- प्रसाद सांडभोर
दिवसभर खूप चाललोय. कधीही झोप येईल इतका दमलोय. थकलोय. टॉर्च बंद आहे. शेकोटीपण विझून गेलीये. सर्वत्र काळोख आहे. मिट्ट रात्र. तंबूच्या दारातून दिसतोय तेवढा चंद्रच काय तो एक पांढरा दिवा आणि आजूबाजूला चांदण्यांची रांगोळी. सप्तर्षी दिसतायत मधोमध. ओळखायला सगळ्यात सोप्पे. चार चांदण्या जोडून बनणारा पतंग आणि खाली लटकणारा त्याचा तीन चांदण्याचा धागा! त्या शेजारून सरळ डावीकडे पाहिलं की ध्रुवतारा.
इथे तंबूत झोपल्या झोपल्या तो दिसणं जरा कठीण आहे. उठून बाहेर जावं का? मग पलीकडचा व्याध पण पाहता येईल. थंडी आहे चांगलीच. पण वा! कसलं दिसतंय आकाश!
‘सगळ्यात आधी कोणी बरं शोधून काढली नक्षत्रं? अगदीच रिकामटेकडे असणार ते लोक नक्कीच. नाहीतर कोण असं ताऱ्यांचे टिंबं जोडून चित्रं बनवत बसेल?’
- मी असं म्हणायचो तेव्हा मनूकाकू खळखळून हसायची. रात्रीची जेवणं झाली की आम्ही गच्चीवर जाऊन बसणार. दररोज. सगळ्यात आधी गणिताच्या सूत्रांची रिव्हिजन, मग पाढे आणि मग नक्षत्रांचा तास. तिचं ते जुनं, जीर्णशीर्ण झालेलं आकाशदर्शनाचं पुस्तक डोक्यावर धरून वेगवेगळी नक्षत्रं शोधायची. कधी दोघांनी मिळून, कधी आलटून पालटून, तर कधी सगळ्यात आधी सगळ्यात जास्त नक्षत्र कोण शोधणार अशी स्पर्धा करत. कधी कंटाळून, नक्षत्रांचा नाद सोडून नुसतीच चित्रं बनवायची चांदण्यात अदृश्य रेषा ओढत-जोडत.
अशीच एक अदृश्य रेषा ओलांडून निघून गेली ती. एकटीच. हसत हसत. मी अजूनही रेषेअलीकडेच आहे. कशा ना कशाचे टिंबं जोडत माझा माझा खेळ खेळतोय. चित्रं बनवतोय, खोडतोय, पुन्हा बनवतोय...
असा दूर डोंगरात एकटाच भटकायला आलोय.
तंबू टाकून विसावलोय आणि असं चांदणं पाहत मनूकाकू आठवतोय.