-प्रज्ञा शिदोरे
शाळा, कॉलेजात असताना काही शिक्षक आपल्याला फार आवडतात. आपलं नशीब चांगलं असेल तर त्या वयात काही अशी माणसं भेटतात जी आपलं आयुष्यच बदलून टाकतात. त्यांचं बोलणं, वागणं, विचार करण्याची पद्धत, जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सारंच हवंहवंसं वाटतं, आपल्याला घडवतंही. अनेकदा तर आपली आजी, एखादा मोठा मित्र, शिक्षक किंवा अगदी आपल्या बरोबरीनं काम करणारा आपला सहकारी. ही माणसंही आपल्या प्रश्नांची उत्तरं बनून येतात. अनेकदा तर काही न बोलता फक्त आपलं बोलणं ऐकून घेतात. ते काहीच बोलले नाही, पण फक्त ऐकून घेतलं तरीही आपल्याला फार सुख वाटतं. अशीच ही एक गोष्ट. ही गोष्ट, हे पुस्तक प्रत्येक तरुणानं वाचावं असं आहे. एक इटुकलं पुस्तक पण त्यात आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं सहज सापडतात. त्या पुस्तकाचं नाव टय़ुसडेज विथ मॉरी. ही गोष्ट खरं तर मीच अल्बमची आहे. तो आपल्यासारखाच विद्यार्थी. अमेरिकेतल्या ब्रॅँडिस युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्याचे एक प्रोफेसर होते मॉरी श्वाट्स. ते त्याला समाजशास्त्र शिकवायचे. मीच पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडला. नोकरीला लागला आणि पत्रकार म्हणून काम करताना आयुष्याच्या रगाडय़ात त्यांना विसरूनही गेला. एकदा एका वाहिनीवर कुठलातरी कार्यक्रम बघताना त्याला प्रोफेसर दिसले. सार्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.