एक आजी पत्र लिहित असते, आणि लांबून नातू पाहत असतो. थोडय़ावेळानं तो जवळ येतो आणि आजीला म्हणतो, ‘ तू पत्रत आपण काय काय करतोय, मी कसा वागतोय असं काही लिहितेस का? माझ्याविषयी लिहितेस ना?’
आजी म्हणते, ‘मी तुझ्याचविषयी लिहितेय पण जे लिहितेय त्याहीपेक्षा ही पेन्सिल मला जास्त महत्वाची वाटते. तू मोठा झाल्यावर या पेन्सिलसारखं वागावंस, व्हावंस असं मला वाटतं!’
नातवानं पेन्सिल पाहिली, त्यात विशेष असं काही नव्हतं.
साधीशीच तर पेन्सिल.
‘हिच्यात काय विशेष, साधीच तर आहे.!’ नातू हिरमुसत म्हणाला.
‘ तू या पेन्सिल कसा बघतोस यावर बरंच काही अवलंबून आहे. या पेन्सिलमध्ये 5 महत्वाची वैशिटय़ आहेत, ती तुझ्याठायी आली तर या जगात तू सुखानं राहू शकतील!’
पहिली क्षमता
या पेन्सिलीला बरंच काही लिहिता येतं, तसं तुलाही बरंच काही करता येईल. पण ते करताना हे लक्षात ठेवायचं की, पेन्सिल ज्याच्या हातात आहे तो हात दुस:या कुणाचा तरी आहे. त्या शक्तीला निसर्ग, देव, काहीही म्हणता येईल, पण आपल्या अनेक गोष्टींमागे तो हात असतो, हे विसरू नकोस.
दुसरी क्षमता
अधुनमधुन या पेन्सिलला टोक काढावं लागतं. त्यानं तिला त्रास होतच असेल, पण असा स्वत:ला त्रास करुन घेतल्यानं तिचा टोकदारपणा वाढतो. त्यामुळे काही वेदना, दु:ख वाटय़ाला आले, स्वत:ला त्रास द्यावा लागला तरी लक्षात ठेव की, त्यामुळे माणूस म्हणून तू अधिक शार्प होशील.
तिसरी क्षमता
काही चुकलं, खाडाखोड झाली तर पेन्सिलने लिहिलेलं खोडता येतं. पेन्सिल आपली चूक मान्य करते. तसं तू ही कर, चूक मान्य करुन ती सुधारण्यात काही कमीपणा नाही.
चौथी क्षमता
पेन्सिल बाहेरुन कशी दिसते? लाकडी? पण तिच्या बाह्यरुपाकडे फार लक्ष देऊन नकोस. कारण तिच्या आत शिसं असतं. तेच तुझंही. तुझ्या आत काय चाललंय याकडे जरा लक्ष दे!
पाचवी क्षमता
पेन्सिलीनं लिहिलेलं खोडता येत असलं तरी व्रण कायम राहतात. तेव्हा जे लिहिलं ते विचारपूर्वक लिहावं. त्यामुळे आयुष्यात जे करशील, जे बोलशील ते विचारपूर्वक कर!
( सुप्रसिद्ध लेखका पाऊलो कोएलो यांच्या ‘लाइक द फ्लोइंग रिव्हर’ या पुस्कातली एक छोटीशी गोष्ट)
-ऊर्जा