- पद्मजा जांगडे
टिकली. किती छोटी गोष्ट. कुणी सौभाग्याचं लेणं म्हणून लावतात कुणी फॅशन म्हणून. तर कुणी मॅचिंग म्हणून. त्यावरुन वादही अनंत. पण तरीही काळाच्या प्रवाहात टिकली टिकलीच! आणि म्हणून तर आजच्या फॅशनेबल अल्ट्रा मॉडर्न जगातही ती दिसतेच कपाळी. जास्त वेगळी, जराशी स्टायलिशही!
चाळीस-पन्नासच्या दशकात कपाळी चंदन, राख अथवा लाल टप्पोरं कूंकू लावण्याची पध्दत होती. सत्तरच्या दशकात यात विविधरंगांची भर पडली. ऐंशीच्या दशकात मरुन, चमकदार, खडय़ाच्या टिकल्यांची फॅशन आली. तोर्पयत या कूंकू/टिकलीचा आकार गोलच होता.
मात्र नव्वदीच्या उंबरठय़ावर येतात, विविध रंगाबरोबरच टिकल्यांच्या विविध आकाराला पसंती मिळाली. अंडाकृती, लंबगोलाकार, चांदणीचा आकाराबरोबरच वेगवेगळय़ा डिझाईन्सच्या टिकल्यांनी फॅशनच्या दुनियेत हक्काची जागा मिळवली.
त्याचकाळात आलेल्या चांदनीतल्या श्रीदेवीने तर कपाळी पांढरी टिकलीही पॉप्युलर करुन टाकली.
जाहिरातीचे प्रभावी माध्यम म्हणून छोटय़ा पडद्यावरील मालिका नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. म्हणूनच एखादी मालिका सुरू झाली की स्त्री व्यक्तिरेखेची ड्रेसिंग स्टाइल, हेअरकट, गेटअप, अगदी बॅग्ज, शूज लगेच बाजारपेठेत येतात.
अगदी पहिला डेलीसोप असलेल्या शांतीच्या कपाळी असलेली बाणाच्या आकाराची , काळ्या रंगाची, लाल रंगाची टिकली केवढी लोकप्रिय झाली होती. इतकी की मुली हमखास कपाळी ते बाण लावू लागल्या. पुढे ‘कमोलिका’च्या बिंदी स्टाईलने तरुणींमध्ये भलतीच क्रेझ निर्माण केली होती. सुधा चंद्रनच्या बिंद्याही गाजल्या. आणि निना गुप्ताच्याही. ‘हम दिल दे चुके’ मधल्या ऐश्वर्याच्या बिंदी स्टाईलने तर तरुणींबरोबरच अनेक तरुणांनाही भुरळ पाडली. आणि आता रामलीला मधली लीला, पिकूतली टिकली लावणारी पिकू अशा फॅशन्सही परतून आल्या आहेतच.
ऐंशीच्या दशकात जाहिरातींतील 75 टक्के व्यक्तिरेखा टिकली लावलेल्या दिसायच्या, 2000 सालात हे प्रमाण अवघ्या 30 टक्क्यांवर आले आहे. खास महिलांसाठी प्रकाशित होणार्या साप्ताहिक, मासिकांबाबतही हेच म्हणावं लागेल. सत्तरीच्या दशकात या पुस्तकांतून जाहिराती करणार्या महिलांपैकी 50 टक्के महिला या टिकली लावलेल्या दिसायच्या. मात्र आज हे प्रमाण निव्वळ 5 ते 7 टक्क्यांवर आले आहे.
कम्प्युटराईज्ड टिकल्या
सध्या कम्प्युटराईज्ड टिकल्यांची क्रेझ आहे. या टिकल्यांचं पाकिट अवघ्या पाच रुपयांपासून उपलब्ध असलं तरी आकर्षक डिसाईन्स यात मिळतात. खास वधूसाठी असलेल्या एका टिकलीसाठी 200 ते 500 रुपये इतकेही लगAसराईत सहज खर्च होतात.
बिंदी स्टोअर
भारतात 2015 मध्ये पहिल्यांदा अभिनेत्री प्रभलिन कौर व टिकली डिझायनर अरुणा भट यांनी ऑनलाईन ‘बिंदी स्टोअर’ सुरू केलं. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी 1 लाख डिसाईन्सच्या टिकल्या बनवून भट यांनी लिम्का बुकऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला.