एवढा मोठा बॅट्समन तू, कितीजण तुला आदर्श मानतात, तुझा खेळ इन्स्पायर करतो त्यांना. तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना तू काय सांगशील?- नव्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं या प्रश्नाचा एक उत्तम यॉर्कर विराटला अलीकडेच एका कार्यक्रमात टाकला.विराटनं मात्र त्याच्यावरही सिक्सर ठोकला. तो जे म्हणाला ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे.‘तुम्ही जे करता, जेव्हा केव्हा करता, खेळता, परफॉर्म करता ते मनापासून करायला हवं. इतरांना दाखवायला, काही सिद्ध करायला काही करू नये. आपण जेन्यूइन असावं. जे वाटलं ते करून मोकळं व्हावं. तसं केलं नाही तर मग तुम्ही जे प्रिटेण्ड करता, त्यासाठी इतर लोकही कनेक्ट करू शकत नाहीत. आणि तुम्ही स्वत:ही स्वत:सारखं जगू शकत नाही. मी कधीच कुणाला कॉपी करत नाही. मी जसा आहे, तसा आहे. जे वाटलं ते करतो. पूर्वी लोकांना फार प्रॉब्लेम होते. लोक तक्रार करायचे, मी असाच वागतो, तसाच बोलतो वगैरे. पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. जे मनात आलं, ते केलं. मी स्वत:ला बदलायच्या भानगडीत पडलो नाही.मग मी स्वत:त बदल केले नाहीत का?
तर केले. पण जेव्हा मला वाटलं की, अमुक गोष्ट मी बदलायची गरज आहे, तेव्हाच मी ती बदलली. दुसºया कुणासाठी किंवा कुणी म्हणतोय, आपली टिंगल होतेय किंवा टीका होतेय म्हणून स्वत:ला बदललं नाही.सगळ्यांना या प्रक्रियेतून जावं लागतं. आयुष्यात मॅच्युअर होताना, मोठं होताना, वाढताना हे सारं घडतंच. घडावंच लागतं. पण ते करताना कायम हे लक्षातच ठेवायला हवं की स्वत:ला बदलण्याच्या प्रक्रियेत स्वत:ची ओळखच पुसून टाकू नये. कारण तुम्ही कुणा दुसºयासारखं व्हायचा प्रयत्न केला, तसं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न केला तर कधीच यश मिळत नाही. आणि इतरांना तुमच्यापासून प्रेरणा वगैरे मिळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.
या एका गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे की, जे आपल्याला वाटतं ते करून मोकळं व्हावं. त्यासाठी ढोर मेहनत करावी. आणि आपण जे करू ते प्रामाणिकपणे मन लावून करावं. मग यश कुठं जाईल !’-विराटचं लग्न, त्याचे ते सारे फोटो, जोक्स हे सारं व्हायरल करताना विराट हे जे म्हणतोय ते सक्सेस मंत्रही नजरेखालून घातलेले बरे !