शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

थ्री इडियट्स जेव्हा नक्षलवाद्यांच्या जंगलात शिरतात...

By admin | Published: January 14, 2016 9:26 PM

कराडच्या तीन सायकलस्वार मित्रांना गेल्या महिन्यात छत्तीसगडच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पकडलं होतं.

 - सचिन जवळकोटे

कराडच्या तीन सायकलस्वार मित्रांना
गेल्या महिन्यात छत्तीसगडच्या जंगलात 
नक्षलवाद्यांनी पकडलं होतं.
त्या काळात त्यांच्या वाट्याला आलेल्या 
थरारक दिवसांची
‘आॅक्सिजन’ने मिळवलेली ही डायरी..
 
‘थ्री इडियट’ पिक्चर बघताना मस्त मजा आली असेल; पण असे अनेक ‘थ्री इडियट’ आपल्याभोवतीही वावरत असतात. आपल्याच धुंदीत जगत असतात. मस्तीत फिरत असतात. पश्चिम महाराष्ट्रातली तीन अवलिया पोरं अशीच एन्जॉयगिरी करत जग पाहण्यासाठी गावाबाहेर पडली.. अन् छत्तीसगडमधल्या दाट जंगलात नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडली. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल पाच दिवस नक्षलवाद्यांनी त्यांना स्थानिक आदिवासींच्या झोपडीत बांधून ठेवलं. डांबून ठेवलं. मात्र, ‘संवादातूनच कोणत्याही संकटातून मात करता येते’ या भूमिकेवर ठाम असलेल्या या तिघांनी अखेर स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. त्या पाच दिवसांत तिथं नेमकं काय घडलं, याचाच शोध घेत-घेत उलगडत गेलेली ही अद्भुत अन् अकल्पित कहाणी...
कऱ्हाडच्या कोयना वसाहतीत राहणारे श्रीकृष्ण शेवाळे अन् आदर्श पाटील हे दोघे जिवलग मित्र. त्यांचाच अजून एक कॉमन फ्रेंड म्हणजे पुण्याचा विकास वाळके.तिघेही ग्रॅज्युएट; मात्र विषय भन्नाट अन् अफलातून. श्रीकृष्ण संस्कृतमधून एम.ए. करतोय, तर विकास भूगोल घेऊन! आदर्श इतिहासातून बी.ए. झाल्यानंतर ‘पंचायतराज’ कोर्स शिकतोय. या तिघांनाही नाद स्वच्छंदीपणे फिरण्याचा. गेल्या वर्षी सायकलवरून त्यांनी अर्धा महाराष्ट्र पालथा घातलेला. प्रकाश आमटे अन् अभय बंग या दोन डॉक्टरांच्या आश्रमांमध्येही राहून आलेले. याही वर्षी त्यांनी गडचिरोली ते विशाखापट्टणम् असा एक हजार किलोमीटर प्रवासाचा प्लॅन आखला. गावोगावची संस्कृती न्याहाळण्याचे इमले रचले. ‘गूगल’वर शेकडो प्रिंट काढल्या. मुक्कामाच्या गावांवर रेघोट्या मारल्या. बॅगा भरल्या. शेंगालाडू, इलेक्ट्रॉन पावडर, ग्लुकोज अन् कपड्यांनी भरलेल्या बॅगा सायकलला बांधून हे तिघे एसटी बसने पुण्यातून गडचिरोलीकडे निघाले. सायकली टपावर, तर तिघे आतमध्ये. 
२५ डिसेंबर २०१५ रोजी भामरागडमधून त्यांनी सायकलवरून प्रवासाला सुरुवात केली. दर ५०-६० किलोमीटर अंतरानंतर मुक्काम करत ते २९ तारखेला छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात पोहोचले. बिजापूरनंतर दाट झाडी सुरू झालेली. घनदाट जंगलातला किर्रर्रऽऽ अंधार अनुभवत सुनसान रस्त्यावरून सायकली पळू लागलेल्या. बासागुडापर्यंत ते पोहोचले. रात्रीचा मुक्काम जागरगोंड्याला होता. रेंज नसल्याने मोबाइलही बंद करून ठेवले. दुपारी एक वाजता तहान लागली म्हणून एके ठिकाणी ते थांबले. एवढ्यात जंगलातून काही मंडळी त्यांच्याभोवती जमली. कमरेला अर्धी लुंगी, वर चुरगाळलेला अन् मरगळलेला हाफशर्ट. काही जणांच्या हातात बांबूचे बाण. एकाच्या हातात सुरा. हे पाहताच तिघे दचकले. चमकले. ‘आपण देशभ्रमणाला निघालेले प्रवासी आहोत’ असं हिंदीतून अन् मराठीतून सांगूनही समोरचे चेहरे टोटल निर्विकार. त्या नजरेत प्रचंड संशय अन् संताप. त्यांची ‘गोंडी’ भाषा यांना कळेना. यांचं समजावणं त्यांना समजेना. मग काय.. या तिघांचे हात दोरखंडानं मागं बांधले गेले. त्यांच्या सायकली ताब्यात घेतल्या. मग यांची वरात रस्ता सोडून आतल्या जंगलात शिरली. मजल-दरमजल करत एका झोपडीजवळ पोहोचली. बांधलेल्या अवस्थेतच तिघांना आतमध्ये ढकललं गेलं. ...अन् इथूनच सुरू झालं या तीन ‘इडियट्स’च्या पाच दिवसांच्या ‘बंदिवासा’चं अघोरी जिणं.
 
