यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी फेसबुकवरून कळालं, की औरंगाबादजवळच्या पैठण तालुक्यात असलेल्या शेकटा या लहानशा गावातल्या लोकांनी तिथल्या बारवेवर दीपोत्सव साजरा केला. दोन दिवस आधीच गावातल्या काही तरुण मुलांनी जमून झाडंझुडपं काढून, निर्माल्य म्हणून विसर्जित केलेला कचरा, देवादिकांचे रंग उडालेले, फाटलेले फोटो, भंगलेल्या मूर्ती आणि गाळ काढून स्वच्छता केली होती. मग, मोठी माणसंही कौतुक पाहायला जमली. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर गावातल्या बायकांनी पणत्या आणल्या आणि बारवेच्या पायऱ्यांवर आरास करून त्या उजळल्या. शेकडो वर्षांपासून उपेक्षित पडलेली ही चारही बाजूंनी पायऱ्या असलेली पुष्करणीसारखी बारव दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघाली.
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले. तसे तिकडे परभणी जिल्ह्यात वारसा संवर्धनासाठी काम करणाऱ्या काही मंडळींनीही आपापल्या ठिकाणच्या बारवा स्वच्छ करून तिथेही दीपोत्सव साजरे केले. शेकट्याच्या पाठोपाठ परभणी जिल्ह्यातल्या हातनूरच्या तरुणांनीही आपल्या गावातली बारव स्वच्छ केली. ते पाहून रायपूरच्या लोकांनीही वर्गणी काढून आपल्या गावातल्या बारवेची स्वच्छता केली. असं करता करता चारठाणा, पिंगळी, ढेंगळी पिंपळगाव आणि धारासूर या गावांमध्येही बारवेवर दिव्यांचा लखलखाट झालेला पाहायला मिळाला. कुणी या बारवेबरोबरच शेजारी असलेली महादेवाची जुनी मंदिरंही शिवरात्रीला फुलांनी सजवून दिवे लावले.
बारवा अशा लख्खं झाल्या, पण हे सारं एका रात्रीत घडलं का?तर नाही. रोहन काळे नावाचा मुंबईचा एक तरुण गुजरातमध्ये नोकरीला होता. तिथल्या रानी की वाव, अडालज वाव, दादा हरी की वाव अशा एकाहून एक सुंदर बारवा त्यानं पाहिल्या. या बारवांची सुस्थिती आणि आपल्याकडच्या बारवांची दुरवस्था पाहून त्याला वाईट वाटलं. गुजरातच्या बारवा पाहायला जगभरातून पर्यटक येतात; आणि आपल्याकडच्या बारवांमध्ये कचरा टाकायला गावभरचे लोक. त्यानं मनाशी काही ठरवलं, मोटारसायकल काढली आणि कॅमेरा घेऊन निघाला. सगळ्या महाराष्ट्रभरातल्या बारवा पाहायला निघाला.
फेसबुकवर रोहननं ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ हा हॅशटॅग वापरून ग्रुप सुरू केला. त्याला मनोज जाधव या तशाच जिद्दी मित्राची साथ मिळाली आणि दोघांनी कोरोनाकाळाचा सदुपयोग करीत आतापर्यंत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या एकूण ७१३ बारवा पाहिल्या. त्यांचे फोटो काढले. जीपीएस लोकेशन घेतलं. मॅपिंग करून ते www.indianstepwells.com या वेबसाइटवर अपलोड करून सर्वांना उपलब्ध करून दिलं. त्यापासून प्रेरणा घेऊन गावोगावचे लोक आपापल्या ठिकाणच्या बारवा स्वच्छ करू लागले.
शेकट्याच्या दीपोत्सवाची कथारोहनच्या या चळवळीला मराठवाड्यातून मदत करणारे वारसाप्रेमी श्रीकांत उमरीकर यांनी जानेवारी महिन्यात फ्रेंच मित्र व्हिन्सेंट पास्किलिनी, शेतकरी संघटनेचे दत्ता भानुसे, बोकुड जळगावचे हरी नागे आणि भगतवाडीचे पत्रकार विठ्ठल म्हस्के यांच्यासह एक दौराच काढला. कचनेर ते कायगाव या टापूत फिरून जांभळी बिडकीन, शेकटा, भगतवाडी, दहेगाव बंगला, कायगाव, जामगाव या ठिकाणच्या एकूण नऊ बारवा त्यांनी पाहिल्या. गावातल्या लोकांना गोळा करून या बारवा स्वच्छ करण्याची विनंती केली. त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांना या वारशाचं महत्त्व पटवून दिलं.
मराठवाड्यात गावोगाव एक-दोन तरी बारवा आहेतच. त्यातही इतरांच्या तुलनेत आकारानं मोठ्या असलेल्या चारठाणा, मादळमोही, पिंगळी, अंबड, अंबाजोगाई, कंधार, लातूर, मंंठा, जागजी, मुखेड अशा काही मोजक्या बारवा विशेष आहेत. उमरीकर सांगतात, “शेकटा गावातली बारव ही अशीच एक मोठी बारव आहे. या बारवेची पाहणी जानेवारी महिन्यात आम्ही केली होती. त्या वेळी बारवेची अवस्था अतिशय वाईट होती. गावातल्या तरुण मुलांना एकत्र केलं. किमान इथे स्वच्छता तरी करा, असं आवाहन केलं. त्या तरुणांनी मनावर घेतलं आणि शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तिथे स्वच्छता अभियान राबवलं गेलं. त्या तरुण मुलांनी मला फोन करून सगळा वृत्तान्त कथन केला. फोटो पाठवले. शिवरात्रीला तिथे मोठा दीपोत्सव गावातील महिलांनी साजरा केला.”
कृष्णा कळसकर हा या गावातला एक तरुण. त्याला फोन केला तेव्हा त्याची शेतातल्या कामाची गडबड चाललेली. तो म्हणाला, “मी, अनिल बरगे, अनिल आदमाने, जगदीश गिधाने अशी १०-१५ मुलं शिवरात्रीच्या दोन दिवस आधी तिथं साफसफाई करायला गेलो. बारवेच्या समोरच राहणाऱ्या अशोक भवर यांनी बरीच मदत केली. त्यांचा मुलगाही सोबत आला. आम्ही फक्त सफाई करणार होतो. दिवे लावायचं काही आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं. पण, सफाई केल्यावर गावातल्या बऱ्याच महिला आल्या. त्यांनीच त्यांच्या त्यांच्यात ठरवून शिवरात्रीला तिथे दिवे लावले. तेव्हा भरपूर लोक आले.”
परभणीतल्या बारवा दिव्यांनी सजल्याशेकट्याच्या तरुणांनी केलेलं काम पाहून परभणी जिल्ह्यातल्या काही वारसाप्रेमींनी एकत्र येत लोकांना बारवा स्वच्छ करायला भाग पाडलं. यात लक्ष्मीकांत सोनवटकर, मल्हारीकांत देशमुख आदी मंडळींनी पुढाकार घेतला. श्रीकांत उमरीकर सांगतात, सेलू तालुक्यातल्या हातनुरच्या लोकांनी आपल्या बारवेचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून केला होता. परभणी - नांदेड रेल्वे मार्गावर पिंगळी रेल्वे स्टेशन आहे. या गावांतील बारव आणि तिच्या काठावर पिंगळेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ही बारव भव्य आणि मोठी देखणी आहे. गावकऱ्यांनी या बारवेची साफसफाई करून इथे दिवे लावले. धारासूर, ढेंगळी पिंपळगाव आणि चारठाणा इथल्या मंदिरांची साफसफाई आणि सजावट गावकऱ्यांनी केली. या मंदिरांवरही शिवरात्रीला दिवे लावण्यात आले.
आता तयारी गुढीपाडव्याची
ही सगळी बारव चळवळ उभी करणारा रोहन काळे औरंगाबादलाही आला होता. तो सांगतो, ‘आतापर्यंत ७१३ बारवांचं मॅपिंग पूर्ण झालं आहे. लवकरच हा आकडा ७५० होईल. महाराष्ट्रातल्या गावागावांत मिळून सुमारे २५ हजार बारवा असतील. या मोहिमेला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विदर्भ आणि मराठवाड्यानेही साथ दिली, तर सगळ्या बारवा आपण नकाशावर आणू शकू!
मागचं वर्ष कोरोनाच्या साथीमुळे तसं नकारात्मक गेलं. पण, आता येत्या १३ एप्रिलला गुढीपाडवा आहे. नव्या वर्षाच्या या पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणच्या गावकऱ्यांनी आपापल्या गावांतील बारवा स्वच्छ करून तिथे दिवे-पणत्या लावाव्यात. दीपोत्सव साजरा करावा,’ असं आवाहन रोहननं केलं. त्याला आतापर्यंत किमान शंभरेक गावांनी होकार दिला आहे. काही गावांमध्ये बारवा स्वच्छही करण्यात आलेल्या आहेत. शेकडो वर्षांपासून या बारवांनी आपल्याला पाणी पुरवलं. आता आपल्याकडं धरणं झाली, घरोघर नळ आले, म्हणून आपण बारवेची किंमत विसरलो. पण उद्या दुष्काळ पडला, नद्या-धरणं आटली, तर आपल्याला पुन्हा आपली तहान भागवण्यासाठी प्राचीन जलस्रोतांकडेच वळावं लागणार आहे.
आणि पर्यटनाच्या कथित राजधानीत…औरंगाबादला ‘महाराष्ट्राची पर्यटन राजधानी’ वगैरे म्हणतात. पण, आता डेव्हलपमेंट प्लॅनच्या नावाखाली मयूर पार्क परिसरातील एक सुंदर मुघलकालीन बारव बुजविण्यात येणार आहे. एकीकडे मराठवाड्यात तरुण मुलं बारव चळवळ उभी करीत आहेत, दुसरीकडे औरंगाबादसारख्या पाण्याचं दुर्भिक्ष माहीत असलेल्या शहरात राजरोस बारव बुजविण्याची तयारी होतेय, हे भयंकर आहे.
- संकेत कुलकर्णीsanket.abhinav@gmail.com(लेखक इतिहास विषयात पीएच.डी.चे संशोधन करीत आहेत.)