- अंकित राऊत,उमरखेड ते जम्मू आणि राजस्थान ते चेन्नईया प्रवासानं चांगलं-वाईटनिवडायला शिकवलं तेव्हा..पैनगंगेच्या अभयारण्यात वसलेलं माझं गाव. बिटरगाव, ता. उमखेड, जि. यवतमाळ. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण इथंच झालं.सहावीत मला नवोदय विद्यालय घाटंजी (जि. यवतमाळ) इथं प्रवेश मिळाला. त्या काळी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणं ही फार मोठी गोष्ट होती. आई-वडिलांना सोडून, लांब आणि वसतिगृहात राहायचं मात्र होतं. नवोदय विद्यालय म्हणजे काय, बाहेर कसं राहायचं, स्वत:ची कामं स्वत: कशी करायची यातलं काहीही कळत नव्हतं.पण त्या लहानशा वयात एवढंच कळलं होतं की आपण काहीतरी नवीन करतोय, त्याची उत्सुकता मात्र होती. सुरुवातीचा एक महिना मला फार कठीण गेला. बाहेरच्या खाण्याची आणि राहायची सवय नसल्यामुळे नेहमी तब्येत बिघडत असे.नवोदयचे नियम आणि शिस्त फार कडक! सारखी घरची आठवण यायची. एकदा तर बाबांकडे शाळा सोडायचा आग्रहच धरला. तिथं न राहण्याची नाना कारणं मी सांगितली. तेव्हा बाबा म्हणाले, ‘तुला जर काही आयुष्यात करायचं असेल, स्वत:ला घडवायचं असेल तर कठीण परिस्थितीचा सामना करावाच लागेल! धीर धर, हा अवघड काळ फार वेळ राहणार नाही.!’काय कळलं त्या वयात हे माहिती नाही; पण कठीण काळात टिकून राहायचं एवढं मनाशी नक्की केलं. नंतर मी कधीही माघार घेतली नाही.कारण पुढे नववीमध्ये तर मला थेट जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातल्या नवोदय विद्यालयात शिकायची संधी मिळाली. नवोदयमध्ये नववीतले काही विद्यार्थी एका वर्षासाठी दुसºया राज्यात शिकायला पाठवतात. त्यात माझी निवड झाली.नागपूर ते जम्मू हा माझा पहिला रेल्वे प्रवास. जम्मू नवोदयचा परिसर अतिशय सुंदर होता. तीनही बाजूंनी बर्फाच्छादित भल्या मोठ्या टेकड्या. आणि एका बाजूनं रावी नदीवरचे धरण. तिथं गेलो, सगळंच वेगळं. त्यात थोडं रॅगिंगही झालं.मात्र तिथली संस्कृती, बोलीभाषा, राहणीमान, भौगोलिक परिस्थिती याचाही अनुभव आला. या काळात आम्हाला राधाकृष्ण दुधाटे सर मराठी शिकवायला होते. त्यांनी शिस्त आणि नम्रता हे सारंही मराठीसोबत शिकवलं, ते अजून साथ ेदेतंय.दहावी झाली. अकरावी- बारावीला (आयआयटी- जेईई कोचिंगसाठी) अजमेर (राजस्थान)ला गेलो. तिथं हेमंत छाब्रा सरांमुळे फिजिक्सची गोडी लागली. पुढे बारावीनंतर शेगावला संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात विविध प्रोजेक्ट्स करताना संशोधनाची आवड निर्माण झाली. गेटची परीक्षा उत्तीर्ण करून आयआयटी मद्रासला प्रवेश मिळवला. सध्या माझं (कल्ल३ी१ल्लं’ उङ्मेु४२३्रङ्मल्ल एल्लॅ्रल्ली२) या क्षेत्रात संशोधन सुरू आहे.एक अभयारण्यात राहणारा मुलगा व्हाया जम्मू, राजस्थात ते चेन्नई असा प्रवास करतो. तेव्हा हा प्रवासच त्याला पुस्तकी शिक्षणासोबत बरंच काही शिकवतो. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी वाट्याला आल्याच; पण त्यात चांगल्या कोणत्या आणि वाईट कोणत्या हे ठरवण्याची नजर या स्थित्यंतरानं दिली. चांगलं भवितव्य घडवण्यासाठी चांगल्या गोष्टींची आणि व्यक्तींची साथ हवी हेच बाहेर राहून शिकायला मिळतं. आपण कोणत्या वेळी कशाची निवड करतो यावरच पुढल्या जीवनाची वाट तयार होत जाते. ती वाट दूर जाते; पण आपण त्याच उत्सुक नजरेनं चालत जायचं..( सध्या आयआटी मद्रास येथे शिकतो आहे.)
मुक्काम IIT मद्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 4:25 PM