दिवस पहिला - २९ डिसेंबर
 
दुपारी दोनच्या सुमारास त्यांना ‘आत’ टाकण्यात आलं. बाहेरचा घोळका मग सायकलींवर तुटून पडला. बॅगा ओपन केल्या गेल्या. प्रत्येक वस्तू मोठ्या उत्सुकतेने हाताळली जाऊ लागली. घोळक्यातला एकजण त्यांच्या भाषेत ओरडून हातवारे करू लागला. बहुधा, ‘या वस्तूंना हात लावू नका,’ असा आदेश देत असावा; कारण तोच यांचा म्होरक्या होता. ‘ही आदिवासी माणसं कोण आहेत अन् त्यांनी आपल्याला इथं का डांबून ठेवलंय’ याचा विचार करताना आतली तिन्ही पोरं भेदरलेली होती. 
एवढ्यात काळा ड्रेस घातलेला एक नवा माणूस झोपडीत आला. त्याच्या येण्यानं सारा जमाव चिडीचूप झाला. पाठीला रायफल बांधलेल्या या नवख्यानं तिघांकडे रोखून बघत एकच प्रश्न विचारला, ‘किसने भेजा है?’ मोडक्या-तोडक्या हिंदीत बोलणारा हा ‘नक्षलवादी’ आहे, हे पोरांच्या लक्षात आलं. घाम फुटलेला असतानाही त्यांनी स्वत:च्या श्वासावर ताबा ठेवत आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘ज्या पट्ट्यात यायला पोलीसही धजावत नाहीत, तिथं ही तीन पोरं सहज फिरायला म्हणून आली आहेत,’ यावर त्या नक्षलवाद्यांचा विश्वासच बसला नाही. त्याने तत्काळ स्थानिक आदिवासींकडे वळत त्यांच्या भाषेत कसलातरी आदेश दिला. 
एकजण त्यांच्याकडे झेपावला. तिघांचे खिसे उलटे केले गेले. मोबाइल बाहेर काढले गेले. आदर्शच्या खिशातून ‘गूगलवरचा मॅप’ बाहेर पडला. त्यात छत्तीसगडमधल्या काही गावांभोवती फुल्या मारून ठेवल्या होत्या. हे पाहताच नक्षलवाद्याचे डोळे अधिकच विस्फारले गेले. ‘इधर क्यूं आया? किसने भेजा है?’ या दोनच प्रश्नांचा भडिमार त्यानं सुरू केला. ‘आपण पोलिसांचे हस्तक आहोत’ असा दाट संशय यांना आलाय, हे लक्षात येताच तिघेही पार हादरले. तो कागद घेऊन रायफलधारी बाहेर निघून गेला. जाताना त्यानं स्थानिकांना काही सूचना केल्या. पाहता-पाहता संध्याकाळ झाली. तिघांनाही जंगली पानांच्या द्रोण वाट्यांमधून पाणी दिलं गेलं. अर्धवट कच्च्या भातावर जंगली भाजी ओतून जेवायलाही घातलं गेलं. नंतर पुन्हा हात बांधून आतमध्येच झोपायला लावलं. भीती अन् असहाय्यता यामुळं हतबल झालेली पोरं नीट झोपलीच नाहीत. अर्धवट ग्लानीत भयचकित स्वप्नं पाहत डुलकी लागली.
 
