- सुदाम देशमुख
दोनदा लिमका रेकॉर्ड,
हिमालयात कार रॅली,
पोहण्याचे विक्रम
आणि अजुर्न पुरस्कार
हे सारं जिद्दीनं करणार्याला
दीपाला कोण अपंग म्हणेल?
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या दीपा मलिकने रौप्यपदक जिंकले. पॅरालिम्पिकच्या महिला अँथलेटिक्समध्ये रौप्य पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. दीपाचा जन्म हरियाणातील भैसवालचा. तिचे वडील कर्नल बालकृष्ण नागपाल काही काळ जयपूर येथे होते. त्यावेळी अजमेरच्या सोफिया कॉलेजकडून दीपा बास्केटबॉल खेळली होती. मोटरबाईक रेसिंगची तिला प्रचंड आवड. अहमदनगरच्या आर्र्मड कोअर सेंटर अँण्ड स्कूलमध्ये कमाडंट असलेल्या बलबीरसिंग मलिक यांचा मुलगा कर्नल विक्रमसिंग यांच्याशी दीपाचे लग्न झाले.
लग्नानंतर विक्रम मलिक यांची अ.नगरला बदली झाली. तेथून दीपा व नगरचा ऋणानुबंध जुळला. १९९९ मध्ये मणक्यात ट्युमर झाल्याने दीपाला कमरेखाली अपंगत्व आले. त्यावेळी कारगिल युद्धात रेजिमेंट सांभाळणार्या विक्रम मलिक यांनी या युद्धातील विजयानंतर दीपासह मुलींना सांभाळण्यासाठी लष्कराची नोकरी सोडली.
त्यानंतर दीपा नगरला आली. अपंगत्व आले असूनही परिवाराच्या मदतीसाठी तसंच स्वत:ला जोखण्यासाठी तिने जामखेड रोडवर ‘डीज प्लेस’ हे फॅमिली रेस्टॉरंट सुरू केले. यानिमित्ताने येथील नरेंद्र फिरोदिया, पवन गांधी, गौतम मुनोत, प्रीतम मुथा आदि तरुणांशी त्यांचा परिचय झाला. महिला व शारीरिक अपंगत्व असूनही दीपा यांच्यात हॉटेल चालविण्याची जिद्द होती. हॉटेलचे व्यवस्थापन त्या बघायच्या. या जिद्दीचे मित्रमंडळींना अप्रूप होते. मग या सर्वांनीच तिला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं. चारचाकी मोटारसायकल शर्यतीत लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमही तिच्या नावावर नोंदवला गेला. हिमालयाची अँडव्हेंचर रॅली केली. यमुना नदीत एक किलोमीटर उलटे पोहण्याचा विक्रम केला. नगरच्या मित्रांनी स्पॉन्सरशिपपासून सर्व प्रकारची मदत त्यांना केली. त्यानंतर अपंगांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांना रुची निर्माण झाली. खेळाडूला किती टक्के अपंगत्व आहे त्यानुसार पॅरालिम्पिकमध्ये गट केले जातात. ७0 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या गटात दीपाचा समावेश होता. दिल्लीतील साईच्या केंद्रात ती सराव करायची. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तिचे पती विक्रमसिंह दीपाच्या प्रोत्साहनासाठी दिल्लीत स्थायिक झाले.
दीपाची मोठी मुलगी देविका हिचा एक हात काहीसा अधू आहे. देविका एक वर्षाची असतानाच तिला अपघात झाला होता. त्यामुळे तिच्याही शरीराचा एक भाग पॅरालाईज आहे. यानंतर दीपाने घरालाच ‘व्हीलचेअर फ्रेंडली’ बनविले आहे. सासरे, पतीसह मुलींचे पाठबळ, मित्र-मैत्रिणींचे प्रोत्साहन यामुळे दीपा मलिक यांनी रौप्यपदकाला गवसणी घातली.
गेल्या दहा वर्षात दिपानं राष्ट्रीय पातळीवरची १00 व आंतरराष्ट्रीय पातळीवरची १0 पदकं जिंकली आहेत. तिची जिद्द ही कुणाही साठी प्रेरणादायी ठरावी!
शरीरावर दोनशे टाके..
दीपाचे संपूर्ण आयुष्यच व्हील चेअरवर आहे. शरीरावर दोनशेपेक्षा जास्त टाके घातलेले आहेत.
दीपा सांगते ते महत्वाचं,‘माझ्या विकलांगतेनं माझ्या जगण्याला फोकस दिला. अपंगत्वाकडे पाहण्याच्या सहानुभूतीच्या नजरा कमी होऊन आदर आणि सन्मानाचा दृष्टीकोन समाजाला लाभावा म्हणून मी प्रयत्नशील राहीन!’
(वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, अहमदनगर)