तसं सोपं काहीच नसतं..
अवघडच असतं सारं..
कळीचं फुल होत
उमलत उमलत मोठं होणं
आपल्याला दिसत नाही,
पण ते सोपं कसं असेल?
रोज मावळतो सूर्य,
आणि पुन्हा येतो..
हा प्रवास सोपा कसा असेल?
रात्रीच्या मिट्ट अंधारात चमचमणारे
काजवे इवलूसे
त्यांचा प्रकाश टिममिटत असतो,
पण ते टिमटिमणं गच्चं अंधारात
ते सोपं कसं असेल?
पावसाळ्या रात्री, भर पावसात
कुठल्याशा नदीनाल्यात खळखळत येतो
एखादा ओढा
त्या ओढ्याचं डोंगरावरुन धावणं
सोपं कसं असेल?
***
असं सोपं तसं काहीच नसतं..
पण सोपं नसलं तरी ते सहज असतं..
असं ‘सहज’ होणं आपल्याला जमेल का?
आपल्या मनासोबत सहज चालणं होइल का?
जे सहज असतो, ते आपण अवघड करतो,
गुंत्याच्या किचाटात मन मारत जगतो..
सोपं सारं होत नाही, म्हणून
सहजही आपण काही करत नाही..
आणि जगण्यातली सहज लय आपल्या हाती लागत नाही..
सोपं जगणं जमेल ना जमेल,
सहज तरी जगता यावं,
कधी ओढा, कधी काजवा तर
कधी कळी बनत उमलता, धावता,
चमकता यावं..
- ऊर्जा