दिवस दुसरा : ३० डिसेंबर
 
सकाळी झोपडीबाहेर आवाज आला, तसं अर्धवट पेंगणारे तिघे खडबडून जागे झाले. आज जमावासोबत काही छोटी पोरंही होती; मात्र पूर्णपणे नंगू. यातल्या एकानं सायकलचा ताबा घेतला. श्रीकृष्णच्या सायकलला असणारी गियर हाताने फिरवू लागला. कदाचित ‘सायकल’ नावाची वस्तू या मंडळींनी आयुष्यात कधी पाहिलीच नसावी. दोघं-तिघं झोपडीत आली. तेव्हा तोंड वाकडं-तिकडं करत तिघांनी कधी करंगळी वर केली तर कधी डाव्या हाताची पाची बोटं गोल केली. मात्र या ‘एक नंबर’ अन् ‘दोन नंबर’चा सांकेतिक अर्थ समोरच्यांना समजलाच नाही. यातल्या एकाला मात्र थोडंसं हिंदी समजत असावं. त्यानं कालच्याच नक्षलवाद्याचा प्रश्न पुन्हा विचारला, ‘किसने भेजा है?’ तेव्हा पोरांनी अगोदर शौचाला लागल्याची ‘अक्षरश: अ‍ॅक्शन’ करून दाखविली. तेव्हा मात्र, तिघांचे हात सोडून एकेकाला आत जंगलात पाठवलं. सोबतीला एकजण असायचाच. ‘आपण पळून जायचा प्रयत्न केला तरी उपयोग नाही. एवढ्या घनदाट जंगलात पुन्हा सापडणारच. तेव्हा इथंच राहून त्यांचा विश्वास संपादन करू या!’ असा निर्णय तिघांनी रात्रीच घेतला होता. त्यामुळं आपण त्यांच्यातलेच आहोत, असं दाखविण्याचा प्रयत्न होऊ लागला.
दुपारीही कालच्यासारखाच भात. सोबतीला कसलीशी कंदमुळंही. जेवल्यानंतर तिघांना समोरच्या झाडाखालीच बसवलं गेलं. नंतर ‘वॉच’ ठेवायला दोन माणसं थांबली. बाकीची इकडं-तिकडं पांगली. तिघांच्या एक लक्षात आलं की, या झोपडीच्या आजूबाजूलाही लांबवर झोपड्या आहेत. मात्र, एकत्र वस्ती नाही. समोरचे दोघेजण जेवायला बसले, तेव्हा त्यांची नजर चुकवून तिघांनी आपापल्या मोबाईलमधले मेमरीकार्ड काढून त्याचे तुकडे केले. कारण इथं येण्यापूर्वी अगोदरच्या गावांमध्ये त्यांनी काही पोलिसांबरोबर सहज हौसेने फोटो काढले होते. ते जर चुकून इथं कुणी बघितले तर अजून ‘संशयकल्लोळ’ माजणार होता. पाहता-पाहता रात्र झाली. आज मात्र त्यांना बाहेरच्या लाकडी बाजेवरच हात बांधून झोपविण्यात आलं. नंतर त्यांनाच खेटून बाकीचेही बाजेवरच झोपले. 
 
