स्लिव्हज वापरूनही बारीक दिसण्याचा फिल देता येऊ शकतो.
४) मुळात आपण जाड आहोत म्हणजे काय हेच जरा समजून घ्यायला पाहिजे. तुमची अप्पर बॉडी जाड आहे की लोअर बॉडी जास्त जाड आहे ? जो भाग त्यातला त्यात बारीक असेल त्यासाठी कपडे निवडताना ब्राईट कलरचे कपडे वापरा. एम्ब्रॉयडरी, पिनटक्स यांचा वापरही चांगला. त्यामुळे हे कपडे उठून दिसतील आणि तुमच्या शरीरातल्या अवजड भागाकडे फारसे लक्ष जाणार नाही.
५) तुमचं पोट सुटलेलं असेल तर घट्ट, तंग टीशर्ट, कुर्ती, शर्ट्स अजिबात वापरू नका. ते पोटावर लटकल्यासारखे दिसतात आणि तुमचं पोट किती सुटलंय याकडे इतरांचं सहज लक्ष जातं. त्यापेक्षा जरा सैलसर, मोठे कपडे घाला.
६) तुमच्या वयाप्रमाणंच नाही तर तुमच्या कामाप्रमाणे, तिथल्या वातावरणाप्रमाणं कपडे वापरा. नाहीतर तुम्ही फारच उल्लू दिसता आणि तुमच्याकडे अकारण जास्तीच्या नजरा वळतात.
७) शॉपिंगला जाताना ‘साईज’ सांगायला लाजू नका. उत्तम फिटिंगचेच कपडे घ्या. जास्त घट्ट नाहीत, जास्त सैल नाहीत, मापाचेच कपडे घ्या. तुम्हाला एखादा ड्रेस आवडला, ट्रायरूममध्ये घालून पाहिला. फिटिंगला चांगला वाटला तरी लगेच घेऊ नका. तो ड्रेस घालून चक्क आरशासमोर खाली बसा. बसल्यावर तो ड्रेस पोटावर, कंबरेवर, मांड्यांमध्ये जास्त घट्ट होत असेल, तरंगल्यासारखा दिसत असेल तर त्या साईजचा ड्रेस घेऊ नका.
८) तुम्ही जाड असाल ना तर चांगल्या घसघशित अँक्सेसरीज बिंधास्त वापरा. म्हणजे मोठया डायलची घड्याळं, ब्रेसलेट्स, कानातले, बॅग वापरा. एकतर त्यांच्याकडे लक्ष वेधलं जातं आणि दुसरं म्हणजे छोट्या-नाजूक गोष्टी वापरल्या तर त्या तुमच्या अंगावर दिसणारही नाहीत.
९) केस खूप बारीक कापू नका. शॉर्ट हेअरस्टाइल अजिबात करू नका. तरुणांनी निदान तुमचे कान झाकले जातील किंवा कानावर येतील इतपत केस तरी ठेवावेत. त्यामुळे चेहरा लहान दिसतो. तरुणींनी खांद्यापर्यंत केस तरी ठेवावेत त्यामुळे तुमचा चेहरा आणि मान सुंदर दिसते.
१0) मुख्य म्हणजे एकूण राहणीमानच सुधारा. उत्तम परफ्यूम, छान-नाजूक नखं, सुंदर हेअरस्टाइल, स्वच्छ-सुबक चपला किंवा बूट हे सारं नीट समजुतीनं वापरलं ना, तर गबाळ्या बारीक मित्रमैत्रिणींपेक्षा तुम्ही कित्येक पट सुंदर दिसू शकाल.
- प्राची खाडे
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर