-डॉ. भूषण केळकर
यंदाच्या ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ‘कॉन्सेप्ट कार’बद्दल तुम्ही ऐकलं, वाचलं असेल. ‘ट्रान्सफॉर्मर’ या हॉलिवूडच्या प्रख्यात चित्रपटात दाखवल्यासारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गाड्या आता वास्तवात येत आहेत.या बातमीसोबतच तुम्ही हेपण वाचलं असेल की महाराष्ट्र राज्य सरकार आणि ‘वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिल्या एआय रिसर्च इन्स्टिट्यूटचं उद्घाटन झालं, परवाच आपल्या मुंबईत!तुम्ही हेपण वाचलं असेल वा यू ट्यूबवर बघितलं असेल (नसेल तर जरूर बघा!) नागनाथ विभुते या तरुण शिक्षकाने चाकणमधील जांभूळदरा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक विषय शिकवण्याकरता ‘अलेक्झा’ नावाची रोबोट शिक्षिका बनवली आहे. अनेक ग्रामीण विद्यार्थी, विद्यार्थिनी या ‘अलेक्झा’शी अत्यंत मजेत गप्पा मारतात. तिला प्रश्न विचारतात, खरं तर भंडावून सोडतात. या ग्रामीण मुला-मुलींना इंग्रजीतून प्रश्न विचारताना बिचकायला होत नाही! मुख्य म्हणजे कोणत्याही प्रश्नाला ‘खाली बस, तू अजून लहान आहेस’ असं उत्तरही मिळत नसल्यानं मुलं-मुली ‘अलेक्झाबार्इंवर’ खुश आहेत!आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया की, नागनाथ विभुते या कल्पक शिक्षकाने हा ‘अलेक्झा रोबोट तयार केलाय अवघ्या सात हजार रुपयात! यातला सगळ्यात महत्त्वाचा माग म्हणजे हे सारं लांब कुठंतरी मोठ्या शहरात, दिल्ली-मुंबई-बंगलोरमध्ये घडत नाहीये तर जांभूळदराच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घडतंय.ही उदाहरणं मी का सांगतोय तर मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे की इंडस्ट्री ४.० जसं महागड्या गाड्यांमध्ये आलंय किंवा तंत्रज्ञान संशोधनाच्या अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये आलंय, मुंबईसारख्या शहरात आलयं तसंच ते चाकणच्या जांभूळदरामध्येपण पोहोचलंय!या लेखमालेला प्रतिसाद म्हणून तुम्ही ज्या ई-मेल्स पाठवताय त्यात बºयाच सूचनाही करता आहात. (त्यांचं स्वागतच आहे) काहीजणांना बिटकॉन, ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी याबद्दल माहिती हवी आहे. काहींना ड्रोन, तर काहींना बीटॉन या गाडीविषयीही माहिती हवी आहे.या लेखमालेत मी वरील विषय हाताळणार आहेच, परंतु मला असं वाटतं की आपण ‘इंडस्ट्री ४.०’ चे मूलभूत नऊ घटक आधी जाणून घेऊ. एकदा ते कळले की बाकी अनेक गोष्टी आपसूकच स्पष्ट होतील. त्यानंतर मी ‘इंडस्ट्री ४.०’चे शास्त्र/अभियांत्रिकी/कला/विधि/ वैद्यकीय/राजकारण इ. अनेक क्षेत्रातील परिणामपण सांगेन. इंडस्ट्री ४.० मध्ये या काळात टिकण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी नेमके काय करायला हवं. ‘इंडस्ट्री ४.०’चे मनुष्यबळावर होणारे परिणाम, यंत्रामुळे जाणाºया नोकºया, समाजावरील घातक परिणाम हे सारंच आपल्याला तपशिलात समजून घ्यायचं आहे. मात्र, त्यापूर्वी ‘इंडस्ट्री ४.०’चे मुख्य नऊ भाग समजून घ्या. आपला पुढचा प्रवास सोपा होईल.
इंडस्ट्री ४.० चे तंत्रज्ञानाचे ९ महत्त्वाचे घटक
१) ऑटोनॉमस रोबोट : स्वयंपूर्ण असे रोबोट्स. चेन्नईच्या रेस्टॉरण्टमधील रोबोट वेटरचं उदाहरण आपण बघितलं.२) सिम्युलेशन/इण्टिग्रेशन : ज्याला आपण ‘आभासी जुळे’ किंवा ‘सायबर टिष्ट्वन’ म्हणतो. म्हणजे जी भौतिक गोष्ट आहे ती आभासी जगात आणता येणं.३) बिग डाटा/अॅनालिटिक्स : नुसते आकडे/भाषा असे नव्हे तर ऑडिओ/ व्हिडीओ/बायोमॅट्रिक इ. माहिती साठवणं व त्याचं विश्लेषण करणं.४) अॅग्युमेण्टेड/व्हर्च्युअल रिअॅलिटी : फेसबुक, झुकेरबर्ग आणि हे व्हर्च्युअल रिअॅलिटी हे शब्द गुगल करून पाहा. एक वेगळंच जग कळेल.५) द क्लाउड : क्लाउड कम्प्युटिंग हे आपण सतत ऐकतोय, यातही अनेक प्रकार आहेत. मुख्य म्हणजे माहिती किंवा साधनं ही विकत घेण्याऐवजी जशी लागतील तशी वापरता येणं यामुळे शक्य झालयं!६) सायबर सिक्युरिटी : आभासी जगातील अत्यंत महत्त्वाची गुप्तता/ सुरक्षितता.७) थ्री प्रिंटिंग/ अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग : जसं आपण कागदावर प्रिंटिंग करतो तसं थ्रीडी वस्तू ‘छापणं’.८) इंटरनेट आॅफ थिंग्ज : मानवी संवादासह मानवी आणि तंत्रज्ञानाचा नवा संवाद९) एआय : अर्थात, कृत्रिम बुद्धिमत्ता
( लेखक संगणक तज्ज्ञ आहेत.)