दिवस तिसरा : ३१ डिसेंबर
 
आज मात्र पक्ष्यांच्या चिवचिवाटाने तिघांना जाग आली. असे आवाज त्यांनी कधी ऐकले नव्हते. रात्री झोपलेली माणसं गेली. दुसरी नवीन आली. बहुधा, यांच्यातही ‘रोटेशन’ ठरलं असावं. दुपारी पुन्हा ‘तो’ रायफलधारी आला. त्याच्यासोबत अजून एकजण ‘नक्षलवादी’ होता. बहुधा त्याचा ‘बॉस’ असावा. त्यानं तिघांचे मोबाइल चेक केले. शहरी भागाशी थोडाफार संपर्क आल्यानं तो जरा शहाणा वाटला. ‘इधर क्यूं आये?’ असा प्रश्न पुन्हा आदळल्यावर विकासनं खिशातलं कॉलेजचं आयकार्ड दाखवलं. जेवढं शक्य तेवढं पटवून देण्याचा प्रयत्नही केला. ‘ही पोरं कॉलेजमधली आहेत’ हे समोरच्या नव्या ‘बॉस’ला पटलं होतं; मात्र इथल्या ‘जंगलाचा नकाशा’ या तिघांकडं सापडल्यानं संशयाचा किडा वळवळतच होता. त्यांची काही कागदपत्रं घेऊन तो परत निघाला.
‘दो दिन और ठैरना पडेगा!’ असं त्यानं जरबेच्या आवाजात सांगितलं. जोपर्यंत आपल्या उपद्रवशून्य अस्तित्वाची या लोकांना खात्री पटत नाही, तोपर्यंत आपण या लोकांचे ‘कैदी’ हे तिघांच्याही लक्षात आलं. खरंतर सहनशीलता संपत चालली होती; मात्र या लोकांचा विश्वास संपादन करणं गरजेचंही बनलं होतं. अशातच एकमेकांशी मराठी बोलणंही धोक्याचं ठरत होतं. कारण लगेच समोरची मंडळी संशयानं कान टवकारून बघत होती. आपापसात कुजबुजत होती. 
अशातच पुन्हा दिवस सरला. भात अन् भाजीवर करपट ढेकरा देऊन तिघं निद्रेच्या आधीन झाले. विशेष म्हणजे, आज रात्री बारा वाजता ‘हॅप्पी न्यू इयर’ या जल्लोषात अवघं जग दणाणून जाणार आहे, हे त्यांच्या गावीही नव्हतं. काळ, वेळ अन् तारीख यांच्या पलीकडे गेलेली ही पोरं थंडीत कुडकुडून कशीतरी झोपली.
 
दिवस चौथा : १ जानेवारी
 
सकाळी या तिघांनी आपल्या वागण्यात थोडाफार प्रयत्न केला. ‘नंगू बारक्यां’ना आपल्या बॅगेतले लाडू खायला दिले. त्यांना सायकलवर बसवून उभ्यानंच अंगणात चक्करही मारली. पोरं खूश. तशी मोठ्ठीही थोडीफार सैलावली. संशयाच्या नजरांमध्ये थोडाफार विश्वास तरळू लागला. 
दुपारी अवकाशातून विमान गेलं. तेव्हा या आदिवासी मंडळींनी हात वर करून त्या विमानाला अभिवादन केलं. ‘विमानाला ते देवदूत समजतात,’ हा नवीनच शोध तिघांना लागला. तेव्हा त्यांनी वहीच्या कागदाची विमानं तयार करून जमावाला दिली. $$मग काय आदिवासी खूश. जेवायला चक्क भातासोबत माशांची आमटी मिळाली. 
संध्याकाळी तिघे त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागले. आपल्याकडे कोंबडीला ‘पक्ऽऽ पक्ऽऽ’ म्हणून बोलावतात तर इथं ‘कुऽऽऽ कुऽऽऽ’ म्हणतात. कुत्र्याला ‘कुऽऽऽ कुऽऽऽ’ ऐवजी ‘कुतूऽऽऽ कुतूऽऽऽ’ म्हणून बोलावतात. मांजराला ‘मिनी-मिनी’ अशी हाक मारतात. मोहाच्या दारूला ‘हेत्तल’ म्हणतात. अशा अनेक नव्या अन् भन्नाट गोष्टी पोरांना शिकायला मिळाल्या. एवढ्यात पुन्हा पहिल्या दिवशीचा ‘रायफलधारी’ आला. त्यानं गोंडी भाषेत आदिवासींशी चर्चा केली. त्यांनी बहुधा काहीतरी ‘पॉझिटिव्ह’ सांगितलेलं असावं. त्यानं मान हलवत कसलातरी होकार दर्शविला. मग, तिघांजवळ येत एकच वाक्य फेकलं, ‘भाग के मत जाना, बुरा होगा.’ 
तो असं का म्हणाला, याचा अर्थ रात्री झोपताना तिघांना कळाला. कारण आज झोपताना बाजेवर तिघेच होते. त्यांच्याभोवती कुणाचा पहाराही नव्हता. ‘आपले आई-वडील तिकडं पुणे-कऱ्हाडात कोणत्या अवस्थेत असतील!’ याचा विचार करतच तिघे झोपून गेले.. जंगलातल्या रातकिड्यांच्या आवाजाशी कळत-नकळत समरूप होत.
 
दिवस पाचवा : २० जानेवारी
 
सकाळच्या जेवणाला आज भातासोबत चिंचेची भाजी मिळाली. डिशमधल्या व्हरायटीमुळं या आदिवासींची मानसिकता बदलत चाललीय, हे पोरांच्या लक्षात आलं. सुटकेची शक्यता वाढत चालली. दुपारी परत तो ‘बॉस’ आला. आज मात्र त्याच्या देहबोलीत प्रचंड फरक जाणवत होता. पूर्वीचा ताठरपणा जाऊन थोडीशी मोकळीक दिसत होती. त्या तिघांनाही त्यानं बॅगा भरण्याचा हुकूम दिला. बॅगा सायकलीला बांधल्या गेल्या; मात्र पोरांच्या हुल्लडपणामुळं एका सायकलचा गिअर तुटल्यानं ढकलतच हे सायकलस्वार निघाले. जंगलातून बाहेर पडेपर्यंत त्यांच्यासोबत एक आदिवासी होता. मात्र, प्रत्येक पुढच्या वस्तीला चेहरा बदलला जायचा.
चिंतलनार सुरक्षा कॅम्प दिसू लागताच लांबूनच ‘सोबती’ गायब झाला. जंगलातून आलेल्या या तिघांना बघताच सीआरपीएफ जवानांमध्ये पळापळ सुरू झाली... कारण इथं शहरी माणूस कधी आत जात नाही अन् चुकून आत गेला तर पुन्हा बाहेर पडत नाही, असा या जंगलाचा इतिहास होता. गेले पाच दिवस अंघोळ न केल्यामुळे काळवंडलेले चेहरे, खुरटलेली दाढी अन् चुरगळलेले तेच ते कपडे अशा अवस्थेत पोरं कशीबशी कॅम्पमध्ये शिरली. याची खबर मिळताच तिथले पोलीस महानिरीक्षक बस्तल स्वत: कॅम्पमध्ये दाखल झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांशी संपर्क साधला. कार्यालयातल्या फोनवरून तिघांनी आपल्या आई-वडिलांशी संपर्क साधला. बराचवेळ दोन्हींकडून मुसमुसण्याचा आवाज येत होता. 
दरम्यान, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यापर्यंतही ही घटना पोहोचविली गेली. आपल्या कऱ्हाडातल्या पोरांवर काय आपबिती कोसळली होती, याची जाणीव होताच त्यांनीही यंत्रणेला सूचना दिल्या. ‘सुकमा’वरून थेट हेलिकॉप्टरने या तिघांना ‘जगदलपूर’ला आणलं गेलं. तिथून पुन्हा गडचिरोलीला पोहोचल्यानंतर तिथले पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही या पोरांना सुखरूपपणे कऱ्हाडला पोचवलं. ७ जानेवारीला घरी पोहोचताच पोरं आई-वडिलांच्या कुशीत शिरून ढसाढसा रडली. 
पण, खरी गंमत पुढं आहे. हे सारं ऐकल्यानंतर मी या तिघा पोरांना शेवटचा प्रश्न विचारला,
‘आता यापुढं तरी कुठं भ्रमण-ब्रिमण करायला जाणार नाही ना?’ 
तेव्हा ही पोरं परत छाती पुढं काढून मोठ्या आवेशात उद्गारली, ‘बचेंगे तो और भी लढेंगे!’
 
 
(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)